प्रेमकथा
मराठी कथा
हे प्रेम की यातना......!!
शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०
मुग्धा तिच्या पहिल्या प्रेमाला कधी विसरु शकलीच नाही. त्याच्या सुखद आठवणी सतत मनात फिरत असायच्याच. पहिलं प्रेम अर्ध अधुरं राहिलेलं. कितीही विसरू म्हटलं तरी न विसरता येणारं. त्याच्या आठवणींतून आनंदाबरोबर अपार यातनाही देणारं.......
आता वीस वर्षांचा काळ उलटला होता. पहिलं प्रेम ती पंधरा वर्षाची असताना झालेलं. मात्र जणू अमर होऊन तिच्या मनात कायमसाठी शिरलेलं.
कधी ती त्याला विसरली असं झालच नाही. एकदातरी त्याची अशीच ओझरती भेट व्हावी, असं तिला नेहमी वाटायचं. अगदी तिने फेसबुकवरही त्याला शोधून पाहिलं, पण नुसत्या नावावरून तो तिला काही सापडला नाही.
पाच दिवसांचा सहवास होता फक्त......पण तिने मात्र जन्मभरासाठी उरात जपला. वेडी आशाही होती, त्याला पुन्हा एकदा बघण्याची......
असंच एके दिवशी, तिच्याच कॉलेजमधली एक दूरची मैत्रीण मुग्धाची फेसबुक फ्रेंड झाली आणि तिच्या एका फोटोवर कमेंट देताना, वरती मुग्धाला त्याचं नाव दिसलं. त्याची कमेंट होती त्या फोटोवर.
मुग्धाला काही कारण नसताना धडधडायला लागलं.
तब्बल वीस वर्षानंतर....!
केवढा मोठा काळ गेला.......!!
आणि आज तो अवचित सापडला.
तिने पटकन त्याच्या नावावर क्लिक केलं, तोच आहे का खात्री करण्यासाठी.
हो तोच, तिचा खट्याळ, हसरा, तिच्यासाठी गाणी गाणारा, तिचं पहिलं प्रेम बनून तिच्यात अजूनही रुतून बसलेला, तोच होता तो......
तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.
ती अकरावीत, आणि तो बारावीत होता त्यावेळी. परीक्षेला बाजूला बसून त्यांच्यात बंध तयार झाला. दोन्हीकडून अगदी एकाच वेळी.
पाच दिवसात तो अधिकच घट्ट झाला, पण मुग्धाकडून मात्र अव्यक्त राहिला. ते पाच दिवसच त्यांचे होते.
दोघेही खूप प्रेम करत असून सुद्धा भेटू शकले नाहीत, अगदी एकाच एरियात राहत असून सुद्धा कोण जाणे कधी दिसलेही नाहीत एकमेकांना.
आणि आता वीस वर्षानंतर तो फेसबुकवर तिला दिसला. शोधत होती ती केव्हाची, पण आता सापडला.
तो पूर्ण दिवस मुग्धासाठी एका स्वप्नासारखा गेला.
खूप खुष होती ती त्याला नुसतं फोटोतच बघूनही. अनोळखी व्यक्तीसाठी जास्त डिटेल्स ओपन होत नव्हत्या, त्यामुळे तिला फोटोवरच समाधान मानावे लागले. त्याची इतर काही माहिती मिळाली नाही.
दुसऱ्या दिवशी फोनवर तिला त्याचं नोटिफिकेशन आलेलं दिसलं. तिच्या त्याने मैत्रिणीच्या फोटोवरच्या कमेंटमध्ये हिच्यासाठी हाय, मी तुला ओळखलं असं लिहिलं होतं.
ते वाचून हिचे उगाच ठोके वाढले. काय करावं उत्तर द्यावे की नाही, प्रश्न पडला. ती त्याच्याशी कधीच बोलली नव्हती. फक्त जीव तोडून प्रेम केलेलं तिने त्याच्यावर.
पण मग तिने विचार केला, बोलायला काय, तेव्हा लहान होते, भीती होती. आता काय हरकत आहे, आणि तसंही वाटत होतंच ना आपल्याला एकदा तरी बोलायला मिळावं, भेटायला मिळावं. इच्छा तर होती ना??
आता काही लहान नाही कोणी.
तिने त्याला रिप्लाय दिला; हो मीही ओळखलं तुला.
त्यानंतर त्याने फक्त कशी आहेस विचारलं, हिने छान आहे सांगितलं......
आणि बस्स एवढ्यावर त्यांचं बोलणं थांबलं....
बोलणार तरी काय पुढे? ते काही एकमेकांचे मित्र नव्हते!!
त्याच्यासाठी मुग्धा, त्याला जरासुद्धा भाव न दिलेली एक मुलगी होती, कदाचित थोड्या कालावधीनंतर त्याच्या मनातुनही ती गेली असेल.
पण मुग्धाने मात्र त्याला आपलं पहिलं प्रेम बनवून कायमसाठी सोबत ठेवलेलं. तिला आजही खूप बोलावं वाटत होतं त्याच्याशी, सांगावं वाटत होतं, त्याला माहीत नसलेलं बरचसं. आज तिच्यात हिम्मत होती, पण या हिम्मतीने निघून गेलेली वेळ थोडीच परत येणार होती??
मात्र हिच हिम्मत तिने त्यावेळी दाखवली असती तर कदाचित तिचं पहिलं खरं-खुरं प्रेम अर्ध अधुरं राहीलं नसतं!!
तिचं एक मन त्याला सांगण्यासाठी आतुर होतं, मी किती प्रेम करत होते तुझ्यावर त्यावेळी; तिची खूप मनापासून इच्छा होती, त्याला एकदा तरी कळावं.
पण दुसरं मन मात्र मागे खेचत होतं, कशाला त्याला हळहळायला लावायचं उगाच. काय फरक पडणार आहे आता त्याने....?
खरंच काय फरक पडणार होता, मुग्धाच्या मनाला कदाचित शांती मिळाली असती एवढंच!!
मुग्धाला वाटलं, तो मैत्रीची रिक्वेस्ट पाठवेल, पण त्याने काही तसं केलं नाही, ना हिने स्वतःहून पुढाकार घेतला. जरी खूप इच्छा होती तरीही......
जे जसं होतं ते तसंच राहिलं........वीस वर्षापूर्वी सारखंच अव्यक्त.....तितकंच गहिरं आणि निस्पृह!
दोघांच्याही आत्ताच्या विश्वात कुठलंही वादळ निर्माण न करता, भावनेच्या आहारी जाऊन स्वतःला न वाहवता मुग्धाने ते प्रेम आधी जसं होतं तसंच मनात जपुन ठेवलं त्याच्या विरह यातनांसह......
तिच्या मनातले भाव त्या 'सरस्वतीचंद्र' मधल्या गाण्यातल्या ओळींपेक्षा वेगळे नव्हतेच मुळी; त्याच्याच सोबतीने तिने पुन्हा एकदा स्वतःला सावरलं ..........
तन से तन का मिलन हो न पाया तो क्या
मन से मन का मिलन कोई कम तो नहीं
खुशबू आती रहे दूर से ही सही
सामने हो चमन कोई कम तो नहीं
चाँद मिलता नहीं सबको सँसार में
है दिया ही बहुत रोशनी के लिए
छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए
ये मुनासिब नहीं आदमी के लिए........
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार:गुगल
【वाचकहो, "पहिलं प्रेम" हा या कथेचा पहिला भाग आहे. जमल्यास नक्की वाचा.】
Previous article
Next article