प्रेमस्वरूप ही आई...........!!

कोणी म्हणेल का ग, तुला माझी सावत्र आई?
कुठून घेऊन आलीस एवढं सारं प्रेम माझ्यासाठी??
बाबा ज्या दिवशी तुला घेऊन आले तो दिवस अजूनही आठवतोय मला!!
मला जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवताना डोळे भरले होते तुझे.
पण मी तेव्हा तुझ्या डोळ्यातल्या भावना समजण्याएवढी मोठी नव्हते ना!!
मला अजिबात आवडली नव्हतीस तू!!
सारखी देवबाप्पाला सांगायचे हिला घेऊन जा, आणि माझ्या आईला परत दे.
कित्ती छान बट वेण्या घालायचीस ग, सगळ्या मैत्रिणींना खूप आवडायच्या. त्यावर स्वतःच्या हाताने तयार केलेला मोगऱ्याचा गजरा लावायचीस.

त्या सुगंधात मी कधी हरवले आणि तुझ्या पाखरमायेच्या कुशीत कधी विसावले कळलंही नाही.

आता तर तुझ्या ओढीने माहेरी येते, आणि जेव्हा तुझ्या प्रेमाच्या फुलांचा गजरा घालतेस ना, तेव्हा तुझ्याकडे न बघताही तुझे सारे भाव माझ्या हृदयापर्यंत पोचतात, अन् तुझ्याबरोबर माझेही डोळे भरून येतात ग आई!! ``

पुरे झालं ग, नको करू एवढं कौतुक माझं. मी काही वेगळं केलं नाही.
गौरी, जशी तुला आईची गरज होती तशीच मलाही मातृत्वची ओढ होतीच की ग!! त्या ओढीपायीच मी तुझ्या आईची जागा घेतली. तू होतीस म्हणून मला कोणीतरी आई म्हणालं.
नाहीतर माझ्या नशिबातच नव्हतं ग ते. एवढे दिवस मी तुला कधी सांगितलं नाही, पण माझ्यात कमतरता होती, मी कधीच आई होणार नव्हते. 
अगं म्हणूनच घोडनवरी झाले होते तरी माझं लग्नच ठरत नव्हतं. घरच्यांचं म्हणणं होतं, की जे काही आहे ते खरं सांगूनच लग्न करायचं. आणि खरं सांगितलं तर कोणी माझ्याशी लग्न करायला तयारच होत नव्हतं.
वंश न चालवू शकणारी स्त्री कोणालाच नको होती........
अशातच तुझ्या बाबांचं स्थळ आलं, ज्यांना मुलीसाठी आई हवी होती.
आम्ही सर्व खरं सांगितलं, आणि आम्हाला अपेक्षा नसतानाही त्यांनी मान्य देखील केलं.

माझ्या घरच्यांचा तर विश्वासच बसत नव्हता. असं माझ्या कमतरतेसकट कोणी मला स्वीकारू शकतं, हे त्यांना पचायला खूप जड जात होतं. तुझ्या बाबांनी हो म्हणून सुद्धा  त्यावेळी माझ्या घरचे त्यांना खोदून खोदून विचारत होते.
तुम्ही नंतर शब्दाला फिरणार तर नाही ना? आमच्या मुलीला सोडणार नाही ना? तुम्हाला तर एक मुलगीच आहे, मुलगा व्हावा अशी इच्छा आता नसली तरी पुढे निर्माण होणार नाही ना?
तुझ्या बाबांनी तेव्हा निक्षून सांगितलं, मी तुमच्या मुलीकडून कसलीही अपेक्षा करणार नाही फक्त तिने माझ्या मुलीची आई बनावं.
अगं, हे जेव्हा कळलं ना तेव्हाच, त्याच क्षणी मी मनाने तुझी आई झाले होते. तुला मी पाहिलही नव्हतं त्यावेळी.
अन् जेव्हा पाहिलं तेव्हा तर अमाप वात्सल्य दाटून आलं मनात. तुला प्रेमाने जवळ घेतलं, तुझ्या डोक्यावरून मायेचा हात फिरवायला गेले तर तू मला झटकून दूर पळालीस.

हो, कारण मला दुसरं कोणी नको होतं माझी आई म्हणून. मला फक्त माझीच आई पाहिजे होती. 

किती रडायला आलेलं मला त्यावेळी गौरी, मी आसुसले होते ग तुला बिलगायला, तुझ्याकडून आईची हाक ऐकायला, कान किती आतुरले होते माझे.......

हो ना मला आठवतंय, तू सारखी माझ्या मागे मागे करायचीस, आणि मी तुला टाळत रहायचे. तुझ्याकडून काहीच करून घ्यायचे नाही मी. तुझ्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवायचे. रोज बाबांना तुझ्याविषयी काहीतरी खोटं सांगायचे. 

तुझ्या बाबांना माझी तळमळ दिसत होती, त्यांना कळत होतं माझं रितेपण. जे फक्त तुझ्या आई म्हणण्यानेच भरून येणार होतं!! 

पण आई, तुझं प्रेम जिंकलच शेवटी!! तो टायफॉइडचा ताप काय आला, आणि मी विसरूनच गेले की तू माझी खरी आई नाहीस.
फक्त तुझ्यामुळे मी वाचले आई. रात्रंदिवस माझ्याजवळ होतीस तू, तहानभूक सारं विसरलेलीस. किती किती जपलंस मला. ते दिवस तर मी कधीच विसरू शकणार नाही.

तूच काय मीही विसरू शकणार नाही, गौरी. तापातून उठल्यावर तू मला पहिल्यांदा आई म्हणून हाक मारून बिलगलेलीस, ती मिठी अजूनही तशीच हृदयात जपून ठेवलीय मी. तू इथे नसताना कधी तुझी आठवण आली की डोळे मिटून मी ती मिठी अनुभवते. मला आई बनवणारी ती मिठी, माझ्यासाठी आजही सर्वात मौल्यवान आहे.

आई, तेव्हा नाही कळली मला तुझी तळमळ, पण आता कळतेय. मीही तुझ्यासारखीच आसुसलीये ग. 
लग्नाला सात वर्षे झाली तरी अजून का ग कुणी येत नाही माझ्या पोटी.
मी तुला खूप त्रास दिला म्हणून तर नाही ना मिळतीये मला ही शिक्षा??

वेडी आहेस का गौरी तू? ते तर सारं अजाणतेपणी झालं तुझ्या हातून. अगं तुझ्याबरोबर कधीही काही वाईट होणार नाही. माझे भरभरून आशिर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. तू मला आई केलंस. केवढं मोठं दान दिलंस तू मला. माझा प्रत्येक श्वास तुझ्यासाठी सुख मागतो, जे तू मला दिलंस ते तुला मिळणारच, विश्वास आहे माझा.

पण कधी आई? अजून किती वाट पहायची मी?

माझ्या बाबतीत तर अशक्य असताना तुझ्यामुळे शक्य झालं. मग सारं काही सुरळीत असताना तुझ्या बाबतीत का नाही होणार सांग?

गौरीकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, तिच्याकडे फक्त आशाच होती. पण तिच्या आईचा मात्र विश्वास होता, माझी मुलगी अशीच राहणार नाही, तिला तो आनंद नक्कीच मिळणार.
त्यासाठी ती रोज मागणं मागायची, रोज व्याकुळ होऊन त्या विधात्याला साद घालायची, माझ्या मुलीकडे बघ, तिचं सुख तिला मिळू दे, माझं तिच्यावरचं प्रेम खरं असेल तर, नक्कीच तुला माझं ऐकावं लागेल. 

म्हणतात ना, प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपण पाहिजे ते घडवून आणू शकतो.

तसंच झालंही.......
पुढच्या दोन महिन्यातच गौरीला दिवस राहिले, ही बातमी तिच्यापर्यंत पोचली, आणि तिला आनंदाने वेड लागायचं फक्त बाकी राहिलं होतं.
आपल्या प्रेमाचा वास्ता दिल्यावर, त्या विधात्याला हे घडवून आणावचं लागणार; तिला चांगलंच माहिती होतं!!

गौरीचं बाळंतपण तिने मोठ्या हौसेने केलं, कशाची कमी पडू दिली नाही तिला. तिची लगबग बघून गौरीचे डोळे तर सारखेच भरून यायचे. म्हणूनच बाळंत झाल्यावर जेव्हा बाळ हातात आलं, तेव्हा गौरीने तिच्या चिमुरडीला पहिले तिच्या आईच्या उराशी लावायला दिलं. आई, तुझं दान आहे हे, तुझ्यामुळे मला मिळालेलं. तुझी छाया पहिली पडू दे तिच्यावर, तुझीच छबी तिने घ्यावी, तिला पाहता तूच डोळ्यासमोर यावीस, मलाही तुझं आईपण 
अनुभवता यावं, तिच्या रुपाने जणू तुलाच माझ्या कुशीत सामावून घेतीये असं वाटावं. आई, तिने माझ्यासारखं नाहीच फक्त अन् फक्त तुझ्यासारखचं निर्व्याज प्रेम करणारं व्हावं.........!!!

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

शेअर करावसं वाटल्यास नावासकटच करावं😊


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel