मराठी कथा
सामाजिक
जैसे ज्याचे कर्म तैसे.........!!
सोमवार, २७ जानेवारी, २०२०
सातवी आठवीतच होता त्यावेळी योगेश. चांगल्या अगदी सुसंस्कृत घरातला. पण या योगेशला एक वाईट खोड होती. तो जाता येता दिसेल त्याच्यातल्या उणीवा काढायचा. लहान मोठं त्याला कुणाच्या वयाचं भान नसायचं.
त्याला कुणाच्यातलं व्यंग म्हणा, कमतरता म्हणा पटकन दिसायची किंवा तो त्याच्यावर डोळा ठेवूनच असायचा.
अरे, तुझं नाक काय रे वाकडं? ह्याचे डोळे बघा रे!!
तोतरा कसा बोलतो रे तू?? एखाद्या मोठ्या माणसाच्या पायात दोष असेल अन् तो समोरून आला, तर ए फेंगड्या करून हाक मारायचा आणि लपून बसायचा.
हा योगेश अगदी सर्व बाजूने परिपूर्ण होता, त्यामुळे अशा व्यंगावर बोट ठेवल्यावर, समोरच्याची मानसिक अवस्था काय होत असेल याची त्याला कल्पनाही नव्हती.
त्याच्या घरीही अगदी सोयरं वातावरण असूनही कुणी त्याला असं वागू नये म्हणून टोकलच नाही कधी. पोराला देवदेव करायला शिकवलेलं, सगळे श्लोक शिकवलेले पण कुणाला उगाच दुखवू नये हे मात्र शिकवायला विसरली ती मंडळी. त्यामुळे आपलं चुकतंय हे त्याला कळलंच नाही. तिच सवय घेऊन योगेश मोठा झाला, चांगलं शिक्षण घेतलं, नोकरी उत्तम मिळाली आणि बायकोही अगदी देखणी बघूनच केली.
मात्र पुढे मुलगी झाली, ती जन्मापासून व्यंग घेऊनच.
म्हणतात ना इथलं इथेच भोगावं लागतं, आतापर्यंत कितीजणांना त्यांच्या उणीवा दाखवून रडवलं असेल त्याने, कुठेतरी मांडलं जात होतच ना!!
कोड आलेली बाई प्रवासात सविताच्या बाजूला बसली, म्हणून हिचा जीव खालीवर व्हायला लागला. सविताने दुसरीकडे जागा शोधली. पण बस पूर्ण भरलेली असल्याने आणि प्रवास लांबचा असल्याने, तिला तिथेच बसण्याशिवाय गत्यंतर उरले नाही.
घरी आल्यावर नवऱ्याला म्हणाली, पहिले डोक्यावरून अंघोळ केली पाहिजे. चिकटून बसलेली नुसती ती बाई. आणि वरून मला कसल्या वड्या देत होती. ह्यांच्या हातचं कोण खाणार??
काही वर्षे सरली, आणि तिच्या स्वतःच्याच हातावर तिला पहिला डाग दिसला, आणि लक्खकsन तिला ती बाई आठवली.
पुष्पाच्या बाजूला राहणाऱ्या मुलीचा जन्मजात ओठ फाटलेला होता, ती समोर आली की पुष्पा सारखी तिला डिवचायची. तिच्या व्यंगाची आठवण करून द्यायची. कसं होणार तुझं मोठेपणी ग बाई, असं म्हणून त्या निष्पाप जीवाला त्रास द्यायची.
खूप खूप रडायची मुलगी. वडिलांची बदली झाली तेव्हा कुठे त्या मुलीची सुटका झाली.
पण अगदी तसंच व्यंग घेऊन पुष्पाच्या मुलीची मुलगी, तिची नात जन्माला आली, तेव्हा हिच पुष्पा काळजीने सैरभर झाली. हा डॉक्टर करु की तो डॉक्टर करू, असं झालेलं तिला. कसंही करून तिला आपल्या नातीचा फाटका ओठ नॉर्मल करायचाच होता.
ही उदाहरणे अगदी खरी आहेत, संदर्भ बदलले आहेत फक्त.
का एखाद्याच्या शारीरिक व्यंगावर हसावसं वाटतं कोणाला?
का टर उडवावीशी वाटते? कधी हा विचार का करावसा वाटत नाही, आपण त्या जागी असतो तर?
ज्याच्यात कमतरता असते त्याला ते चांगलच माहीत असतं की, तो त्याच्यावर मात करून पुढे जायचा प्रयत्न करत असतो, त्यांना सतत तिच तिच जाणीव करून देऊन कसला अघोरी आनंद मिळतो काहींना कोणास ठाऊक??
पण हे जे कोणी हसणारे असतात, त्यांनी लक्षात ठेवावं, वेळ सगळ्यांची येते.
वामनराव पै म्हणतातच, तुम्ही जे इतरांना सुख किंवा दुःख द्याल ते बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येईल.
परतफेड होणार नक्की.......
वरची उदाहरणं तर माझ्या डोळ्यासमोरची आहेत.
त्यामुळे कुणाच्या व्यंगावर बोट ठेवताना काय तो विचार नक्की करावा, आपण चिडवायला अगदी सहज चिडवून जाऊ, मज्जा ही वाटेल. पण हिच मज्जा नंतर सजा होऊन आपल्या जीवनात येऊ शकते, याचीही जाणीव ठेवावी.
कारण, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते रे ईश्वर.......
हे तर चांगलंच माहीत आहे आपल्या सर्वांना, अगदी लहानपणापासूनच ऐकत आलोय ना आपण 😊
©️स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article