प्रेरणादायी
मराठी कथा
सामाजिक
जोडलेलं जपलं, म्हणून त्यांचं जगणं सजलं......!!
गुरुवार, ९ जानेवारी, २०२०
विभाताईंची पंचाहत्तरी अपेक्षेप्रमाणे दणक्यात साजरी झाली. कुठून कुठून माणसं आलेली, नात्यातली, बिननात्यातली, ज्यांना ज्यांना त्यांनी मदतीचा हात दिला होता; ती सारी माणसं खास आठवण ठेऊन विभाताईंचं कौतुक करायला आली होती.
कुणी म्हणत होतं, माझ्या मुलाला आज उत्तम नोकरी आहे ते विभाताईंमुळेच. एवढा कच्चा होता अभ्यासात, पण विभाताईंनी स्वतःहून त्याचा अभ्यास घेतला, आणि आज तो कुठल्या कुठे पोहोचला.
कुणी म्हणत होतं, माझा संसार सुरू आहे तो विभाताईंमुळेच. पहिल्या वर्षातच माहेरी आले होते मी नातं तोडून, पण ताईंनी ते जपायचं कसं याचे धडे दिले,आणि आज पंधरा वर्षे मी माझ्या संसारात सुखाने नांदतीये.
विभाताईंचा स्वभावच होता माणसं जोडायचा. आणि सुदैवाने त्यांना राजाभाऊंची साथही चांगली मिळाली. त्यांनी कधीही कुठल्या गोष्टीसाठी आडकाठी घेतली नाही. उलट ते स्वतः देखील विभाताईंच्या पावलावर पाऊल ठेऊन वागायला लागले होते.
मुंबईसारख्या शहरात राहून धकाधकीचं जीवन जगून सुद्धा त्यांच्याकडे दुसऱ्यांसाठी वेळ होता. दोघेही हाडाचे शिक्षक होते. ज्या गोष्टी शिकवायचे, त्या गोष्टी स्वतःच्या अंगात असणे, हे त्यांना खूप महत्वाचे वाटायचे.
त्यांची मुलंही त्यांच्याकडे बघूनच शिकत होती. परोपकार त्यांच्याही अंगात भिनत होता.
फारसं मोठं नव्हतं घर, छोटं पण सर्वांना सामावून घेणारं होतं.
नेहमी माणसांनी भरलेलं असायचं. एकटेपणा कधी अनुभवलाच नाही त्या घराने.
विभाताई वेळ असेल त्याप्रमाणे प्रत्येकाच्या हाकेला ओ द्यायला तयार असायच्या.
आज कोणाला दवाखान्यात जायला सोबत म्हणून तर कोणाला नुसती फिरायला जायला म्हणून सोबत.
कोणाला ऍडमिशनसाठी माहितगार म्हणून तर कोणाला बँकेतल्या कामासाठी सोबत.
कधी त्यांच्या घरी नातलगांची मुलं शिक्षणासाठी गावाहून राहायला आली असायची, तर कधी चांगली नोकरी शोधण्यासाठी. विभाताईंचं मुंबईतलं घर सर्वांच्या हक्काचं होतं.
कारण ते घर मनात कुठलाही किंतु परंतु न आणता सर्वांचं स्वागत करत होतं.
मी यांचं का करावं, यांनी माझं काय केलंय?, असले प्रश्न विभाताईंनी आणि राजाभाऊंनी कधी मनात आणलेच नाहीत.
एकदा माणूस त्यांच्या घराशी जोडला गेला की तो कायमचा त्या घराचा होऊन जाई. त्यांनी जोडलेलं मनापासून जपलं, घरातलं सुद्धा अन् बाहेरचं सुद्धा.
एवढं सोप्प नक्कीच नसतं, असं जोडलेलं प्रत्येकवेळी जपत बसणं, काहींनाच जमतं ते.....अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच असतात असे!!
स्वतःचा अहंकार सोडून दुसऱ्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांना आपल्याबरोबर चालतं ठेवणं, हे विभाताईंसारखं मोठं मन असणाऱ्यांनाच जमण्यासारखं........
त्यामुळे पुढे राजाभाऊ गेल्यावर, मुलं नोकरीनिमित्त परदेशी स्थायिक झाल्यानंतरही विभाताईंना कधीच त्या जोडलेल्या नात्यांनी एकटं पाडलं नाही. हवापालट म्हणून कुणी त्यांना हट्टाने आपल्या गावी घेऊन जायचं तर कुणी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना घेऊन जायचं. कुणी दिवसा सोबतीला तर कुणी रात्रीच्या आधारासाठी थांबायचं.
त्यांची पंचाहत्तरी साजरी करण्याचं त्यांच्या मुलांनी जरी ठरवलं होतं तरी त्यांच्याशी जोडलेल्या प्रत्येकाने त्यात खारीचा वाटा उचलला होता.
त्या सोहळ्यात त्यांच्याविषयी प्रत्येकाला किती बोलू अन् किती नको असं झालेलं. प्रत्येकाचं मन भरून येत होतं.
मुलांना तर आईचा खूप अभिमान वाटत होता आणि तो अभिमान त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीवही करून देत होता.
म्हणूनच त्यांनीही लवकरच आम्ही बाहेरच्या देशातल्या नोकरीला कायमचा बाय बाय करून इथेच स्थिरावणार आहोत, अशी आनंदाची बातमी पंचाहत्तरी निमित्त आपल्या आईला दिली.
तुमच्यासारखं जगायला जमणं अवघड आहे खरं, पण आम्ही प्रयत्न नक्कीच करू, अशी हमी द्यायला देखील ते विसरले नाहीत.
मुलांनी आपल्या पावलावर पाऊल ठेऊन स्वतःहून चालणं, ह्यापेक्षा मोठा आनंद तो काय असणार, विभाताईंना अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं!!
ह्या विभाताई माझ्या ओळखीतल्याच आहेत, तुमच्याही माहितीत अशी माणसं असतील तर नक्की कमेंटमध्ये उल्लेख करा, आताशा अशा माणसांकडून प्रेरणा घेणं गरजेचं झालंय. जोडलेलं प्रत्येक नातं मनापासून जपणारी माणसं दुर्मिळ होत चाललीयेत दिवसेंदिवस.......
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article