कौटुंबिक
मराठी कथा
आजी-आजोबा हवेत........!!
सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०
जुई नेहमी गावाला गेली की आजी-आजोबांच्या मागे लागायची, चला ना आमच्याबरोबर, मला खूप मज्जा येते तुम्ही आलात की.
आजी म्हणायची, पण आम्हाला करमत नाही ग तिकडे.
आम्हाला इथेच बरं वाटतं.
तुझ्या आजोबांची चिडचिड सुरू होते, चार दिवस झाले की.
त्यांना अडकल्यासारखं वाटायला लागतं.
खरंतर, जुईच्या आजी-आजोबांना आपलं गावातलं घर सोडून कुठे जावसंच वाटायचं नाही.
त्यातून त्या शहरातल्या जुईच्या घरी तर अजिबातच नाही.
पण जुई सारखी बोलवायची, तिला बरं वाटावं म्हणून मग ते दोघे चार-पाच महिन्यातून एकदा तिच्याकडे जायचे.
पण त्यांना शहरातल्या त्या घरात अगदी कोंडल्यासारखं व्हायचं. दिवसभर सर्व घराबाहेर. जुईची शाळा अकरा ते पाच, घरी यायला सहा. तिचे आई-वडील जॉबवरून आठ वाजेपर्यंत यायचे.
आजी-आजोबा दिवसभर दोघे अगदी एकटे पडायचे. टिव्ही बघण्याचा फारसा काही छंद नव्हता. तो चालू बंद करून त्याच्यावर काही बघणं आणि ते चॅनल फिरवत बसणं नको वाटायचं त्यांना. त्यातून आपल्या हातून काही मोडलं बिघडलं तर, ही धास्ती जास्त वाटायची त्यांना. आजूबाजूला कोणी बोलायला नाही. सर्वांची दारं बंद. बरं, बाहेर फिरावं तर फारसं काही माहिती नाही, परत यायचा रस्ता नाही सापडला तर, म्हणून कुठे जावसंही वाटायचं नाही त्यांना.
तसं वय पण सत्तरीच्या वर होतं त्यांचं. काटक होते एवढंच.
गावाला कसं सगळं गावच त्यांना आपलं वाटायचं. मुख्य वाडीतच मोक्यावर त्यांचं घर होतं. माणसं सारखी जाऊन येऊन असायची. शिवाय घरच्या कामात, अंगणातल्या फुलापानांच्या संगतीत वेळ निघून जायचा त्यांचा.
आजोबा रोज सकाळ-संध्याकाळ गावात चक्कर मारून यायचे. गावातल्या मंदिराच्या कट्ट्यावर त्यांचे मित्र रोज त्यांची वाट बघायला असायचे.
एकटे ते गावालाही होतेच, पण त्यांना तो एकटेपणा अंगावर यायचा नाही. नुसतं घराच्या बाहेर झोपाळ्यावर बसलं तरी छान टाईमपास व्हायचा त्यांचा.
इकडे जुईकडे तशी एक गॅलरी होती, पण तिथून डोकावून, तेही किती वेळ बघणार? आणि काय दिसायचं खालती तर गाड्या धावताना. त्यातून एखादी जास्तच आवाज करत सुसाट वेगाने धावत असेल तर या दोघांनाच धडधडायला लागायचं. आणि मनात त्या चालवणाऱ्याचं कसं होणार, याची उगाचच काळजी वाटायला लागायची.
मात्र संध्याकाळी जुई आली आणि तिची बडबड सुरू झाली की या दोघांचा वेळ भुर्रकन जायचा.
खूप खूप बडबड असायची तिची, शाळेतल्या गोष्टी, मम्मी पप्पांच्या गोष्टी, मैत्रिणींच्या गोष्टी, गप्पांचा बराच खजिना असायचा तिच्याकडे.
आणि दिवसभर एकटे राहून आजी-आजोबांचे कान आसुसलेले असायचेच, ते सारं ऐकण्यासाठी.
म्हणून तर तिला आजी-आजोबा हवे असायचे, सगळं काही सांगण्यासाठी. शाळेतून डायरेक्ट घरी येण्यासाठी. नाहीतर इतर वेळी तिला बेबी सिटिंग मध्ये जावं लागायचं. जे तिला अजिबात आवडत नव्हतं.
त्या काकू तिला खायला घालून लगेच अभ्यासाला बसवायच्या. त्यांच्यात तो ओलावा नव्हता. जसा शाळेतून घरी आल्यावर आजीच्या मिठीत शिरताना असायचा. सहा वर्षाच्या छोट्या जुईला घरात माणसं हवी होती.
तिला शाळा सुटल्यावर स्वतःच्या घरी जाऊन रिलॅक्स व्हावंसं वाटायचं. शाळेतून आल्यावर लोळावं, नाचावं खेळावं, मनाप्रमाणे बागडावं वाटायचं. मात्र दुसऱ्याच्या घरी अवघडूनच राहावं लागायचं. त्या सांगतील तसं वागावं लागायचं, कोणी घ्यायला येईपर्यंत.
आजी-आजोबा आल्यावर मात्र तिला ते सर्व करता यायचं, अगदी मोकळेपणाने. शिवाय भरपूर लाड पण व्हायचे, आजी छान छान खाऊ बनवून ठेवायची नातीसाठी. आजोबा धमाल जादू शिकवायचे.
जुईचा एकटेपणा पार दूर पळायचा. तिला ते कधी परत जाऊ नये असंच वाटायचं.
पण त्यांचाही नाईलाज होता. कसेबसे पंधरा दिवस काढू शकायचे ते. अगदी जुईसाठी म्हणून. कारण इकडे त्यांनाही अवघडल्यासारखं व्हायचं. संध्याकाळ सोडली तर दिवसभर एकटं वाटायचं.
जुईचा आनंद आजी-आजोबांत होता, तर आजी-आजोबांचा आनंद त्यांच्या गावातल्या मोकळ्या हवेत होता.
मेळ साधणं कठीण होतं, जुई खूप खूप रडायची ते जाताना. तिचं नावडतं एकटं पाडणारं रुटीन सुरू होणार, याचा विचार करूनच तिला आणखी हुंदके यायचे.
आजी-आजोबांचही पाऊल अडकायचं जुईसाठी, लवकरच पुन्हा नक्की येऊ, असं प्रॉमिस देऊन ते कसेबसे जड मनाने निघायचे तिथून.
तिला पुन्हा आनंद द्यायला येण्यासाठी, आधी तो आनंद स्वतः घेणं गरजेचं होतं त्यांच्यासाठी..........!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल
Previous article
Next article