सुख मिठीतलं.......!!

मम्मी, ये मिठी मार.......

काही नको जा तिकडं.....

ये ग ये, सोड आता......

एकमेकींशी मन भरेपर्यंत भांडून झालं, की पोरगी स्वतःहून जवळ येते आणि मला अगदी घट्ट मिठी मारते. 
माझ्या रागाला खरंतर पटकन यायची सवय नाहीये, अन् आला की झटकन जायची देखील सवय नाहीये.
पण पोरीचं मिठीचं शस्त्र त्याला पार पाघळवून टाकतं.  पोरगी अशी स्वतःहून येऊन बिलगली की रागाच्या जागी डोळे भरून येतात तो क्षण अनुभवताना. पोरीने आईची समजूत काढण्यासाठी आईलाच तिचं "पिल्लू" समजून मारलेली मिठी.
मूक आश्वासन असतं त्यात, सॉरी मम्मी पुन्हा नाही होणार असं, आता सोडून दे ना ग राग. 

छोटं चार वर्षाचं पोरगं दिवसभर भिरभिरत असतं घरात, त्याला पकडून पकडून मिठी मारावी लागते. अजिबात हातात यायचं नसतं कोणाच्याच. पण तेच कुठे पडला, कोणी मारलं, काही बोललं की त्याला पहिले माझ्या, त्याच्या मम्मीच्या मिठीत शिरायचं असत. ती मम्मीची मिठी त्याच्यासाठी दुःख हलकं करणारी, सुरक्षितता देणारी असते.
इतर वेळी सर्वांचा असणारा तो स्वतःहून डिक्लेअर करतो, मम्मी मी फक्त तुझा, बाकी कोणाचा नाही. 
अशा वेळी त्याची मम्मी काही न बोलताच भरल्या मनाने ती मिठी आणखी घट्ट करते........

बायकोपोरांच्या नावाने ठो ठो करून झालं की त्यावरचा उतारा म्हणून पोरांचा पप्पा एकेकाला जबरदस्तीच्या मिठ्या मारत बसतो.
थोड्यावेळापूर्वी महामूर्ख म्हणून शिव्या खाणारी मंडळी त्याला पृथ्वीवरची देवाची रूपं भासू लागतात. साधीभोळी पोरं सगळं विसरून लगेच पप्पाच्या गळ्यात पडतात.
पण मम्मीला मनधरणी लागतेच. 
पप्पा मग तिच्या मागे पुढे 'प्रियतम्मा प्रियतम्मा' करत सूर आळवत बसतो......

"ये मिठीत ये ना जाणून घे ना माझे अस्सल रूप, मला बिलगता कळेल तुजला सारे आपोआप......."

राग वरवरचा आहे ग, मनात खूप प्रेम आहे तुमच्याबद्दल.
कितीही आवरलं तरी डोळ्यात टचकन् पाणी येतच, अशा प्रेमाच्या मिठीत शिरल्यावर.........
आठ दिवस आरामात आईकडे राहून परत घरी जाताना, आपण आणलेल्या  दोन बोचक्यांच्या जागी चार-पाच  बोचकी बघूनच मन अर्ध हेलावलेलं असतं. 
चालली पोरगी; आता परत कधी येणार?, असा विचार करून हळवं झालेलं आईचं मन, तिच्या डोळ्यात बघून, तिला मारलेली घट्ट मिठी स्वतःहूनच सांगते, भेटू ग पुन्हा लवकरच............

आज या मिठयांच्या सुखद आठवणीत रमत असताना, तिची मिठी मात्र कुठे सापडली नाही. पंचवीस वर्ष व्हायला आलीत आमच्या मैत्रीला, आणि एकाही मिठीची गोड आठवण नाही?
अरेच्या, आपण तिला एकदाही मिठी मारली नाही? कसं काय झालं असं?

झालं खरं, आम्हाला मिठीची गरज लागलीच नाही कधी.  कधी रुसवे फुगवे झालेच नाहीत, एकमेव तिच असावी जिच्याशी मी कधी भांडलेच नाही. हात तरी कधी पकडला होता देव जाणे, तेही आठवत नाही.
तिचं नि माझं नातं स्पर्शाच्या पलीकडलं, पण तितकंच गाढ.
प्रत्येक क्षणी बरोबर असणारं......घनिष्ठ मैत्रीचं.
एकमेकींच्या मनातच उतरलोय जणू आम्ही दोघी, एवढं मुरलोय की वेगळी मिठी मारावीच वाटली नाही कधी!!

आज या जीवलगांच्या मिठयांच्या  गोड आठवणी "मिठीवाला डे आहे तर मारा मिठ्या" म्हणून कोणाला मुद्दामहून मिठी न मारताही जिवाभावाची घट्ट मिठी मारल्याचं सुख देऊन गेल्या मला..........!!

तुमच्याकडे आहेत अशा ठेवणीतल्या मिठ्या, चला सांगा बरं!!

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel