पालकत्व
मराठी कथा
आई, मला सुंदर दिसायचंय ......!!
सोमवार, २ डिसेंबर, २०१९
आई, मी तुझं हे क्रिम लावून बघू?? रियाने अमृताला विचारलं.
नको ग, इतक्यात कुठलं क्रिम वगैरे नाही लावायचं चेहऱ्याला. तुझी स्किन बघ किती छान आहे, काही लावायची गरज नाही त्याला.
काय ग आई....?? तुझं हे असंच असतं नेहमी.😏
बरं ऐक ना, आपण ती पावडर घेऊया का ग, कालच मी नवीन ऍड बघितली, ती लावली की चेहरा एकदम गुलाबी गुलाबी दिसतो, रिया उत्साहाने म्हणाली.
अमृता म्हणाली, ते काही खरं नसतं अगं!! अन् शाळेत जाणाऱ्या मुलीला गुलाबी गुलाबी दिसून काय करायचंय ग??
आई, तू पण ना!! मला काहीच करून देत नाहीस, रिया वैतागून म्हणाली.
माझ्या वर्गातल्या मुली रोज नवीन नवीन गोष्टी सांगत असतात. आज या कलरचं नेलपॉलिश घेतलं, हे नवीन क्रिम आणलं, असलं लायनर आणलं, तू तर कधी साधी लिपस्टिकही मला लावून देत नाहीस. काय तर म्हणे, नॅचरल लूक सर्वात चांगला!!
हो, नाही देत मी तुला करून काही. कारण आत्ताशी तू आठवीतच आहेस.
जरा नीट निरखून बघ, तुझ्या चेहऱ्यावर या अवखळ वयाचा छानसा ग्लो आलाय. तुझ्या या वयात तो खूप शोभून सुद्धा दिसतोय. मग ओरिजिनल आहे ते घालवून क्रिम आणि पावडरचं लेपण लावून नैसर्गिक आलेला तजेला का घालवायचा बरं??
मला तुझ्यातली निरागसता जपावी वाटतेय, तू छानशी लहान बाहुलीच दिसावी वाटतेस ग.....मोठं झाल्यावर फासशीलच की लिपस्टिक, मी थोडीच अडवणार आहे तेव्हा??
पण या वयात आहेस तशीच छान आहेस. ते ते वय घेऊन मिरवावं माणसांनी!! उगीच कशाला पुढच्या वयात इतक्यातच उडी मारायची??
आई, पण मलाही सुंदर दिसावसं वाटतं ना ग??
हो ना, मग चेहऱ्यावर सदैव हास्य ठेव. खूप सुंदर दिसशील.
कितीही नट्टापट्टा केलास, आणि चेहरा दुर्मुखलेला असेल, तर काही उपयोग नाही. त्यापेक्षा काही केलं नाहीस, आणि एक छानसं हसू घेऊन बागडलीस, तर तुझ्याबरोबर समोरचा देखील प्रसन्न होईल.
आणि ऐकशील का??
या वयात ना, चेहरा सुंदर करण्यासाठी नको, तर मन सुंदर करण्यासाठी प्रयत्न कर, एकदा का मन सुंदर झालं की चेहरा आपोआप सुंदर होईल बघ.
काय करू मग मन सुंदर होण्यासाठी, तूच सांग??
सर्वात पहिले लायब्ररी सुरू कर. मोठी मोठी लोकं कशी घडली ते वाच. परवा त्या सुद्धा मूर्ती आल्या होत्या बघ KBC मध्ये, काय तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावर!! आणि ते सुद्धा कुठल्या वयात ते बघ??
सुंदर मनाच्या तेजाने त्यांचा चेहरा आपोआप सुंदर बनवला होता.
पुस्तकं आपल्याला घडवतात, समोर दिसणारी माणसं खूप काही शिकवतात. प्रत्येकाचं निरीक्षण करून त्यांच्यातलं काय उचलायचं अन् काय टाकायचं ते तुझं तूच ठरव. हिच योग्य वेळ आहे, तुझ्या घडणीची. सुंदर आचार विचार तुला नक्कीच सुंदर करतील.
आई, तू नेहमी लेक्चरच देतेस बघ, रिया हसून म्हणाली.
हो लेक्चर द्यायचंच वय आहे आता माझं, मग कसं थांबेन??
थोडं थोडं लेक्चर तर मिळणारच ना ग, लाडक्या मुलीला आई नाही सावरणार तर कोण मग??
पण आता एवढं लेक्चर झाडलंय, त्याचा काय उपयोग होतोय कोण जाणे, अमृता नाक उडवून म्हणाली.
आतापर्यंत तुझं कुठलं लेक्चर मी वाया घालवलंय सांग पाहू??
आजपासूनच सुरू करूया लायब्ररी, पण सुरुवात छोट्या पुस्तकांपासून करेन हा, रिया अगदी उत्साहात म्हणाली.
वा!! चालेल की, आता तुला आतून बाहेरुन सुंदर होण्यापासून कोणी अडवू शकत नाही बघ, असं बोलून अमृताने रियाला गोड पप्पी दिली.
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article