पालकत्व
मराठी कथा
सामाजिक
इवलासा जीव दबला जातोय की हो.......!!
सोमवार, २० जानेवारी, २०२०
बेला अगदी गोड मुलगी, बोलायलाही आणि वागायलाही!!
आत्ताशी आहे तिसरीत........
शाळा आहे तिची घरापासून साधारण तासाभराच्या अंतरावर. खूप मोsठी, साधंसुधं बोर्ड नाहीये, उच्च दर्जाचं बोर्ड आहे, ज्यात टाकल्यावर सर्वच मुलं एकदम हुश्शार बनूनच बाहेर पडतात. हे माझं नाही तिच्या आईचंच म्हणणं आहे बरं का!!
मुलांचं हुशारपण शाळेवर अवलंबून असतं, बोर्ड पण डिपेंड करतं. तिच्या आईने मला एकदा मोठं लेक्चर दिलेलं या सगळ्यावरून.
मी म्हटलं, मला नाही वाटत असं. माझ्या डोळ्यासमोर माझ्या नात्यातल्या एका मुलीचं उदाहरण होतं. ती खूप छोट्या खेडेगावात शिकून आता एका मोठ्या शहरात मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टवर आहे. जिथे काही सोयी सुविधा नव्हत्या अशा शाळेत शिक्षण घेऊन ती यशस्वी झाली आहे. तिच काय अशी बरेचजण आहेत. जी मुलं गावात राहतात, त्यांचं करियर काय होतच नाही का?? मी तर असे बरेच पाहिले आहेत.
पण बेलाच्या आईला माझं कधी काही पटतच नाही.
तर तिसरीतली ही बेला, सकाळी दोन तास क्लासला जाते. आणि क्लासवरून आली की लगेच जेवून शाळेत जाते. शाळेत स्कुलबसने सर्वांना घेत घेत वेळेवर पोचायला साधारण वेळेच्या आधी दोन तास निघावं लागतं.
त्यामुळे सकाळी तर बेलाला उसंतच नसते. संध्याकाळी येताना देखील ट्रॅफिकच्या कृपेने प्रवासात दिड कधीकधी दोन तास जातातच.
मग फ्रेश होऊन बेला खेळायला खाली जाते. सर्व मुलं जमून खेळ रंगायला सुरुवात होतेय ना होतेय, तोपर्यंत बेलाला अभ्यासासाठी बोलावणं येतं. बेला पाच मिनिटं पाच मिनिटं करता अर्धा तास काढते,आणि मग नाईलाजाने होमवर्क करायला निघून जाते.
याच बेलाच्या शाळेत नुकतीच परीक्षा झाली. त्यावेळेस तर या तिसरीतल्या बेलाचा दिनक्रम अगदी चाट पाडणारा होता.
नेहमीप्रमाणे दोन तास क्लास सकाळी नऊ ते अकरा, त्यानंतर शाळा, परिक्षा असूनही ती सुटणार नेहमीच्याच वेळेवर, घरी यायला साधारण सहा-साडेसहा. आणि आल्यावर लगेच सातला, परीक्षा म्हणून पुन्हा दोन तास क्लास. क्लासही घरापासून बऱ्यापैकी लांब. बेला रात्री साडेनऊपर्यंत घरी.
परीक्षा, साधारण मधल्या दोन तीन सुट्ट्या पकडून दहा दिवस सुरू होती. आणि ती सुरू व्हायच्या अगोदर पंधरा दिवस आधी परीक्षा म्हणून हा दोन वेळचा क्लास सुरू झाला होता.
तिसरीतल्या मुलीबरोबर चाललेलं हे बघणं खरच त्रासदायक होतं.
माझी स्वतःची मुलगी आठवीत आहे. परीक्षा कालावधीत ती बरेचदा क्लासला जातही नाही. तिला जास्त वेळ बसायचा कंटाळा येतो. आणि परीक्षेच्या अगोदर असा फक्त परीक्षेच्या मार्कांपुरता अभ्यास करणं मलाही पटत नाही. रोज तर तो केलेला असतोच ना. शाळेतही, क्लासलाही. मग परत कशाला? परीक्षा आहे म्हणून जास्त वेळ बसायचं आणि तेच तेच करत राहायचं. मूलं सुद्धा खूप कंटाळतात. परिक्षा काळात मुलांनी खरंतर मोकळं राहावं, असं आम्हाला तरी वाटतं. माझी मुलगी नेहमीसारखीच तितकीच खेळते, अभ्यास करत नाही म्हटलं तरी चालेल. आणि आम्हीही कर म्हणून सांगत नाही, होईल ते होईल.
