पालकत्व
मराठी कथा
सामाजिक
मी फक्त तुझीच ग आई.......!!
मंगळवार, १० मार्च, २०२०
I love you, more than anything.........
आपल्या अकरावीतल्या मुलीचा मोबाईल चेक करताना तिने पाठवलेला मेसेज दिसला आणि अमृताला धक्काच बसला एकदम.
तसं तिला ऋतूचं काहीतरी वेगळं चाललंय असा डाऊट होताच. मोबाईल अगदी प्राणपणाने जपत होती ती. कधी बघायचा म्हटला तर पासवर्ड असायचा. शेवटी एकदा तिने इतक्यात पासवर्ड वगैरे काही लावायचा नाही मोबाईलला म्हणून चांगलंच धमकावलं तिला. तेव्हा कुठे ते पासवर्डच नाटक बंद झालं.
पण त्याच रात्री मात्र अमृताने ऋतूला झोपताना कोणाशीतरी चाट करताना पकडलं, आणि झटकन मोबाईल हिसकावून घेतला तिच्याकडून.
आणि नेमकं ती काय करतेय ते चेक करायला गेली, तर नुकताच पाठवलेला मेसेज दिसला, I love you more than anything.........
अमृताने तो वाचला आणि तिच्या हृदयात एकदम काहीतरी हलल्या सारखं झालं. तिला राग येण्यापेक्षा वाईट जास्त वाटत होतं, ते याचं की ऋतू कोणाला अशी कशी म्हणू शकते? More than anything म्हणजे सगळ्यापेक्षा जास्त!!
म्हणजे माझ्यापेक्षाही जास्त, तिच्या बाबापेक्षाही जास्त कोणी आवडतं तिला??
आता अमृताच्या डोळ्यात धारा सुरू झाल्या होत्या.
ऋतुशी काहीच न बोलता ती झोपायला तर गेली, पण इतकं रडायला येत होतं की ते आता थांबेल की नाही हे तिलाही माहीत नव्हतं.
खूप खूप दुखावली गेली होती अमृता. तसं तिला माहीतच होत, पूढे जाऊन कोणीतरी तिच्या ऋतूला आवडणार, माझ्यापेक्षाही जास्त तो जवळचा होणार, पण एवढ्यात आताशी अकरावीत असताना स्वतःची आई सोडून दुसरं कोणीतरी आपल्या पोरीला सर्वात जास्त आवडणं तिला पचायला खूप कठीण जात होतं.
अमृतासाठी तर ऋतूपेक्षा जास्त आवडणारं कोणीच नव्हतं या जगात; ती आल्यापासून तिने तिच्या नवऱ्यालाही दोन नंबरवर टाकलं होतं. पहिले ऋतू मग बाकी सर्व!!
आता त्याच ऋतूने तिला डावलून कोणा दुसऱ्यालाच I love you more than anything म्हटलं आणि अमृताच्या आत अगदी तुटल्या- तुटल्यासारखं झालं.
दुसऱ्या दिवशी ती ऋतुशी काही बोललीच नाही. ऋतूच्या बाबाला मात्र झालेलं सगळं सांगितलं, तेव्हाही इतकं रडायला येत होतं, की तिला धड बोलायलाही जमत नव्हतं.
या वयात होतं ग असं, होईल सगळं नॉर्मल. तिच येईल बघ तुझ्याकडे स्वतःहून परत. थोडा धीर धर, त्याने त्याच्या परीने अमृताची समजूत घातली.
पण अमृताने ठरवलं, ऋतुशी बोलायचंच नाही. ओरडून आणि मारून तसही काही होणार नव्हतं, उलट आणखीनच जिद्दीला आली असती ती.
ऋतू त्या दिवशी स्वतःचं स्वतःच आवरून कॉलेजला गेली. नेहमी हे खाते का ते खाते करत पुढे पुढे करणारी, नीट जा, जपून राहा करत दहा वेळा बजावणारी अमृता शांतपणे पेपर वाचत बसली होती.
दोघींंनाही खरंतर चुकल्यासारखं होत होतं. ऋतू निघताना,
तिला मिठी मारून गोड पप्पी घ्यायची नेहमीची सवय अमृताची. तिला खूप वाटत होतं, जाऊन ऋतूला जवळ घ्यावं, पण आवरलंच तिने स्वतःला.
