मराठी कथा
विनोदी
गाना चाहे, गाs ना पाये.........!!
शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०
दर पाच पाच मिनिटाला वेगवेगळे सूर आळवत बसणाऱ्या माझ्या तोंडाला गेले महिनाभर दुष्ट खोकल्याने टाळं ठोकलय हो अगदी!!
एकदा आला की जायचं नावच काढत नाही, अगदी हट्टून महिनाभर राहतोच चिवट्या......
गेले कित्येक दिवस मी माझा स्वतःचा नाजूक, कोमल आवाज ऐकलाच नाहीये. इतका भसाडा आवाज बाहेर पडतोय की ते सेल्स कॉलवाले हॅलो मॅडमच्या ऐवजी हॅलो सर म्हणून स्किमा गळ्यात मारायची पोपटपंची सुरू करायला लागलेत हल्ली.
त्यांची टेप सुरू होण्याअगोदर मला त्यांच्या बोलण्याच्या आवेगाला मधेच थांबवून सांगावं लागतं की मी मूळची मॅडम आहे हो, छळवादी खोकल्याने माझ्या घश्याला दुखावलय, म्हणून त्याच्याकडून बाईसारखा आवाज निघेना झालाय.
हे ऐकताच सेकंदभर पॉझ घेऊन (नक्कीच फुदकण्यासाठी) "ओह व्हेरी सॉरी" म्हणून काही पुनश्च सुरू होतात. मात्र काही बिचारे माझी दया येऊन मला औषधं सुचवतात, मग अशांची पोपटपंची गप गुमान ऐकून घ्यावीच लागते. एवढी काळजी दाखवणाऱ्यांचा "नॉट इंटरेस्टेड" म्हणून तुसड्यासारखा फोन कट करणं बरं वाटत नाही ना!!
अहो, दिवसभर गा गा गाणारी मी, आता साधं एक गाणं गाता येईना झालंय मला!!
सवयीप्रमाणे सुरू तर होते, पण दोन्ही पोरं असेल तिथून धावत येतात अन् मम्मी चूssप करून माझ्या तोंडावर हात ठेवतात.
मुलगी म्हणते, हे बघ मम्मी तुझा आवाज चांगला झाला ना की काही दिवस आपण गाणी वाजवूयाच नको. तूच गा पाहिजे तेवढी, पण सध्या जरा आवर घाल मनावर.
आम्ही लहान म्हणून सगळंच आमच्या माथ्यावर मारू नकोस ग........विचार कर ना जरा आमचाही.
किंवा असं कर, आम्ही शाळेत गेलो, खेळायला गेलो ना की हवं तेवढं रेकत बस. कुणी तुझ्या आणि गाण्याच्या मध्ये येणार नाही. पण आम्ही असताना या तुझ्या लाडक्यांवर एवढी दया करच.
त्यातून तुला अशी चार माणसात हुक्की आली ना गायची तर त्या "वेलकम" मधला उदय भाई आठव आणि त्याच्यासारखं स्वतःला बजाव, कंट्रोल s कंट्रोल ss कंट्रोल sss
आता या पोरांना कोण सांगणार, अवती भोवती माणसं असली की गायला किती उत्साह वाटतो. तोंडातून गाणी आपोआप उचंबळून बाहेर पडतात. आणि अशा उचंबळून येणाऱ्या गाण्यांना आवाज भसाडा निघतोय म्हणून कंट्रोलs कंट्रोल ss म्हणून तोंडात कोंडून कोंडून मारायचं??
देवा, अशी वेळ वैऱ्यावर सुद्धा आणू नकोस रे........
माझ्या सारख्या उभरत्या गायिकेवर आणलीस तेवढंच पुरे झालं हो..........
नादान मुलं धीर खचवतात म्हणून आशेने नवऱ्याकडे पाहावं, तर नवरा त्याही परिस्थितीत स्वतःची पोळी भाजून घ्यायला तयार......
जरा एखादा सूर काढायला सुरुवात केली की म्हणतो, अगं ऐक ना. तू सध्या काही दिवस तोंड उघडूच नकोस, म्हणजे आपोआप बरी होशील. गायला ही नको आणि बोलायलाही नको. फक्त खायला काय ते उघड. तुझ्या तोंडाला पाहिजे तेवढा आराम मिळतच नाही ग, म्हणून ही हालत आहे तुझी.
तसा मी देखील मिस करतोय तुझा आवाज .......
काय ते दिवस होते, रोज सकाळी उठल्यावर, स्वैपाकघरात काम करता करता तू घशातून ओढून ओढून निघेल तितका मंजुळ स्वर काढत गाणी म्हणायचीस, आणि मी जमेल तितका तुझ्या गाण्याचा आनंद घ्यायचा प्रयत्न करायचो. भले तुझ्या आवाजचं कधी कौतुक केलं नसेल तरी तुझं तोंड कायमचं बंद कर, हे म्हणायचीही हिम्मत नाही केली कधी!!
पण तेव्हाही तुझ्या काळजीने मी सांगायचो हा तुला, जरा आराम कर, विश्रांती दे घश्याला. नॉनस्टॉप कॅसेट वाजवली पाहिजेच असं नाही. तर तुला राग यायचा माझा. मी गुणग्राहक नाही म्हणून.
आता कळलं ना तुला?? तुम्ही बायका नवऱ्यांना कधी सिरियसली घ्यायला लागणार देव जाणे!!
च्या मारी, कधी नव्हे ते माझं तोंड बंद पडलं अन् बोलायला मिळालं तर हा किती बोलत सुटला बघा जरा.......
माझा आवाज येऊ दे, अश्शी एकेक गाणी म्हणून बेजार करणार आहे ना की स्वप्नातसुद्धा बायकोच्या वाटेला जायचा धीर होणार नाही याला!!
घरातल्या प्रत्येक सिच्युएशन नुसार गाणी म्हणणारी मी आता नाईलाजास्तव ओठ दाबून घरात फिरतीये. माझ्याच दुःखाने माझंच अंतःकरण अगदी पिळवटून निघतंय हो!!
त्यातून काही एक्साइटिंग घडलं की पोरगी म्हणते, मम्मी तू कुठलं गाणं गायलं असतंस ग या सिच्युएशनला?
मी आनंदाने गायला आss वासणार, तेवढ्यात माझ्या आss बरोबर माझं तोंड दाबून ती म्हणते, नको नको लगेच सुरू नको होऊ , बोलून दाखव फक्त.
हट्, गात्या गळ्याच्या माणसाने, गाणं बोलून दाखवायचं??
म्हणजे कोकिळेने कुsहूsss असा नेहमीचा स्वर न लावता कूss करून सोडून द्यायचं नुसतं??
ये काहेका इन्साफ हुआ भाई??🤔
मुद्दाम डिवचतात सगळे, मला काय कळत नाही असं वाटतं का यांना??
हिसाब होगा......सबका हिसाब होगा👊
तो सुरेssल आवाज तर येऊ दे माझा परत, नाही यांच्या कानांचं भजं करून सोडलं तर नावाची उभरती गायिका नाही मी!!
अल्ताफ राजा आणि हिमेशची गाणी ठेवलीयेत मी टॉपलिस्टवर खास यांच्यासाठीच..........
बघूया मग कोण वाचवतय यांना तेरा तेरा तेरा सुssरुssरssss आणि तुम तो थेहरे परदेसीच्या नॉनस्टॉप माऱ्यापासून.........
गिनगीन के बदला लुंगी, चुनचून के बदला लुंगी💃
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article