मराठी कथा
सामाजिक
तिचं घर कसं शांत आहे......!!
सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१९
मी त्या घराला गेली दहा वर्ष ओळखतीये. त्या घरात तिघेजण राहतात. नवरा, बायको आणि त्यांची मुलगी.
इतक्या वर्षात मी कधीही त्या घरातून बाहेर आवाज आलेला ऐकला नाही. कधी कसला आरडा ओरडा नाही, आदळ आपट नाही. मुलगी आता मोठी झालीय, पण लहान होती तेव्हाही कधी तिचा दंगा बाहेर ऐकू आलाच नाही.
आताही त्या मुलीचं, उगाच ओरडणं, मोठ्याने बोलणं, काहीही नाही.
ही माणसं घरी आहेत की नाही, हे ही कळत नाही बरेचदा.
एवढं शांत घर कसं असू शकतं एखाद्याचं??
मला नेहमी प्रश्न पडतो, कारण आमचं घर सतत या ना त्या कारणाने दणदणतच असतं. बाकीच्या घरांचाही बऱ्यापैकी आवाज असतो.
पण हे घर वेगळंच.......!!
नवरा बायको दोघंही नोकरी करतात. असंही चित्र नाही की नवराच कमावतो आणि बायको त्याच्या आज्ञेत राहते म्हणून एकदम शांतता. अशीही घरं बघितलीयेत. नवऱ्यानेच बोलायचं आणि बायकोने फक्त ऐकायचं.
पण या घरात तर बायकोही चांगली कमावणारी!!
कधीच एकमेकांचं एकमेकांना काही खटकत नाही असं कसं??
आमच्याकडे तर कधीकधी झिंज्या उपटायच्या बाकी राहतात फक्त!!
मुलगी नेहमीच कशी चांगली वागते, किंवा कधी त्रास दिल्यावर एवढ्या हळू आवाजात कोण; कसं ओरडत असेल तिला??
आमच्या पोरांनी तर घशाचं मातेरं करून टाकलय आमच्या!!
कधी कुणी रागावलंय, चिडलंय, मोठ्याने ओरडलय असं त्या घरात आजपर्यंत बघितलंच नाही.
कुठली वखवख अशी ती नाहीच!! चेहरे ही बघावं तेव्हा हसतमुख, समाधानी!!
इतरांशी देखील ते चांगले बोलून -चालून- हसून असतात, त्या घरातल्या बाईला कधी कोणाच्या नावाने बोटं मोडताना देखील पाहिलं नाही मी कधी!!
बाहेरही कुणाशी कधी त्या कुटुंबाला मी भांडताना पाहिलं नाही. सहज पण नाही आणि कारणं उकरून उकरून पण नाही.
अशीही माणसं असतात हा विश्वास मला त्यांच्याकडे पाहूनच बसला!!
दहा वर्षात इतकं कुतूहल जागृत झालं म्हणता, एक दिवस त्या बाईला पकडून विचारलंच.......
बहुत दिनोंसे एक बात मुझे बडी खाये जा रही है, आखिर तुम्हारे घरमें इतनी शांती कहासे है?? क्या राज क्या है इस शांतीका??
तुमच्या घराचा कधीच कुठूनही आवाज कसा नसतो? तुम्ही सगळे इतके समजूतदार कसे??
ती हसली आणि म्हणाली, कसलाही राज नाही.
अगं, तुमच्या सगळ्यांच्या घरात जे होतं, ते थोड्याफार प्रमाणात आमच्याही घरी होतं. पण ते आम्ही बेतास बातच राहू देतो. कुठलीही गोष्ट खेचत ताणत बसत नाही. त्रागा करून घेत नाही. जरा काही कचकच सुरू झाली की आमच्याला एकजण म्हणतोच, घर शांत राहू द्या.
माझ्या आईने दिलेलं देणं आहे ते. आम्ही भावंडं भांडू लागलो, किरकिर लागलो, वडिलांचा आवाज चढला, तर ती लगेच म्हणायची, जे काय आहे ते आटोपतं घ्या, घर शांत राहू द्या.
हे डोक्यात इतकं बसलय की अशी काही वादविवादाची वेळ आली की लगेच आईच आठवते मला, आणि सगळं आटोपतं घेऊन घर शांत केलं जातं.
आता माझ्या घरातही सगळ्यांना याची सवय झाली. कोण ना कोणतरी घर शांत करतच.
आणि आम्हाला आमच्यामुळे दुसऱ्यांमध्येही कुठे अशांती पसरावी असं वाटत नाही, म्हणून शक्यतो कोणाच्या मध्ये आम्ही पडत नाही. चांगलं लक्षात ठेवायचं, वाईट विसरून जायचं.
ती बोलत होती, मला खरं तर खूप आश्चर्य वाटत होतं. आतापर्यंत बरंच चांगलं-चुंगलं बऱ्याचजणांकडून ऐकलं होतं. पण प्रत्यक्षात आचरणात आणणारी माणसं पहिल्यांदाच भेटली होती मला.
तिला म्हटलं, खरंच कौतुक आहे ग तुम्हा साऱ्यांच!! आम्हाला तर शांतीच टोचायला लागते, असं झालंय आमचं. तुमच्यासारखं वागणं या जन्मात तरी जमणार नाही बहुतेक आम्हाला.
आरडा-ओरड केल्याशिवाय कोणी आपलं ऐकतं यावर विश्वासच नाही आमचा. शांत बसा हे सांगायला आणि ते समोरच्याला ऐकू जायला पण जोरात केकटावं लागेल आम्हाला.
पण तुमचं चालू दया......
आम्ही आपली साधारण माणसं, तुमच्यासारख्या देवमाणसांकडे बघून शिकण्याचा प्रयत्न चालू ठेवू, कधीतरी प्रयत्नांना फळ मिळेलच की!!
ती म्हणाली, नक्की मिळेल. पण प्रत्येकाचं घर वेगळं असतं ग, जसं आहे तसं आनंदाने स्वीकारावं, म्हणजे आपोआप शांत होईल!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल
लेख आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा, आणि शेअर करताना नावासकट शेअर करा.
Previous article
Next article