तो तिचा मेसेज डोळ्यासमोर फिरत होता नुसता.....
कॉलेजमधून आल्यावर नॉनस्टॉप बडबड असायची ऋतूची, सगळं सांगायचं असायचं आईला.
नेहमीप्रमाणे आजही ऋतू सांगायला तर लागली, पण अमृताने काही इंटेरेस्टच दाखवला नाही. त्यामुळे ऋतू तशीच दुसऱ्या रूममध्ये निघून गेली. नेहमी मागे मागे करणारी आई एकदम गप्प बसून होती. ऋतूलाही त्रास होत होता. अमृताने तिचा मोबाईल समोरच ठेवला होता, पण आज ऋतूला तो उचलावाही वाटला नाही. नेहमी मोबाईल घेतला की बास झालं ग, अभ्यासाला लाग म्हणणारी तिची आई शांत होती ना आज......
ऋतूचा बाबा दोघांच्या मध्ये मध्ये करून समेट घडवायचा प्रयत्न करत होता, पण अमृताच्या जिव्हारी घाव बसलेला, काही केल्या तिला नॉर्मल होता येत नव्हतंच आणि व्हायची इच्छाही नव्हती.
दिवसातून दहा वेळा मिठ्या मारणाऱ्या, घरात असल्यावर एकमेकींच्या मागे पुढे असणाऱ्या मायलेकी दोन ध्रुवावर असल्यासारख्या वागत होत्या.
ऋतूला सारखं वाटत होतं, अस्स् जावं अन् आईच्या कुशीत शिरावं.
दोन दिवस झाले तरी कुशीत शिरणं काही जमलंच नव्हतं तिला. अमृता काही रिस्पॉन्सच देत नव्हती कशाला.
जणू काही पडलच नव्हतं ऋतूचं तिला.
आईच असं वागणं आता ऋतूला छळायला लागलं होतं. तिचं कशातच लक्ष लागेना झालं. तिला आईशिवाय काहीच सुचेना झालं.
आईशिवाय मी नाहीच, असं तिला प्रत्येक क्षणी वाटायला लागलं. त्यापायी तिने त्या I love you वाल्याशी बोलणंही सोडून दिलं.
तिला आईशी न बोलता राहणं सर्वात कठीण वाटायला लागलं, आणि एका क्षणी ती स्वतःहून आईकडे झेपावली, आणि गच्च मिठी मारून म्हणाली; आई, मला तुझ्यापेक्षा प्रिय कोणीच नाही. तू बोल माझ्याशी, मला आता हे सहन होत नाही. मी चुकले मला माफ कर. कळलंय ग मला, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. खूप खूप त्रास होतोय ग मला.
आई बोल ना, प्लिज बोल ना ग.
अमृता कसली बोलतेय, तिचे शब्द अडकले होते, आणि ऋतू बिलगली तसं डोळ्यातून झरझर पाणी वाहू लागलं फक्त.
तीही केव्हाची आसुसली होती पोरीच्या स्पर्शाला, चार दिवस कसे काढले तिने तिचं तिलाच माहीत होतं.
प्रत्येक वेळी वाटायचं, जाऊ दे सोडून द्यावं, सर्व विसरून पोरीला जवळ घ्यावं.
पण तो मेसेज अडवत होता, आणि हे केलं नसत तर पोरीला तिच्यासाठी आई काय आहे हे कसं कळलं असतं??
प्रत्येक क्षणी गरज असताना आणि नसतानाही आई तिच्यासाठी आपलं सर्व मागे सोडून अवेलेबल होती, म्हणून तिची किंमत कवडीमोल झाली होती.
पण तिच आई पिक्चरमधून हटल्यावर मात्र पोरीसाठी
प्राणप्रिय झाली.
दोघींनीही आपली मिठी घट्ट केली, ऋतूने अमृताचे डोळे पुसले आणि तिच्या गालावर गोड पप्पी देत म्हणाली, परत असं कधी म्हणजे कधीच करू नको हा आई, I love you more than anything, मी फक्त तुझीच ग आई....!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article