कसं कळतं एका मनाचं दुसऱ्या मनाला.......??

आपण एखाद्या गोष्टीची इच्छा धरावी, आणि पुढच्या काही वेळात मनातलं कुणालाही न सांगता ती गोष्ट आपल्यासमोर हजर व्हावी, होतं का असं कधी तुमच्याबरोबर?

माझ्यासोबत मात्र गेली काही वर्षे होळीला अगदी तस्सचं होतंय .......
मला पुरणपोळी खूप खूप आवडते. आणि घरात मला एकटीलाच जास्त आवडते. पण एकटीसाठी करायचा मला येतो कंटाळा. तशी मी काही फार हौशीही नाहीये स्वयंपाककाम करण्यात.

इतरवेळी नाही पण होळीला पुरणपोळी मला हमखास खावीशी वाटते.

माझ्या मुलाच्या वेळी प्रेग्नंट असताना अशीच होळीच्या दिवशी रात्री पुरणपोळी खायचं जबरदस्त टेम्टिंग झालं.
तशी आमच्या इथे एका ठिकाणी चांगली मिळते, नवऱ्याला लगेच पाठवलं, तोही बायकोचे डोहाळे पुरवायला हवेत म्हणून खिचपिच न करता गेला. पण त्यांच्या पुरणपोळ्या नेमक्या लवकर संपल्या होत्या.
नवरा तसा आणखी दोन ठिकाणीही विचारून आला, काही न नेण्यापेक्षा कुठून का होईना आणून खायला घालावं या हेतूने. पण त्याला पुरणपोळ्या मिळाल्या नाहीच.
मन खट्टू झालं. नवऱ्याच्या नावाने कुरकुर करून मनाला थोडी शांती मिळवून दिली एवढंच........

तेवढ्यात दाराची बेल वाजली. बघितलं तर चक्क माझा मित्रच पुरणपोळ्या घेऊन आला होता!! त्याच्या बायकोने त्या आवर्जून माझ्यासाठी पाठवल्या होत्या.

त्यावेळी जी फिलिंग आली ना काय सांगू? नाचावसं वाटत होतं अगदी!!
 

खरंतर नवरा हात हलवत आल्यावर माझ्या सर्व आशा संपलेल्या पुरणपोळी खाण्याच्या, आणि अचानक मला ती खायला मिळाली, तो आनंद शब्दात वर्णन करता येण्यासारखाच नव्हता. छोटीशी गोष्ट होती, पण ती पूर्ण झाल्याचा आनंद खूप मोठा होता!!

पोळ्या अर्थातच अप्रतिम लागल्या, एकेक घास स्वर्गसुख देत होता...... खास आठवण ठेऊन माझ्यासाठी पाठवलेल्या, कसं पोचलं एका मनाचं दुसऱ्या मनाला काय माहीत??

तेव्हापासून होळीच्या दिवशी मला कुणा ना कुणाकडून पुरणपोळी मिळतेच. कधी मी विसरून जाते, पण पाठवणारे अजिबात विसरत नाहीत.

एकदा होळीच्या आदल्या दिवशी रात्रीपर्यंत मी आणि माझी जवळची मैत्रीण दोघी एकत्र होतो. पुरणपोळीचा काही विषय सुद्धा निघाला नाही. पण दुसऱ्या दिवशी होळीला तिने नवऱ्याबरोबर खास माझ्यासाठी पुरणपोळ्या पाठवल्याच, माझ्या ध्यानीमनी देखील नसताना!

मागच्या वर्षी देखील अशाच अचानक पुरणपोळ्या पाठवलेल्या तिने, आणि त्या बघूनच माझ्या डोळ्यात पाणी आलं.......

त्या खाल्ल्या आणि मन तृप्त झालं, तिला सुंदरसा मेसेज पाठवला. इतकं मन भरून आलेलं की बोलायला जमलंच नसतं. 

कसं कळतं काही लोकांना आपल्या मनातलं?? कशी आठवण येते बरोब्बर त्या क्षणी आपली?? न मागता, न बोलता कसं हवं ते देऊन सुखावून टाकतात मनाला??

असं कोणी आठवण ठेऊन काही केलं की, किती भारी वाटतं ना??

गेल्या काही वर्षांपासून हा होळीचा सण अशी भारीवाली फिलिंग देणाऱ्या माणसांमुळे खूप खास होऊन बसलाय माझ्यासाठी...........

तुमच्या आहेत का अशा काही गोड आठवणी कुठल्या सणाच्या? तुम्हालाही मिळालय का असं न मागता काही हवं असणारं?? अनपेक्षित आनंद देणारी अशी माणसं आहेत का तुमच्याही आजूबाजूला???

चला सांगा बघू........

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel