मराठी कथा
सामाजिक
हा खेळ जीवाशी होतो........!!
रविवार, १ डिसेंबर, २०१९
चार वर्षांपूर्वी आमच्याकडे त्या बाई काम करायला होत्या. तेव्हा वय असेल त्यांचं पंचावन्नपर्यंत. हातात जादू होती त्यांच्या, खूप छान चव यायची जे बनवतील त्याला.
ओळख वाढली तशा आमच्या गप्पा सुरु झाल्या.
अशातच एक दिवस त्या त्यांच्या नातवाला घेऊन आल्या.
तीन वर्षाचाच होता फक्त. आला तसा माझ्या मुलीबरोबर खेळायलाही लागला.
त्यांना म्हटलं,आज आई नाही वाटतं याची घरात??
त्यावर त्या म्हणाल्या, पोराला आई नाही अन् बाप पण नाही.
मला एकदम कसंसच झालं. पुढे काही बोलवलंच नाही.
त्याच म्हणाल्या, तुम्हाला माहितच आहे; आम्ही त्या पटरीच्या पलीकडे राहतो. तुमच्या या साईडलाच आमचे कामधंदे सगळे. सारखं जाणं येणं असतं आमचं.
एक दिवस असाच कामाला जाताना ट्रेननं उडवलं की याच्या बापाला.........
पण पूल आहे की बांधलेला तिथे, मी म्हटलं.
हो पण सारखं कोण चढ उतार करणार त्यावरून??
निम्म्याच्या वर माणसं तर पटरी क्रॉस करूनच जातात बघा!!
त्याची आई पण अशीच गेली. नवरा गेल्यापासनं जरा भिरभिरली होती, काय डोक्यात घेऊन चाललेली कुणास ठाऊक, तंद्रीत होती, तिला पण असंच उडवलं की हो त्या ट्रेननं.......
दोघही सहा महिन्याच्या अंतरावर गेले.
हे पोरगं आठ महिन्याचं होतं, आई गेली तेव्हा आणि याची बहीण अडीच वर्षांची!!
तेव्हापासून मीच वाढवलं बघा त्यांना!! तिकडं गावाला आहेत आमची माणसं, पण इकडं मी एकटीच यांच्याकडं बघणारी.
माझे मालक पण नाहीत, त्यांनी त्यांचा जीव दारूत घालवला.
खूप वाईट झालं सगळं.......
पण आता तुम्ही मात्र शहाण्या झाला असाल नाही? पुलावरूनच ये जा करत असाल ना?, मीअगदी खात्रीने म्हटलं.
नाही ओ...... कुठलं? गुढघे भरून येतात माझे, त्यापेक्षा ती पटरीच बरी वाटते, त्या किरकिरत म्हणाल्या.
अहो, पण पटरी जीव घेते त्याचं काय?? एवढा अनुभव घेतलाय तरी शहाण्या नाही झालात तुम्ही, काय म्हणायचं तुम्हाला, मला खूप राग आला त्यांचा.
त्यांना म्हटलं, तुमच्या नंतर या पोरांकडं कोण बघणार सांगा बरं?? जरा थांबत थांबत चढायचं. एवढा कुठं मोठा डोंगर चढायचाय.
उलट तुम्ही तर दुसऱ्या लोकांना हटकलं पाहिजे, तुमचं भोगणं ऐकून सुधारले तर सुधारतील तरी!!
बोलायला सोप्प वाटतं ताई, पण सकाळच्या धावपळीच्या वेळी पटरीच बरी पडते हो.......त्या म्हणाल्या.
करा मग त्या पटरीलाच जवळ, गमवा जीव, अन् पोरं येऊ देत रस्त्यावर, शांती मिळेल तुम्हाला, माझा आवाज माझ्याही नकळत चढला.
त्यावर त्या म्हणल्या, रागवू नका हो. नाही बघणार त्या पटरीकडे, तुमचं म्हणणं काही चूकीचं नाही.
मी म्हटलं, तुम्हीही बघू नका, आणि दुसऱ्या कुणाला बघू देऊ नका. आपण सांगायचं काम करायचं, ऐकलं तर ऐकलं.
मी सुद्धा समजवायचं काम केलं, किती मनावर घेतलं त्यांचं त्यांनाच माहीत.
आता नाही काम करत त्या आमच्याकडे, पण अधून मधून दोन्ही नातवंडांना घेऊन भेटायला येतात. मी आपली त्या निघताना विचारते, सांगितलेलं लक्षात आहे ना??
त्यावर त्या मोठ्याने हो करून मान डोलावतात, म्हणजे मनावर घेतलं असावं बहुतेक, असं आपलं मला वाटतं.
हे सगळं आज लिहायचं, कारण म्हणजे, आज सकाळीच माझ्या फोनवर रेल्वेकडून हा मेसेज आला.
Crossing railway tracks is dangerous. Use FOBs & Subways for your safety - Western Railway
तेव्हापासून त्या बाईच सारख्या डोळ्यासमोर दिसायला लागल्या. म्हणून त्यांची कहाणी घेऊन आले तुमच्यासाठी.
गेल्या तीन वर्षांतच फक्त भारतात 50000च्या आसपास लोकांनी रूळ क्रॉस करताना जीव गमावला आहे.
रेल्वे स्टेशनवर अनाऊन्समेंट मधून सांगत असतात, तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचा जीव धोक्यात घालतात.
त्या बाईच कुटुंब जास्त शिकलेला नव्हतं.
पण बरेचदा चांगले शिकलेले, स्त्री पुरुष घाईपायी ट्रॅक ओलांडताना दिसतात, तेव्हा खरंच खूप राग येतो. बरेचदा तर काही शहाणे मोबाईलमध्ये बघत, मोबाईलवर बोलत ट्रॅक ओलांडताना दिसतात.
एवढा स्वस्त झालाय का जीव, असा बेफिकीरपणे
झोकून द्यायला, काय वाटतं तुम्हाला??
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article