सूनबाईला काही कळतच नाही.......!!


श्रेयाचं सासर आणि माहेर दोन्हीही जवळच होतं. ती आणि शेखर एकाच एरियात राहणारे होते. तिथेच त्यांचं जमतं आणि दोन्हीकडून सर्वकाही व्यवस्थित असल्याने लग्न सुद्धा होतं.

लग्नानंतर काही महिने गोडीत जातात. मग छोट्या छोट्या, कधी मोठ्या मोठया कारणावरून सासु-सूनचे खटके उडायला लागतात.त्यामुळे दोघींही अती होण्याअगोदर वेगळं व्हायचं ठरवतात.

श्रेया आणि शेखर त्याच एरियात वेगळीकडे राहू लागतात.जवळच असल्याने श्रेयाच्या माहेरच्या, सासरच्या दोन्ही लोकांचं जाणं, येणं असायचं तिच्याकडे.तिच्याही फेऱ्या असायच्या दोन्हीकडे. सणासुदीला एकत्रच असायचे सारे. इतरवेळी देखील एकमेकांच्या घरी वस्तूंची, पदार्थांची देवाणघेवाण असायची. लांबून सारं काही गोड होतं.

एकदा अशीच श्रेया बाजारात गेली असताना तिला तिची आवडती मेथीची भाजी दिसते. अगदी मस्त हिरवीगार दिसत होती. बाजारभावापेक्षा कमी किमतीतच होती.तिला वाटतं चला आईसाठीही एक पेंढी घ्यावी. मग वाटतं, सासुबाईंकडे पण द्यावी का? 

पण नंतर विचार येतो, राहू दे त्या उगाच नाव ठेवत बसणार. पण ती भाजीवाली बाई मागेच लागते, घ्या घ्या चार  पेंढ्यांचे आणखी स्वस्त लावते घेऊन जा, आज घरी लवकर जायचंय, माल संपवून टाकायचाय लवकर.श्रेया मग चार नाही, पण तीन पेंढ्या घेऊन टाकते.चांगल्या मोठ्या मोठ्या होत्या त्याही.

संध्याकाळी शेखर आल्यावर त्याला म्हणते, कसली ताजी ताजी मेथीची भाजी मिळाली आज, ती सुद्धा स्वस्तात.एक पेंढी आपण करू, दुसरी आईला देऊन येते. तिसरीचं काय करू, बाजूवाल्यांना देऊ का रे?शेखर उत्साहाने म्हणतो, अगं आईकडे नेऊन दे की,  मेथीचे पराठे किती छान करते ती!! नको बाबा, तिला काही माझी भाजी आवडणार नाही, उगाच नाव ठेवत बसेल.तू ना, मनात नेहमी वाईटच आणतेस माझ्या आईबद्दल. सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. नको देऊ जा, तुझ्या पेंढीविना काही अडणार नाही माझ्या आईचं!! शेखर तिच्यावर नाराज होतो.
बरं बाबा देते नेऊन , खूष?  

श्रेया मग एक पेंढी आईला आणि एक सासुबाईंकडे नेऊन देते. सासूबाईंना पेंढी देताना आठवणीने सांगते, शेखर म्हणतो; माझ्या आईच्या पराठयाची चव कोणालाच जमत नाही.
सासूबाई हसून हो का? म्हणतात.

इकडे घरी येऊन शेखरला म्हणते, मजा आहे बाबा उद्या एकाची, आईच्या हातचे पराठे खायला मिळणार!!

दुसऱ्या दिवशी सकाळीच श्रेयाच्या आईचा फोन येतो, छान होती पेंढी!! काल रात्रीच बनवून सुद्धा टाकली मी. गावची होती वाटतं, चव छान झाली होती भाजीची.
पाला पण अगदी कोवळा होता बरं का! तुझ्या बाबांनी तर अगदी चाटून पुसून खाल्ली भाजी. मी म्हटलं, पोरीने आणून दिली भाजीची पेंढी.
तर म्हणाले, पोरीला भाज्यातलं चांगलं कळायला लागलंय बरं का!!

श्रेयाला खूप छान वाटतं. बरं झालं आईला पेंढी दिली ते.

सासूबाईंंचा काही फोन येत नाही. तिला वाटतं,  जाऊ दे पराठे बनवण्यात बिझी असतील, दुपारी डायरेक्ट पराठेच येतील.

शेखरचा फोनही येऊन जातो, आले का ग आईकडून पराठे. मला ठेव हं, सगळे खाऊन टाकू नको. नाहीतर चव लागेल आणि माझी आठवण सुद्धा राहणार नाही.श्रेया म्हणते, अजून काही नाही आले तुझे पराठे. पोरगा  संध्याकाळी येणार म्हणून तेव्हाच पाठवायचा बेत दिसतोय.तू नेहमी अशीच तुसड्यासारखं बोलतेस, म्हणून शेखर फोन ठेऊन देतो.

संध्याकाळ टळून जाते, रात्रीच्या जेवणाची वेळ येते. फोनही नाही आणि पराठेही येत नाहीत म्हणून श्रेयाला वाटतं चला  आपणच बघूया फोन करून, सर्व ठिकठाक आहे ना?

बाकी सर्व बोलणं होतं, सर्वकाही ठिकही असतं, पण पराठ्याचा विषय काही निघतच नव्हता. म्हणून मग श्रेयाच तो काढते. 

श्रेया- काय बनवलं मग मेथीचं? होती का बरी?

सासूबाई- कुठून आणलेलीस ग?

श्रेया- अहो त्या नाक्यावरून, का काय झालं?

सासूबाई- आपल्या नेहमीच्या भाजीवल्याकडे नव्हती का?

श्रेया- नाही, मला त्या एका बाईकडे एकदम  फ्रेश वाटली, म्हणून आणली, काय झालं हो?

सासूबाई- केवढ्याला दिली?

श्रेया- अहो तिला लवकर जायचं होतं ना, म्हणून बाजारभावापेक्षा स्वस्त दिली खूपच.

सासूबाई- तरीssच, वाटलंच मला.

श्रेया- का हो, काय झालं?

सासूबाई- अगं, काय ती पेंढी होती?

श्रेया- का? आमची तर चांगली होती.

सासूबाई- छे, किती ती माती त्यात, कितीतरी वेळा धुवावी लागली.

श्रेया- अहो, गावाकडची होती ना, मग जास्त माती असणारच!

सासूबाई- कसली गावाकडची, फसवलं तुला!

श्रेया- काsय?

सासूबाई- किती तो बारीक पाला, निवडून हात अगदी दुखून आले माझे. वैताग आला निवडायचा नुसता.

 श्रेया- हो का?

सासूबाई- मग काय? तासभर गेला त्यात. परत चिरता देखील धड येईना.

श्रेया-  शेखर म्हणत होता......

सासूबाई- ती धुऊन, निवडून आणि चिरून एवढं दमायला झालं, कसाबसा कांदा कापला आणि टाकली एकदाची फोडणीत.चवीला सुद्धा काही खास नव्हती.

श्रेया- बरं.....

सासूबाई- परत नको आणत जाऊ बाई, आणि आणली तरी मग मला पाठवू नकोस. तुला काही कळत नाही त्यातलं. 

श्रेया- ठिक आहे.

सासूबाई- शेखरला म्हणावं, पुढच्या आठवड्यात बाजारात जाऊन मी बरोब्बर हवी तशी पेंढी घेऊन येईन, आणि मग पाठवीन पराठे.आता सध्या तरी मेथीकडे बघावंस पण वाटत नाही बाई!!

हे सगळं ऐकून श्रेयाचे डोळे भरून येतात, ती ओके म्हणून मोबाईल ठेवते. मनात म्हणते, यांंचं तोंड जरा जास्तच कडू झालेलं दिसतंय.

तिच्या भरलेल्या डोळ्यांकडे बघून शेखर काय समजायचं ते समजतो आणि तिला कान पकडून सॉरी म्हणतो.

श्रेयाला खरंतर स्वतःचाच राग येत होता, ही काही पहिली वेळ तर नव्हती, हे त्याचं नेहमीचंच तर होतं.मग का आपल्याला सवय होत नाही त्यांच्या अशा वागण्याची, का वाईट वाटतं, का डोळ्यात पाणी येतं?

तू प्रसंगी दगड का बनत नाहीस रे मना, असं स्वतःला कितीही समजावलं तरी तिच्या डोळ्यात आणखी कढ जमा होत होतीच, खूप वेळ....... खूप खूप वेळ........

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel