पालकत्व
मराठी कथा
तू नाही हं शिकवायचस आम्हाला........!!
बुधवार, २२ जानेवारी, २०२०
काय रे अथर्व, तुला काय झालंय हल्ली? सारखा गप्प असतोस, जेवढ्यास तेवढं बोलतोस अगदी घरी. बाहेर मात्र मित्रांबरोबर भरपूर गप्पा मारत असतोस, बोलावलं तरी येत नाहीस घरी लवकर?? घरात आईवडिलांशी बोलायला तोंड का उघडत नाही रे तुझं??
काही नाही ग आई, असंच.
असंच कसं असंच? बिनसलय तरी काय तुझं?
काय बोलायचं तुमच्याशी? आणि तुम्ही बोलू तरी देता का?
तुम्हाला जे ऐकायचं असतं तेच जबरदस्ती बोलायला लावता मला. माझ्या मनातलं कुठे ऐकायचं असतं तुम्हाला?
काहीही बोलू नकोस हा अथर्व, तुझंच तर ऐकतो सगळं, जे मागशील ते सर्व देतो की आणखीन काय करायला पाहिजे?
मागेल ते सर्व देता, मात्र मला वागण्या-बोलण्याचं स्वातंत्र्य देत नाहीत. मी चुकलो तर भलं मोठं लेक्चर देता, पण तुम्हीही बरेचदा चुकता, ते दाखवून दिलं की तू कोण आला मोठा आम्हाला शिकवणारा असं बोलून गप्प करता.
मी चुक मान्य केली नाही की तुम्ही फटके मारुन ती मान्य करायला लावता, आणि तुम्ही चूक करता तेव्हा ती चूक ऐकण्याचीही तयारी नसते तुमची?
गप, उगाच वाट्टेल ते बोलू नकोस. आत्ताशी नववीतच आहेस, शिंगं फुटली का तुला लगेच? आमच्या चुका काढायला लागलास ते?
उद्या आणखी मोठा झाल्यावर काय करशील??
बघ आताही मी बोलतोय तर कशी गप बसवतेयस? असंच करता नेहमी तुम्ही. त्यादिवशी बाबांनी पण तेच केलं. मी पेन आणण्यासाठी पैसे मागितले तर खिशातून घ्यायला सांगितले, तेव्हा त्यांच्या खिशात सिगरेटचं पाकीट दिसलं. बाबांना म्हटलं, हे चांगलं नाही, त्रास होईल तुम्हाला, तर माझ्यावरच ओरडले. म्हणे तू नको शिकवू मला. हेच माझ्या खिशात सापडलं असतं तर तुम्ही माझ्या भल्यासाठी म्हणून चार थोबाडीत देऊन सांगितलं असतं ना? मग मलाही बाबांची काळजी वाटली म्हणून त्यांना बोललो तर त्यांनी मलाच फटकारून गप्प केलं?
त्यादिवशी आई तुला मी पालक पनीरची नवी रेसिपी सांगत होतो, तर कशी म्हणालीस, आता तूच मला शिकवायचा बाकी राहिलायस का? माझ्या मित्राकडे मी एकदा जेवलो होतो, तेव्हा त्याच्या आईने वेगळ्या पद्धतीने बनवलं होतं, मला खूप आवडली ती वेगळी चव. तुला ती पद्धत सांगावी म्हणून मी त्याच्या आईकडून रेसिपी विचारून घेतली, तर तू मला झटकूनच टाकलंस. काय बोलायचं मग तुमच्याशी?
जर काही सांगायला गेलो, की तुम्हाला मी शिकवल्यासारखं वाटतं, प्रत्येक गोष्टीत मला अडवता, माझं तोंड दाबता, मला नाही बोलावसं वाटत तुमच्याशी.
तुम्हाला माझं काहीच ऐकायचं नसतं, तुला कुठे काय कळतं, म्हणून मला डावलता सतत तुम्ही.
तुला माहितीये, माझ्या शाळेतल्या टिचर अशा नाहीत.
त्या दिवशी त्यांचं एक गणित चुकलं, आणि मी चूक दाखवून दिली तर, पूर्ण वर्गासमोर माझं कौतुक करून मला शाबासकी दिली. सगळ्यांना सांगितलं, अशी नजर पाहिजे म्हणून. त्या नाही म्हणाल्या, मला शिकवू नकोस!! त्यांनी त्यांची चूक मान्य केली.
आम्ही सारे मित्र मैत्रिणीही मोकळेपणाने एकमेकांच्या गुणदोषावर चर्चा करतो. म्हणून मला त्यांच्याशी बोलावं वाटतं. ते मला माझं मत मांडू देतात.
पण तुमचं असं नाही. एकतर्फीच आहे आपलं सगळं, तुम्ही बोलायचं आणि मी फक्त ऐकायचं. सवांद ज्याला म्हणतात तो नाहीच होत. मला नाही इच्छा होत मग तुमच्याशी बोलायची.
अथर्वच्या तोंडून एवढं सगळं ऐकून त्याच्या आईला खूप वाईट वाटतं. डोळ्याला मोठेपणाची झापडं लावून आपल्याच पोराच्या निकोप मानसिक वाढीकडे आपण दुर्लक्ष करत होतो, हे तिच्या लक्षात येतं.
ती त्याला जवळ घेऊन त्याची माफी मागते आणि म्हणते,
सॉरी रे बेटा, या दृष्टीने कधी विचार केलाच नाही आम्ही. डोक्यात आलंच नाही असं काही.
आमच्या लहानपणी देखील कोणाला काही सांगायला गेलं की तू नाही शिकवायचं आम्हाला म्हणून गप्प केलं जायचं. त्यावेळी आम्हालाही राग यायचा खरंतर. पण बघ ना, आता मोठं झाल्यावर आम्हीही तेच करायला लागलो. आज तुझ्या बोलण्यामुळे तुझ्या बाजूने विचार केल्यावर मला चूक कळली आमची.
बाबांशीही बोलेन मी. यापुढे तुझंही मत नक्कीच विचारात घेऊ आम्ही. आपणही एकमेकांच्या गुणदोषांवर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. एकमेकांशी चांगला सवांद साधायचा प्रयत्न करू. तुलाही योग्य-अयोग्य शिकवू आणि तुझ्याकडूनही शिकत राहू, जसं आत्ता शहाणपण शिकवलंस तसंच अगदी.
हो, मग माझ्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत, मी तुमच्याशी नक्कीच बोलेन त्यावर, आपण सर्व रोज चर्चा करू, अथर्वच्या अंगात आईच्या बोलण्याने पुन्हा एकदा उत्साह संचारतो.
काय मग, अथर्वच्या घरातल्या सारखं तुमच्याकडे तर घडत नाही ना?
जीवनातला प्रत्येक क्षण खरंतर आपल्याला काही ना काही शिकवतच असतो, पण आपणच अनेकानेक कारण देऊन ते शिकणं नाकारत राहतो. आणि स्वतःचं व्यक्तिमत्त्व खुजं करून टाकतो. मला तर वाटतं सर्वात जास्त आपल्याला कोण शिकवत असेल तर ती आपली मुलंच. कारण त्यांची सर्व ज्ञानेंद्रिय सतत उघडी असतात. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देता देता किती गोष्टींवर आपणही विचार करायला लागतो. कधी कधी तर त्या गोष्टी आपल्या डोक्यातही आलेल्या नसतात. तरीही बहुतेकदा "तुम्ही नाही शिकवायचं आम्हाला" म्हणून आपण त्यांना हाणून पाडतो.
बरोबर ना?
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल
हे वाचलं आणि लिहावंसं वाटलं😊
Previous article
Next article