खमक्या पोरींची, खमकी आई......!!

त्या दिवशी नेहमीप्रमाणे मुलाला शाळेत सोडून घरी परतत होते, तर रस्त्यात मधेच बरीच गर्दी जमलेली दिसली.
काय झालं असेल, म्हणून कुतूहलाने जरा जवळ गेले, तर पंचविशीची एक पोरगी एका माणसाला चपलेने शिव्या घालत मारत होती. 
तोंडात एक सो एक शिव्या आणि हाताने चपलेचा मार, पायाने लाथा सुद्धा मारणं चालू होतं त्याला.
कुठेतरी बघितल्यासारखी वाटली, म्हणून आणखी जवळ गेले, मग तर खात्रीच पटली.
अरे, ही तर आमच्या राधाबाईंची धाकटी पोरगी!! अश्शी वाघीण बनलेली की तिला माझीच काय, इतर कुठल्याही बघ्याच्या मधे पडण्याची गरजच नव्हती. 
बाजूला उभ्या असणाऱ्या बाईला राड्याचं कारण विचारलं, तर म्हणाली काही तरी घाणेरडं बोलला तिच्याकडे पाहून म्हणून तुडवतीये त्याला.
असलं कौतुक वाटलं ना तिच्या हिमतीचं!!
म्हटलं अशी धमक सगळ्या पोरींच्या अंगात आली, तर कोणाची बिशाद वाकडी मान करून बघायची?

काही म्हणा बाकी राधाबाईंनी पोरींना एकदम रफटफ बनवलं खरं!!

या राधाबाई आमच्या सोसायटीमध्ये बऱ्याच वर्षांपासून, बऱ्याच जणांकडे घरकाम करायला येतात.
मी त्यांना गेली बारा वर्षं ओळखतीये. राधाबाईंना चार मुली. मुली लहान असतानाच त्यांचा नवरा गेलेला. राधाबाईंनी
एकटीने वाढवलं पोरींना. त्यातल्या तिघींची लग्न झाली होती. दोघी सुखाने नांदत होत्या. तिसरी सासुशी पटत नाही म्हणून आईकडे येऊन राहिलेली. चौथी लग्नाची होती.
आईसकट सगळ्या पोरी इतक्या फाटक्या तोंडाच्या की त्यांचा स्वभाव माहीत असणारी माणसं त्यांच्या वाटेला पण जात नाहीत. पुरुष तर पुरुष अगदी बायकापण त्यांना जरा दबकूनच असतात.

कामाशी काम ठेवायचं, बाकी तुमचं तुम्ही नि आमचं आम्ही हा त्यांचा कारभार!!

राधाबाईंनी नवरा गेल्यानंतर आपल्या कणखर आणि बोचऱ्या स्वभावाचं आवरणच बनवून ठेवलं होतं  स्वतःभोवती. मुलींनाही तेच शिकवलं. कोणी साधं बोलायला येतानाही दहा वेळा विचार करून आलं पाहिजे.
या स्वभावनेच त्यांना आजपर्यंत सुरक्षित ठेवलं. 
राधाबाईंना नाही यायला जमलं तर बरेचदा त्यांच्या दोन मुली येतात आलटून पालटून कामावर. आईसकट सगळ्या पोरींचाही खणखणीत आवाज आणि दणकट शरीरयष्टी. एक गुद्दा घातला की समोरचा बसलाच पाहिजे जागेवर!!

सासूला रामराम करून आलेली त्यांची तीन नंबरची पोरगी मला एकदा सांगत होती, घरात गरम झालं की मी रात्रीची खुश्शाल बाजलं टाकून बाहेर झोपते.
मी म्हटलं, भीती नाही वाटत का ग तुला?
त्यावर ती म्हणाली, ह्याs भीती कसली, हात लावायला येणाऱ्याचा मुडदाच बसवीन की चांगला!

तिचं बोलणं ऐकून मला वाटलं, आपण कधी होणार असं? 
खरं तर आजच्या काळात असंच असायची गरज आहे.
सगळ्या पोरी अशा खमक्याच असल्या पाहिजेत. नजरेत ज्वालाच हवीये, यांच्यासारखी.

काय असं वेगळं शिकवलं असेल, राधाबाईंनी आपल्या पोरींना?, मला बरेचदा प्रश्न पडायचा.
शेवटी त्यांना विचारलंच एकदा, काय खायला प्यायला घालून वाढवलो हो तुम्ही मुलींना?
तुमच्या सगळ्याच पोरी अशा धटिंगण टाईप कशा?
त्यावर त्या म्हणाल्या, आता मी काय वेगळं करणार ताई??आमच्यासारख्यांकडे असणार तरी काय??
मी तशी होते, म्हणून पोरी मला बघून बघून तशाच झाल्या.
वाऱ्यावर वाढल्यात माझ्या मुली........
पण तुम्ही बायका तुमच्या पोरींना गोंजारत बसता ना, तसं गोंजारलं नाही बघा कधी मी माझ्या पोरींना!!
तुम्ही बोलायला बोलता हो, पोरगा-पोरगी एकच. पण पोरींना सारखं जपत बसता. हे नको करू, इकडे नको जाऊ, असं नको वागू करत कुंपण घालत बसता.
मी तर बाई पोरींना, काय करू नका असं म्हटलंच नाही कधी. अहो, कुणाचा मार खाऊन आल्या की जवळ घ्यायचं सोडा, मारणाऱ्याला बुक्का घालून आल्याशिवाय घरात पण घ्यायची नाही मी. पोरी शिकल्या मग काय शिकायचं ते बरोबर.

मी म्हटलं, खरंय हो. आमच्या पोरींनी रफटफ बनायला आधी आम्हीच तसं बनलं पाहिजे. तुम्ही म्हणता तसं, त्यांची काळजी त्यांच्यावरच सोडली पाहिजे. 
तुमच्याकडूनच प्रेरणा घेऊन शिकलं पाहिजे आता आम्हाला!!

राधाबाई म्हणाल्या, आम्हाला तर वेळेनं शिकवलं बाई सगळं. पण तुम्ही वेळ येण्याच्या आत शिकून घ्या म्हणजे झालं.........!!

मी आपलं नेहमीप्रमाणे मान डोलावून त्यांना हो म्हटलं. 

कळायला तर सारं कळतंय आम्हालाही, पण का कोणास ठाऊक वळायला एवढं जड जातंय??


©️ स्नेहल अखिला अन्वित


फोटो साभार : गुगल
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel