मुलगी सर्वांच्या पसंतीची हवी.........!!

काय ग छाया, तुझ्या मुलाच्या लग्नाचं जमलं का नाही अजून?

कुठलं, चाललेत प्रयत्न.

अगं आता बत्तीस तेहत्तीसचा तर नक्की असेल ना?

हो, चौतीस सुरू आहे.

मग कुठे अडलंय?

आता सर्व मनासारखं जुळायला हवं ना, मीने?

काय मनासारखं जुळवताय , ऍडजस्ट करायचं थोडंफार एवढं कुठं बघत बसताय आता?

अरे वा, कोण बोलतंय पहा?? मीने, मागच्यावर्षीपर्यंत तूच सर्वाना सांगत होतीस ना, माझा मुलगा तसाच राहिला तरी चालेल, पण आम्ही जराही तडजोड करणार नाही.
मुलगी आमच्याच जातीतली, मुलाएवढीच शिकलेली, आणि उत्तम पगाराची नोकरी असलेली हवी. आणि सर्वांच्या पसंतीला उतरेल अश्शीच हवी!!
तुझा मुलगा तर चाळीशीच्या जवळ पोचलाय नाही का आता? 
त्याचं का लग्न नाही झालं अजून? तुम्ही का नाही जुळवून घेतलत मग?

काय सांगू छाया, तुला आता.....जेव्हा चॉईस होती तेव्हा आम्ही सगळे अडून बसलो. अस्संच पाहिजे तस्संच पाहिजे. चांगली चांगली स्थळ नाकारली आम्ही खुसपटी काढून. पोराला नोकरी उत्तम होती, तिच्या जीवावर नाचत होतो.
पण आता वय वाढलं तसं कोssणी विचारत नाही बघ. 
पूर्वी स्वतःहून स्थळं यायची, आता कित्येक विवाह संस्थेत कितीतरी पैसे ओतले, तरी त्यातल्यात्यात बरंही कोणी मिळेना झालंय. लग्नाचा सगळा खर्च करायलाही तयार आहोत आम्ही. पण वय आडवं येतंय आता.
सगळी स्थळं दुसऱ्यावरचीच येतायत. मुलगा चालेल म्हणतोय पण मला आणि मिस्टरांना ती स्थळं नको वाटतायत. एकुलता एक मुलगा हो आमचा. 
म्हणून तुला विचारलं ग, आमच्यासारखं नको व्हायला तुमचं. लवकर काय ते बघा. पोराला समजवा, तुम्हीही समजून घ्या. आमच्यासारखं वर्षानुवर्षे भिजत घोंगडं नको पडायला तुमचंही. वेळीच सावध व्हा.

हो मीने, तुझं म्हणणं पटतंय मला. आमच्याकडे थोडा तरी आहे वेळ. तुझं उदाहरण देते घरी. काय होतं अगं, सर्वांचं एकमत व्हायलाच वेळ लागतो. मुलाला आवडलं तर आम्हाला नाही, आम्हाला आवडलं तर मुलाला नाही. आणि सर्वांना आवडलं तर नातेवाईकांत कोणीतरी काहीतरी खोट काढतं. सर्व उत्तम पाहिजे हया अट्टाहासानेच लग्न लांबलं जातंय ग.

पण आता तुझं बघून, मुलावरच सोडून द्यायचं म्हणतेय, तो म्हणेल तसं होऊन जाऊ दे. त्याची मनपसंत असली बास झालं. आम्ही तोंड बंद ठेवतो आमचं.
आणि तुला सांगू मीने, तुझा मुलगाही होतोय ना तयार दुसऱ्यावर, तर तुम्हीही नका जास्त विचार करू आता.
मुलालाच ठरवू दया काय ते. अगोदरच वय वाढलंय, लग्न करायचं नक्की असेल तर नको आणखी वेळ दवडायला.

बरोबर आहे तुझं, छाया. मी वेळ गेल्यावर शहाणी होतेय खरी, पण बाकीच्या लोकांना मात्र वेळेआधी शहाणं करायचा विडाच उचललाय मी आता, म्हणून सुरुवात तुझ्यापासूनच केली. सर्वांच्या पसंतीची मुलगी शोधण्याच्या नादात वयाची गाडी पुढे जातीये, याचंही भान ठेवलं पाहिजे ना? आमचं झालं तसं इतरांचं होऊ नये, निदान एवढीच कामना आहे हो आता......!!


©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel