पालकत्व
मराठी कथा
सामाजिक
मुलींचं चालवून घ्यायला काय होतं??
गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९
आई, मी इतकी मोठी झाले का ग, कोणी मला नीट बाहेर खेळूच देत नाही, सगळे काही न काही सूचना देत असतात, आठवीतली स्वरा त्रागा करतच घरी आली, आणि वैभवीला तिच्या आईला विचारू लागली.
वैभवी म्हणाली, काय झालं ग?
बघ ना, आज ती सार्थकची आई मला आणि पुर्वाला म्हणाली, एवढ्या वेळ खेळत जाऊ नका, आता तुम्ही मोठ्या झालात.. घरात जाऊन बसायचं.
म्हणे, मुलांचं वेगळं असतं, मुलीच वेगळं!! मुलांना सर्व चालतं.
आई, तू तर मला कधी म्हटली नाहीस, मुलांचं वेगळं अन् मुलींचं वेगळं?? मुलगा मुलगी एकसमान शाळेत पण सांगतात आम्हाला, मग असं का??
मुलांनी हवं तेवढं खेळायचं, आणि मुलींनी घरी जाऊन बसायचं, हे काय ग??
वैभवी म्हणाली, तू खेळ ना तुला हवं तेवढं. आम्ही तुला काही बोलतो का?? खेळण्यानेच शरीराला व्यायाम होतो.
खेळाने मनाला आणि शरीराला ऊर्जा मिळते. कोणी काही बोललं की सांग माझ्या घरच्यांनी मला खूप खेळायला सांगितलंय. घरी बसलेलं त्यांना नाही आवडत.
या घटनेनंतर अगदी दोनच दिवसांनी बाजूला राहणाऱ्या काकू वैभवीला म्हणाल्या, अगं तुझी पोरगी कुठे कुठे खेळत असते, लक्ष ठेव जरा तिच्यावर. पोरीची जात आहे, जरा संभाळून.
वैभवी म्हणाली, एकटी होती का ती??
त्या म्हणाल्या, नाही सगळी फौज होती मुला-मुलींची!!
मग कशाला काळजी?
नाही पण असं खेळणं बरं दिसत नाही ना, मोठी झाली आता ती!!
एवढी कुठे मोठी आहे ती?? आणि असेल तरी मोठ्यांनी खेळू नये असा नियम आहे का?? खेळू दे किती खेळायचंय ते, हे दिवस निघून गेले की पुन्हा येणार आहेत का??
वैभवीने त्यांना समजावले खरे, पण त्यांना ते पटले नाही आणि त्या तोंड फिरवून निघून गेल्या.
पुढे काही दिवसांनी वैभवीचे सासरे म्हणाले, तू मुलीला एवढ्या वेळ खेळायला पाठवतेस, चुकीचं आहे हे.
संध्याकाळी मुलगी घरातच पाहिजे.
वैभवी म्हटली, सगळे जमेपर्यंतच संध्याकाळ निघून जाते.
जी मूलं दुपारच्या शाळेला जातात, ती शाळेतून घरी येऊन खाऊन पिऊन फ्रेश होऊन खेळायला येईपर्यंत वेळ जातो.
मग कधी खेळणार?? आणि आपणच एकीकडे म्हणतो मुलं खेळायला पाहिजेत आणि आपणच बंधनं आणतो.
यावर सासरे जरा रागातच म्हणाले, अगं मुलं खेळू देत की पाहिजे तेवढं, मुलींनी वेळेत घरी आलंच पाहिजे.
आणि मी बघतो ना, तिथं कोपऱ्यावर कुठली मुलं पण असतात दुसरी, उगीच त्यांच्यासमोर कशाला खेळावं या मोठ्या मुलींनी??
आणि परवा तर या मुली एकमेकींच्या कानात कुजबुजून खिदळत होत्या.
वैभवी म्हणाली, मुलींमुलींच चालत हो, आपण जास्त लक्ष नाही द्यायचं!!
वैभवीला असं बरेच जण काही न काही सांगत राहायचे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे वैभवीचा स्वरावर पूर्ण विश्वास होता. घडणारी प्रत्येक गोष्ट स्वरा वैभवीला येऊन सांगायची.
अगदी मुलांविषयी सुद्धा. त्यांचं नातंच तसं होतं, स्वराला तिची आई मैत्रिणच वाटायची.
मग मैत्रिणीपासून कशाला काही लपवा, असंच स्वराला वाटायचं. अगदी कोणत्याही विषयावर त्या दोघी मोकळेपणाने गप्पा मारायच्या.
हे असं नातं होतं, म्हणून कोणीही कितीही काही सांगितलं तरी वैभवीला काळजी नव्हती.
वैभवीला वाटायचं,
लोकांच्या नजरा वाईट म्हणून आपण आपल्या मुलीचं स्वातंत्र्य का काढून घ्यायचं?
इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, खेळू नको, मोठ्याने हसू नको, मुरकू नको, सारखं सारखं का तिच्या मागे लागायचं??
त्याऐवजी तिला स्वतःलाच समजू दे ना, अनुभव घेऊन शहाणं होऊ दे ना, लोकांच्या वाईट नजरांना प्रत्युत्तर द्यायचं सामर्थ्य येऊ दे ना, सगळ्या गोष्टींच्या सामोरी जायला, तिला बळ द्यायचं की पावलोपावली तिची वाट अडवायची??
तशी तर शाळेतलीही प्रत्येक नजर थोडीच चांगलीच असते?
मग शाळा बंद करायची का??
उद्या कॉलेजमध्ये जाईल, ऑफिसला जाईल, ट्रेन, बस, रिक्षा, सारे प्रवास होतील. सगळीकडे अशा नजरा असणार, म्हणून तिला घरीच ठेवायचं का??
काही ठिकाणी तर घरातल्याच नजराही वाईट असतात, मग??
म्हणूनच वैभवीने ठरवलेलं, कोणी काहीही म्हणो, माझी मुलगी तेच करणार ज्यात तिला आनंद मिळणार. मुलगी म्हणून तिला मी मागे ओढणार नाही. मात्र तिला सक्षम करण्यासाठी पाहिजे तेवढं बळ देत राहीन. चुकली तर शिकेल, पडली तर उठेल, तिचं ती सारंकाही मॅनेज करेल!!
मुलांचं सर्व चालतं, तसं मुलींचंही चालवून घेतलं तर काय होतं??
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article