प्रेमकथा
मराठी कथा
विनोदी
मी तुझा अन् तू माझी, काही झालं तरी!!
बुधवार, २२ जानेवारी, २०२०
अस्सं ना, जा मग आता तुला काय आणायचं असेल तर दुकानात जातो का बघ. सांगू नकोस मला, जरा ह्यांsव आणून दे आणि त्यांsव आणून दे- 🐓
नको जाऊस, मी पण उठते का बघ उद्या सकाळी, मग म्हणू नकोस मला, जरा चहा करून दे- 🐔
हा घेईन माझा मी बनवून, नको देऊ जा- 🐓
डबा पण देणार नाही, खा काय खायचं ते बाहेरच- 🐔
नको देऊस, पोरांच्या कंप्लेंटी सांगायला फोन करशील तर घेतो का बघ. पोरांना दमात घ्यायला बरोबर लागतो ग मी तुला?- 🐓
नको घेऊस जा. उद्या रात्री कारल्याचीच भाजी करुन जिरवतेच बघ कशी तुझी- 🐔
कर कर खुशाल कर, मी हॉटेलमध्ये जाईन मस्त- 🐓
जा जा किती दिवस जाशील बघू की? परवा दोडका आणि तेरवा पडवळ करते की नाही बघ- 🐔
कर कर, तुझही अडेलच माझ्याविना बघून घेईन तेव्हा चांगलंच- 🐓
मम्मी-पप्पा भांडून झालं असेल तर जेवायला बसूया का ?- 🐤🐤
हो तुम्हाला वाढते हा मी, गरम गरम!! बाकी कोणाला नाही, घेतील हाताने नाहीतर बसतील तसेच- 🐔
नको वाढू जा, घेईन माझा मी, गरज नाही कोणाची- 🐓
मलाही नाहीये, कळलंss- 🐔
शीs बाबा, आता हा गॅस का पेटत नाहीये? गेला की काय? आत्ताच जायला हवा होता? एवढी आमटी आणि भाजी गरम केल्यावर तरी जायचा ना?- 🐔
अगं मम्मी वाढतेयस ना? भूक लागली- 🐤🐤
हो हो, हे घ्या. बसा जेवायला- 🐔
मम्मी, हे काय गार डिचकं वाढलंयस? तूच म्हणतेस ना गरमागरम खावं आणि आता हे गार जेवण कसं जेवायचं?- 🐤🐤
अss, हो पण गॅस गेलाय आत्ताच- 🐔
मग?- 🐤🐤
मग काय? सिलेंडर बदलावा लागेल ना? मला भीती वाटते, मला नाही येत- 🐔
ओsह आणि पप्पाशी भांडण झालंय नाही का?- 🐤🐤
मुलांनो, सांगा तुमच्या मम्मीला, मी मदत करायला तयार आहे तिला. आम्ही असं काही मनात ठेवत नाही, आपल्या माणसाचं- 🐓
काही गरज नाही मदतीची. घेईन मी उद्या सकाळी कोणाकडून तरी- 🐔
पण मम्मी आम्हाला आहे ना, हे गारगुट्ट जेवण गिळवत नाहीये अगं- 🐤🐤
मुलांनो, मी देतो गॅस लावून. मम्मीला तेवढं विचारा, उद्या सकाळी चहा आणि डबा मिळेल का ते?- 🐓
हा हा देईन, पोरांसाठी म्हणून 'हो' म्हणतेय, नाहीतर काय नडलंय कुणावाचून?- 🐔
मी ही पोरांसाठी म्हणूनच 'हो' म्हणतोय बरं, नाहीतर माझंतरी काय अडलय कुणावाचून?- 🐓
अडलं होतं म्हणून तर आला होतास ना तेव्हा मागे मागे?- 🐔
मी लाख आलो असेल, तुझं काय नडलेलं म्हणून एका पायावर तयार झालीस??- 🐓
मम्मीss पप्पाss भूकsss- 🐤🐤
उठाss, द्या लावून तो सिलेंडर आता- 🐔
मग ते कारलं, दोडका, पडवळ सगळं रद्द झालं असं समजू ना?- 🐓
हो पप्पा सगळं कॅन्सल👍
तू पण मम्मी सांगेल ती काम करायची हा मुकाट्याने- 🐤🐤
ती तर करतोच की, पण कोणी उगाच फडफड केली तर इंगा दाखवायला लागतो- 🐓
कोण नाही घाबरत असल्या फुसक्या इंग्याला- 🐔
मम्मी पप्पा बास झालं तुमचं कौतुक आता. एकमेकांवाचून पान हलत नाही, कशाला उगाच भांडून एनर्जी घालवता??
तुमचे नेहमीचे डायलॉगही पाठ झालेत आता आम्हाला. पुढच्यावेळी असं बिनकामाचं भांडण करायचंच असेल तर काहीतरी नावीन्य आणता आलं तर बघा जरा, तेच तेच बोलून उगाच बोअर करता- 🐤🐤
हे तर जन्मोजन्मी पासून चालत आलेले डायलॉग आहेत, यात कसला बदल होतोय आता. जवळपास सगळ्याच घरात हेच चालतं. आमचं म्हणाल तर आम्ही दोघेही एकमेकांची गरज आहोत. आमचं नातं याच गरजेने फुललेलं आहे. आम्हाला दोघांनाही या नात्याची ओढ आहे, आणि गरजही आहे, म्हणूनच कितीही काही झालं तरी भांडून, तणतण करून का होईना आम्ही ते जिवंत ठेवतो.
जेव्हा कधी यातल्या एकाला दुसऱ्याची गरज उरणार नाही, तेव्हा सगळी भांडणच संपून जातील रे पिल्लांनो........!!
🐔💞🐓💞🐤🐤
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article