याबाबतचा एक किस्सा माझ्या चांगलाच लक्षात राहिलाय म्हणून आज सांगावा वाटतो.
माझ्या मुलीची सातवीची वार्षिक परीक्षा होती. नेहमीप्रमाणे परीक्षा कालावधीत ती काही क्लासला गेली नाही. सलग तीन साडेतीन तास क्लास ठेवलेला परीक्षा होती म्हणून, विचार करूनच तिलाही आणि आम्हालाही जीवावर येत होतं.
तिच्या टिचरला वाटलं, बाकी विषय राहू दे, गणिताच्या विषयाला तरी ही येईल. पण ती त्यावेळीही गेली नाही. आणि संध्याकाळी तिच्या क्लासच्या टिचरने मला खूप रागाने फोन केला. तुम्ही इतर विषयांना तुमच्या जबाबदारीवर पाठवत नाही ठिक आहे, पण गणिताला पाठवायचं ना. प्रॅक्टिस होते, तेवढाच मार्कात फरक पडतो. असं वागून तुम्ही मुलीचं नुकसान करताय. मी म्हटलं, तिला नव्हतं यायचं तर जबरदस्ती कसं पाठवणार? आणि मी तुम्हाला दोष देणार नाही, कितीही मार्क पडू दे. तुम्ही रोज तिच्याकडून चांगला अभ्यास करून घेता, तेवढा खूप आहे. आम्हाला असा आदल्या दिवशी मान मोडेपर्यंत अभ्यास करण्यावर विश्वास नाही.
त्यावेळी माझं बोलणं जराही न पटून रागातच त्यांनी फोन ठेऊन दिला होता.
पण जेव्हा परीक्षा कालावधीत क्लासला न जाताही माझ्या मुलीचे मार्क बघितल्यावर, त्यातून गणितात असलेले उत्तम मार्क बघितल्यावर त्यांनी स्वतःहून फोन केला, आणि त्यावेळी तसं रागाने बोलल्याबद्दल माफी मागितली. त्या म्हणाल्या, आमच्यावर प्रेशर असत हो. पालकांना वाटतं, क्लासला लावलं म्हणजे, पोरांना आता भरपूर मार्क पडायला पाहिजेत. सगळं आमच्यावर सोपवून ते निर्धास्त होतात. आणि मग काही कमीजास्त झालं की आम्हाला नावं ठेवतात. एवढ्या फिया घेता आणि मार्क पडत नाहीत म्हणजे काय? शिवाय कितीही पडले तर ते समाधानी नसतातच. म्हणून तर परीक्षा असताना जास्तीचा क्लास घ्यावा लागतो. नुकतंच केलेलं विसरणार नाहीत म्हणून.
हे लिहिलंय ते अगदी शब्दशः खरं आहे. विदाऊट प्रेशर मुलं चांगली प्रगती करतात, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. फक्त त्यासाठी त्यांचा त्यांना वेळ द्यावा लागतो, हे नक्की.
म्हणूनच बेलासारख्या तिसरीतल्याच काय अगदी पहिली दुसरीतल्या मुलांनाही परीक्षेचा बाऊ करून दोन दोन वेळा क्लासला पाठवलं जातं, तेव्हा खरंच या पालकांची किव येते.
आपल्याच मुलांवर एवढा भार टाकून कोमेजून टाकावं का वाटतं यांना? फक्त अभ्यासात हुशार बनवण्यासाठी?
तशी हुशारी तर जन्मजात असतेच त्यांच्याकडे, ती नेमकी कशात जास्त आहे, हे थोड्या प्रयत्नाने, थोड्या पेशन्सने नक्कीच जाणून घेता येईल, मग एवढी घाई कशाला?? ते सुद्धा पोरांचे हाल करून??
आपण शाळेत जातो कशासाठी मार्क पाडून घ्यायला की काही जाणून घ्यायला?? रट्टा मारून मिळवलेले मार्क महत्वाचे की जे काही शिकतोय त्याचं आकलन होणं महत्वाचं??
अशा पालकांनी मुलांना, एखादं रट्टा मारलेलं उत्तर सविस्तर समजावून सांगायला सांगावं, मुलं समजावू शकलं तर छानच, नाहीतर शाळा-क्लास-परीक्षा याची धास्ती नक्की कशासाठी याचा विचार आवर्जून करावा.......!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल
शेअर करताना नाव गाळलं जाणार नाही, याची दक्षता नक्की घ्यावी.
Previous article
Next article