मराठी कथा
सामाजिक
पैसा नक्की कमवायचा तरी कशासाठी.....??
शनिवार, ४ जानेवारी, २०२०
कोमल- कोणी कामवाली असेल तर जरा सांग ग, थंडीत कपडे धुऊन धुऊन सारखी कणकण भरल्यासारखी वाटतेय अंगात.
मी- तू कशाला धुतेस कपडे, मशीन आहे ना तुमच्याकडे??
कोमल- हो, पण त्याने लाईटबिल जास्त येत अगं. मग मीच पुन्हा धुवायला लागले, पण आता डॉक्टरांवरच जायला लागलेत पैसे.
म्हणून म्हटलं निदान थंडी जाईपर्यंत तरी बाई लावावी.
मी- पण तू तर रोज ऑफिसलाही जातेस ना, कसं जमतं एवढं?
कोमल- अगं सकाळी लवकर उठून धुवायचे मी, या थंडीने होईना झालंय आता.....
मी- त्या वॉशिंमशिनचं काय करता मग?
कोमल- त्याचं काय, ते पडलंय तसंच!!
आमच्या बिल्डींगमध्ये वरच्या मजल्यावर राहणारी कोमल आणि तिचा नवरा दोघेही चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत कामाला आहेत.
तशा तर सगळ्या सुखसोयी आहेत घरात. पण त्याचा आनंद घ्यायची मानसिकता मात्र अजिबात नाही.
पैसे भरपूर कमावतात, तरी बघावं तेव्हा ते कसे जास्तीत जास्त वाचले जातील याचाच विचार करत असतात.
म्हणजे बघा हं, दोन मुलं आहेत, ज्यांना एकदम मोठया हायफाय शाळेत टाकलंय. महिन्याची फी पाचसहा हजार.
मात्र त्याच पोराना चांगलं खायला प्यायला देताना पैशाचा विचार मध्ये येतो.
अर्धा लिटरच्या दुधाची पिशवी फोडताना, वाढावी म्हणून ग्लासभर पाणी ओतताना मी स्वतः पाहिलय या कोमलच्या घरी!!
विचारलं तर उत्तर आलं, दूध किती महाग झालंय हल्ली!!
हिच मोठ्या शाळेत जाणारी पोरं आजारी पडली तर डॉक्टरच्या फिया डोळ्यासमोर येऊन घरच्या घरी औषध करण्यावर प्राधान्य दिलं जातं. त्याने नाही थांबलं तर मग डॉक्टर......
कोमलची आर्थिक स्थिती भक्कम असताना देखील ती, रोज सकाळी सगळं घरचं काम स्वतः करून, मग डबा बनवून ऑफिसला जाते.
सकाळी तर धावत पळत असतेच, पण संध्याकाळी देखील
अगदी काही क्षणच बसून परत कामाला लागते. घरचं प्रत्येक काम जे तिची वाट बघत असतं.
येता जाता वाटेत भेटणाऱ्या कोणाशीही थांबून दोन मिनिटं बोलायलाही वेळ नसतो तिला.
तिच्या कुटुंबाला एखाद दुसऱ्या नाही तर सगळ्याच कामाला बाई लावणं सहजशक्य आहे.
सगळ्या राहू द्या, पण थोडा तरी आपला भार हलका करायला काय हरकत आहे?
मला त्या दोघांकडे बघून बरेचदा प्रश्न पडतो, हे नक्की कमावतात तरी कोणासाठी?
आपण सगळेच खरंतर सर्वात पहिले पोटासाठी कमावतो.
मग एवढं कमावून जरा निवांतपणे आपल्या पोटाला खायला प्यायला मिळत नसेल तर काय उपयोग त्याचा??
गरज नसताना स्वतःच्या जीवाची वणवण करण्याची हौस बऱ्याच जणांना उगाचच असते. का ते त्यांनाच माहीत फक्त!!
मुलांसाठी कमावतो तर चांगला आहार, सुदृढ, निरोगी शरीर हे महागड्या शाळेपेक्षा, खेळण्यांपेक्षा सर्वात जास्त गरजेचे आहे, नाही का?
भविष्याचा विचार करून संचय करण्यासाठी कमावतो तर, नंतर दात पडल्यावर चणे खाता तरी येणार आहेत का??
मरमर करून कमावलेल्या त्या पैशाचा आनंद लुटायचा तरी कधी? का ते वाचवणं हाच आनंद आहे फक्त??
काही माणसांच्या मनात तर पैशाचा विचार नको तिथे आडवा येतो, आणि जिथे पाहिजे तिथे येतच नाही.
मोठा टिव्ही घेताना येत नाही, महागडा मोबाईल घेताना येत नाही, गाडी घेताना येत नाही, येतो तो कामवाली लावताना, लाईटबिल भरताना, आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाताना, चांगल्या खाण्यापिण्याच्या, किंवा इतर गरजेच्या वस्तू घेताना!!
नवलच वाटतं कोमलसारख्या माणसांच्या वागण्याचं, आपण नक्की कशासाठी धावतोय तेच त्यांना माहिती नसतं. थोडं थांबून विचार करायची फुरसत देखील ते स्वतःला देत नाहीत, कमवायला तर खूप कमावतात, आणि स्वतःच्याच गरजेसाठीही खर्च करायला हात आखडता घेतात, मग दुसऱ्याच्या गरजेला हातभार लावण्याचा विचार तर सोडूनच देत असतील, नाही का??
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article