मराठी कथा
सामाजिक
काय करायचं यांच्यासाठी आपण.......??
मंगळवार, ३ मार्च, २०२०
बाsस ग बये, हो बाजूला, धंद्याचा टाईम खोटी नको करू........व्हसकन् खेकसत खेळणी विकणाऱ्या त्या बाईने आपल्या दोन वर्षांच्या पोरीला बाजूला ढकललं.
तरी पुन्हा उठून किरकिरत ती पोरगी त्या बाईच्या अंगाशी झटपटू लागली.
एका बाजूला ती पोरगी दुधासाठी अंगचटीला येत होती, तर दुसऱ्या बाजूला गिऱ्हाईकं हे कितीला ते कितीला करत भंडावून सोडत होती.
त्या बाईला नक्कीच सगळं सोडून कुठेतरी पळून जावसं वाटत असणार, तिच्या चेहऱ्यावर त्रागा स्पष्ट दिसत होता.
समोर एवढा मोठा खेळण्याचा ढिग पडला होता, पण ती चिमुकली त्याच्याकडे ढुंकूनही बघत नव्हती. इतर पोरं मात्र त्याच खेळण्यांसाठी हट्टाला पेटली होती.
साधारण तीन साडेतीन पासून त्यांनी त्या जत्रेत दुकान मांडलं असावं. साडेनऊ वाजत आलेले. ती छोटी पोरगी अगदी कंटाळून गेली होती. तिला तिच्या आईच्या कुशीत दूध पित पित गाढ झोपून जायचं होतं..........
पण त्या बाईला आपल्या पोरांसाठी हौसेने खेळणी विकत घेणारे आई-वडील काही सुचवून देत नव्हते. सगळ्यांना घाई होती. त्यांना सुद्धा त्यांची मुलं छळत होती ना!!
तेवढ्यात इतक्या वेळ कुठे तरी गेलेला तिचा नवरा आला, आणि त्याने त्या पोरीला उचलून घेतलं. बाईला गिऱ्हाईकं बघायला सांगितली. पण पोरगी थांबेचना, तसं त्याने पोरीला परत त्या बाईजवळ दिलं. पोरगी काही दुधाशिवाय ऐकेना, आणि धंद्याच्या टायमात त्या बाईला पोरीला दूध पाजता येईना.
तेवढ्यात बापाची नजर तिथेच थोडं बाजूला खेळणाऱ्या त्यांच्या साधारण पाच- सहा वर्षांच्या मुलीवर गेली. त्याचा पारा चढला, त्याने तिला चार फटके देऊन बारक्या पोरीशी खेळायला सांगितलं, अचानक फटके पडलेली ती पोरगी माझं काय चुकलं या नजरेने रडत रडत आईकडे बघायला लागली.
बारकी पोरगी तिच्याशी खेळली नाहीच, तिला आईच हवी होती. धंद्याचा टाईम तिच्या आईला आणि बापाला धंद्याशिवाय काही सुचूनच देत नव्हता.
काही न काही कारणाने जत्रेत फिरताना सलग तीनवेळा मला तिथे जावं लागलं, जे दिसत होतं ते सगळं मनाला त्रास देत होतं. अगदी घरी गेल्यावर सुदधा.
राहून राहून वाटत होतं, काय करायला पाहिजे होतं अशा वेळी आपण??
मागच्या वर्षी एक फुगेवाला सायकलवरून फुगे विकत फिरताना दिसायचा, बरेच वेळा. त्याच्याबद्दल काही नाही, पण एक चार वर्षाची मुलगी असायची त्याच्याबरोबर नेहमी.
त्याच्या सायकलच्या पुढच्या दांडीवर बसलेली.
खूप वाईट वाटायचं तिच्याबद्दल. एकदा त्याला आम्ही विचारलंच, किती वाजल्यापासून फिरतोस? तर तो म्हणाला चार साडेचारला निघतो घरातून......
म्हटलं, घरी कधी जातोस?
तर म्हटला साडे दहा,अकरा.
ऐकूनच चर्रss झालं मनात. एवढ्या वेळ त्या पोरीला सायकल वरून फिरवायचं?
त्या बिना सीटच्या दांड्यावर बसून काय होत असेल तिचं?
पोरीचे हाल का तर तिच्याकडे बघून लोकांनी फुगे घ्यावेत आणि त्यांना पोरगी उपाशी म्हणून जास्तीचे पैसे मागता यावेत.
नंतर पुन्हा एक दिवस त्याला गाठून माझ्या मुलीचे न येणारे कपडे दिले त्या मुलीसाठी, त्या पोरीला खाऊ दिला आणि खूप समजावून सांगितलं. पोरीचे हाल करू नको वगैरे. त्याने सर्व कळल्यासारखं हो हो केलं.
आम्हालाही बरं वाटलं.
नंतर काही दिवस तो आणि पोरगी दिसलेच नाहीत. वाटलं चला काहीतरी वेगळं करायला घेतलं असेल बहुदा.
पण एके दिवशी काही कारणास्तव आमच्यापासून लांबवर असणाऱ्या दुसऱ्या एरियात गेलो असता तिथे मात्र तो पोरीसोबत दिसला.
मन व्यथित झालं, वाटलं नक्की काय करायचं होतं तिच्यासाठी आपण?
जवळपास दहा दिवसातून एकदा त्याची फेरी असतेच आमच्या एरियात. चाबकाने स्वतःच्या उघड्या अंगावर सटासटा मारत असतो. बरोबर बायको आणि नेहमीप्रमाणेच बायकोच्या कडेवर पोरगं. त्याबरोबरच चालत फिरणारं चार वर्षाच पोरगंही. ते चार वर्षाच पोरगं त्यांच्याबरोबर अनवाणी फिरत होतं. जीव कळवळला. माझ्या पोराला लहान होणारे बूट आणि सँडल त्याला दिले. आई- बापाला सांगितलं, लहान पोराला नका हो फिरवू असे.
पोरगं बूट बघून खूष झालं, लगेच पायात चढवले. आणि नाचायला लागलं.
पुढे काही दिवसांनी पोराला शाळेत सोडून येत असताना हे सगळे एका बिल्डिंग समोर दिसले. माझी नजर पोराच्या पायावर गेली, तो पुन्हा तसाच अनवाणी.
बूट दिल्यावर आनंदाने नाचणारा तो चार वर्षाचा पोरगा, ते घरी सोडून लोकांच्या दयेसाठी रिकाम्या पायाने फिरत होता.
माझा पोरगा बिनचपलेचा जरा बाहेर गेला तर दगड टोचतील, काचा टोचतील, करत ओरडणारी मी त्या पोराकडे हतबलतेने पहात बसले.
त्याने अनवाणीच फिरणं ही त्यांच्या कुटुंबाची गरज होती!
पण तरीही मला वाटलंच, आता काय करायचं या निरागस बालकांसाठी आपण?
असं बरेचदा होतं ना, मन बेचैन करणाऱ्या गोष्टी अगदी डोळ्यासमोर दिसत असतात, इच्छा असूनही नेमकं त्याक्षणी काय करावं तेच कळत नाही. काही वेळा तेव्हढ्यापुरतं वाईट वाटतं, अन् नंतर आपण ते विसरूनही जातो. पण काही वेळा त्या अगदी मनात घट्ट रुतून बसतात, काहीही झालं तरी मनातून जातच नाहीत, सतत मनाला टोचणी देत राहतात.
अन् मग पुन्हा पुन्हा तेच वाटायला लागतं, नेमकं काय करायचं यांच्यासाठी आपण??
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article