यांची भाकितं किती खरी, किती खोटी??

ही पोरगी हिच्या मामाला भाजून खाणार!!
मी लहान असताना कर्नाटक की कुठून दोन दोनच्या जोडीत माणसं यायची, हातात देवाचा फोटो असायचा. अंगात भगवे कपडे असायचे. आणि दारोदार हिंडून, ज्याला त्याला पकडून ही लोकं भविष्य सांगत बसायची.
वरचं हे भाकीत सुद्धा असंच मी साताऱ्याला राहत असताना मला निर्देशून केलेलं.

मी असेन त्यावेळी पाच एक वर्षाची. अंगणात खेळत होते. वर वर्णन केलेले दोन महान आत्मे आले, माझा मामा कुठेतरी जात होता. त्याला थांबवलं, आणि त्याचं भविष्य तो नको नको म्हणत असताना सांगायला लागले. मला त्यांचं ते हेल काढून बोलणं इंटेरेस्टिंग वाटलं म्हणून मी जवळ गेले तर, त्यातल्या एकानं विचारलं ही कोण?
मामा म्हणाला, माझी भाच्ची.
तर त्याने लगेच तिथल्या तिथे भविष्यवाणी केली,  ही पोरगी हिच्या मामाला भाजून खाणार!! 

मामा हसायला लागला. मी मामाला विचारलं, मी तुला कशी खाईन, मी काय वाघ आहे का?
मामा म्हणाला, अगं भाजून खाणार म्हणजे तू मला खूप त्रास देणार, माझा छळ करणार.
हे ऐकून तर मला खूप रडायलाच आलं आणि त्या दोघा माणसांचा तर अस्सा राग आला की बास रे बास!!
काहीही कसे बोलू शकतात ही लोकं?

मी मामाला रडून रडून सांगितलं, मी असं कधीच करणार नाही. माझ्या मामाने मनावर नाही घेतलं म्हणून नशीब!!
एकतर त्यावेळी, मी माझ्या मामाकडे राहत होते, आजी- आजोबा, मामा-मामी, मावशी यांच्याशी माझी ऍटॅचमेन्ट आईवडिलांपेक्षा जास्त, मग असं कोणीही काहीही बोलावं हे मला त्या वयात पण आवडलं नव्हतं.
तो प्रसंग आज इतकी वर्ष झाली, तरी मी विसरू शकले नाहीये.

आता मी ठाण्यात राहते. इथे अशी ज्योतिष सांगत हिंडणारी माणसं येत नाहीत.
पण इकडे वाईट अनुभव आहेत ते लहानपणापासून आम्हाला आकर्षण वाटणाऱ्या आणि खूप आवडणाऱ्या वासुदेव म्हणून येणाऱ्या माणसांचे!!

लहानपणी साताऱ्याला वासुदेव हातातल्या छोट्या झांजा वाजवत आला, की आम्ही लहान मूलं पळत पळत जायचो, त्यांना बघायला. त्याचा तो वेष, डोक्यावरची मोराची पिसे असलेली टोपी खूप आवडायची आम्हा मुलांना. घरातून पैसे, तांदूळ किंवा काहीही  द्यायचे झाल्यास आम्ही भांडायचो मी देणार म्हणून.
आणि ते देखील खूप प्रेमाने ते घ्यायचे. आमचं नाव विचारायचे,आमच्या डोक्यावरून हात फिरवायचे.
त्यांच्या डोळ्यात मला नेहमी कृतार्थ भाव आणि प्रेमच दिसलेलं आठवतंय.
त्यामुळे वासुदेव ही खूप गोड आणि सुखावह आठवण होऊन बसलेली लहानपणीची.

मात्र आता इथे ठाण्यात तेच वासुदेव आले की मी खिडकी देखील बंद करते. मला माझी सकाळ खराब करून घेण्याची अजिबात इच्छा नसते.
कारण हल्लीचे वासुदेव स्वतःला महान ज्योतिषी समजायला लागलेत.

सकाळ सकाळी छान भजनं गात येतात, आपल्यालाही कौतुक वाटतं, म्हणून पोरांना दाखवायला उत्साहाने आपण खिडकीत न्यावं तर हे वासुदेव कशासाठी माहीत नाही पण भविष्यवाणी सुरू करतात.
एक मला म्हणालेला, तू तब्बेतीला सांभाळ. नीट जपून राहत जा.  बहुतेक मी अगोदर खूप बारीक होते म्हणून त्यांनी अंदाज बांधला, ही आजारी असणार. आपला घाव बरोब्बर वर्मावर बसेल. अन् बाई तुम्हाला कसं कळल म्हणून आणखी काही विचारत बसेल. आणि मग पैसे सुद्धा सुटतील.
पण तसं काही न होता, सकाळ सकाळी माझ्यात नकारत्मकता टाकली म्हणून माझ्या तो डोक्यातच गेला आणि मी त्याला जे काही खुषीने देणार होते ते ही दिलं नाही.

असाच दुसऱ्या खेपेला एक वासुदेव आला, माझी आई आली होती तेव्हा.
ती खिडकीत होती. मी बाजूलाच काहीतरी करत होते.
त्याला वाटलं ही माझी सासू असणार, म्हणून त्याने तिची नॉनस्टॉप प्रशंसा सुरू केली. तुम्ही लोकांचं खूप केलय. तुम्ही पुण्यात्मा आहात, तुम्हाला माणसं चांगली मिळाली नाहीत. तुमच्या जवळची माणसं तुमच्यावर सूड उगवतायत, वगैरे वगैरे.
त्याला वाटलं, त्याला सासू वाटलेली माझी आई खूष होऊन त्याच्या गळ्यात नोटांची माळ घालेल.
मला तर हसायला येत होतं त्याची नाटकं बघून, त्याच्या डायलॉगबाजीनंतर मी म्हटलं, लवकर निघा, नाहीतर त्यांचा सूड आता तुमच्यावर उगवीन बघा. महान ज्योतिषी मला शिव्या घालत निघून गेले.

माझ्या मैत्रिणीला सुद्धा असेच अनुभव आलेत. नवीनच लग्न झाल्यावर वासुदेव दारात आला, म्हणून ते दोघे त्यांच्या पाया पडले, तर वासुदेव महाराजांनी काय बोलावं, बाई सांभाळून ठेव नवऱ्याला, कोणी बाई याच्या मागावर आहे.
नवी नवरी माझी मैत्रीण काय वाटलं असेल तिला?
क्षणभर तरी मन सैरभैर होणार ना, असल्या ज्योतिषवाणीने!!

मी म्हणते, तुम्ही अभंग म्हणत येता, आणि समोर माणूस दिसला की तो अभंग सोडता, आणि त्याला काहीतरी वाईट, निराशाजनक वाटेल असं का बोलता?
बोलायचंय  तर चांगलं बोला ना, वाईट बोलून काय मिळतं? भले तुम्हाला ज्योतिष माहीत असेल, म्हणून ते समोरच्याच्या तोंडावर फेकलं पाहिजे असं काही आहे का?
आणि ज्योतिष वाईटच कसं सांगतं, चांगलं काही नाही सांगत का?
चांगलं बोलून समोरच्याचा उत्साह वाढवा की, ते बोलवत नसेल तर गप्प राहा, नुसतं हसा, छान आशीर्वाद द्या, आणि निघून जा.

मला खूप वाटतं हो, माझ्या पोराला वासुदेव दाखवावा, पण हल्ली वासुदेव पण दाखवण्यासारखा राहिला नाही. तोंडात तर अभंग आहे, पण आचरणात मात्र त्यातलं काहीच नाही.

मागच्याच आठवड्यात एका ग्रुपवर वसुदेवाची भविष्यवाणी ऐकून काळजीत पडलेल्या बाईची पोस्ट वाचली, म्हणून मला माझेही अनुभव मांडावेसे वाटले.

तुम्हाला आलाय का असा काही अनुभव चांगला, वाईट??
दोन्हीही अनुभव शेअर नक्की करा, कारण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. वाईट आहेत तर चांगलेही नक्कीच असतील!!

काय म्हणता??

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel