मराठी कथा
सामाजिक
स्त्रीवादी
सुनबाई, तू फक्त माहेरची नाती जपतेस.......!!
शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९
अगं तू तुझ्या मुलांना आमच्या नातेवाईकांकडे घेऊन गेली नाहीस तर त्यांची ओळख कशी होणार कुणाशी??
तू तुझीच माणसं धरून बसतेस फक्त!! तुझीच माहेरची नाती जपतेस, आमच्या नातलगांचं काय?
तुझी मुलं बघावं तेव्हा बाहेर जाऊन खेळत बसतात, त्यापेक्षा नातेवाईकांकडे नेशील तेव्हा त्यांना नाती समजतील, ते चार माणसात मिळून मिसळून घ्यायला शिकतील. कुटुंब काय असतं कळायला नको त्यांना??
ग्रीष्माच्या सासूबाई तिला बोलून दाखवत होत्या. हे त्यांचं नेहमीचंच होतं. काही झालं की पोरांना तू हे नाही शिकवत ते नाही शिकवत करत बसायचं.
पण आज ग्रीष्माने ठरवलच, त्यांना चोख उत्तर द्यायचं.
बरोबर आहे तुमचं. मुलांना फिरवलं की नात्यांची ओळख होते, त्यांना लळा लागतो. आवड निर्माण होते.
म्हणजे तुम्ही तर तुमच्या मुलाला लहानपणी खुप साऱ्या नातेवाईकांकडे फिरवलं असणार ना??
मग तुमचा मुलगा, घरी कोणी नातेवाईक आले की तोंड का हो फिरवतो? किंवा कधी तुमच्याच कोणा नातेवाईकांना चुकूनही फोन करत नाही. किंवा त्याने फोन केला नाही तर त्याचेही काका, काकू, मामा, मावशी, त्यांची मुलं ह्याचीही काही चौकशी करायला फोन करत नाहीत.
तुमचा मुलगा कधीच आपल्या पोरांना चल, आज माझ्या काकांंकडे जाऊ, आज आत्याकडे जाऊ म्हणून कौतुकाने नेत नाही, काही लहानपणीच्या आठवणीही सांगत नाही.
तुम्ही तर तुमच्याबरोबर प्रत्येक नातेवाईकांकडे फिरवलं असेल ना त्याला, तुमच्याकडेही येत असावेत ते, मग का बरं असं??
का नाही लळा त्याला कोणाचा??
तो आमच्याबरोबर आला ना, तर नक्की जाऊ आम्ही सगळ्यांकडे, जरा त्यालाही सांगा ना!!
आता राहिली माझ्या नातेवाईकांची गोष्ट.......
तुम्हाला तर माहितीच आहे, माझे सगळे नातेवाईक लांब गावाला राहतात. तरी त्यांची चार महिन्यातून एकदा इकडे चक्कर असतेच. माझ्या मुलांना भेटायला ते खास येतात.
गणपती, दिवाळी, मे महिन्याच्या प्रत्येक सुट्टीत आग्रह करून करून बोलावतात. आठवड्यातून किमान एकदा तरी फोन असतोच त्यांचा, हे तुम्हीही बघता.
का नाही लागणार माझ्या मुलांना त्यांचा लळा?? तुमच्या कुठल्याही नातेवाईकांचा मुलांच्या वाढदिवसाला साधा फोन पण येत नाही. आमचे तर बरेचदा गावाहून खास त्यांचं कौतुक करायला येतात.
लळा मुलांच्या वडिलांना असता, तर मुलांना आपोआप लागला असता!! हो की नाही??
जसा मला माझ्या मामा,मावशी,काका,काकू आणि त्यांच्या मुलांचा देखील आहे, जो माझ्यामुळे माझ्या मुलांनाही लागलाय.
आम्ही प्रसंगी भांडतो, पण पुन्हा तितक्याच ओढीने परत येतो, रुसवे फुगवे आमच्यातही होतात, पण तेवढ्यापुरते.
खरं तर तुम्ही हे सगळं तुमच्या मुलाला शिकवायला पाहिजे होतं, जे आज मला सांगताय.
आम्ही काय केलं आणि काय नाही केलं ते तुला सांगायची गरज नाही, ग्रीष्माच्या सासूबाई तिच्यावर जोरात ओरडतात.
तुम्ही सतत माझ्या चुका काढत नसता, आणि स्वतःच्या मुलाला सोडून, प्रत्येक गोष्टीसाठी मलाच दोष देत नसता ना तर मी हे बोललेच नसते.
मी आज तुमची एक चूक दाखवून दिली तर तुम्हाला एवढं लागलं, मग येता जाता काही झालं तरी माझ्याच नावाने खापर फोडत असता, तेव्हा मला किती लागत असेल याचा विचार कधी तरी करून पहा.
परक्याची पोरगी म्हणून तिला उगाच टोचत बसायचं, आणि आपल्या मुलाच्या दुर्गुणांची पण आरती ओवाळत बसायची, हे सोडून द्या आता!!
ग्रीष्माचा चढलेला पारा बघून तिच्या सासूबाई, चल माझी देवळात जायची वेळ झाली, तुझ्याशी कोण वाद घालत बसणार, म्हणून तडक निघून जातात.
आणि आपली ग्रीष्मा तिच्या जवळच्या मैत्रिणीला सासूबाईंची मज्जा सांगत आपल्या मनातला विस्तव शांत करते.
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article