मराठी कथा
स्त्रीवादी
कधी रे करणार तू काहीतरी माझ्यासाठी......??
शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०
बोल ना हो की नाही....??
प्लिज एकदा हो बोल, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, मी काहीही करेन तुझ्यासाठी, खरंच अगदी काहीही......
उल्काला राहून राहून आठवत होतं सगळं. बेडवर झोपण्यासाठी पडली होती खरी. पण काही केल्या तिला झोप येतच नव्हती.
पूर्वीचे सगळे दिवस डोळ्यासमोर येत होते. उमेश कसा जिथे तिथे तिच्या मागे मागे यायचा. तिला पटवण्याचा प्रयत्न करायचा. या ना त्या कारणाने तिला भुलवू पाहायचा.
तिच्यावर कित्ती कित्ती प्रेम करायचा. स्पेशली त्याचं ते सारखं बोलणं, मी काहीही करेन तुझ्यासाठी, तू फक्त हो म्हण.
त्या शब्दांची उल्कावर जादू झाली आणि ती त्याच्या प्रेमात पडली.
तिच्या आईवडिलांचा ठाम नकार असताना, त्यांच्या मर्जीविरुद्ध जाऊन तिने त्याच्याशी लग्न केलं. त्या एका वाक्यावर भाळून काहीही करेन मी तुझ्यासाठी!!
तशी त्याला त्यावेळी काही करायची वेळ आलीच नाही, हिनेच सर्व केलं आपलं घरदार, जिवाभावाची माणसं सोडली याच्या प्रेमापायी.
पण लग्नानंतर सहा महिन्यातच तिला कळलं, आपलं इथे जमणं मुश्किल आहे. घरात सर्व सासूबाईंच्या म्हणण्यानुसार व्हायचं. त्या सर्व ठरवायच्या आणि हिने आज्ञा पाळायच्या. तिची आवड तिला कधी कुणी विचारायचंच नाही.
आणि तिने स्वतःहून सांगू पाहिलं, तरी कुणी लक्ष दयायचं नाही. कोणाला तिच्यासाठी काही चेंज करायचं नव्हतं.
जेवणातले पदार्थ सासऱ्यांच्या, तिच्या नवऱ्याच्या आवडीचे असायचे. टिव्ही वरचे कार्यक्रम सासूबाईंच्या आवडीचे, त्यांच्या सिरीयल कधी संपायच्याच नाहीत. उल्काच्या घरी तिला सगळे डान्सचे प्रोग्राम बघायला आवडायचे, रिमोट तिच्या हातात असायचा. इकडे टिव्हीचाच काय तिचाच रिमोट प्रत्येकाच्या हातात जाऊन बसल्यासारखं झालं होतं.
तिने झोपायचं कधी, उठायचं कधी, काय काम करायचं, कधी बाहेर जायचं, परत कधी यायचं कोणीतरी दुसरंच ठरवत होतं.
स्वैपाक सासूबाई तिच्याकडूनच करून घ्यायच्या, तिच्या मागे उभं राहून. सतत सूचना देत. मीठ एवढं घाल, तिखट एवढं घाल, कांदा असाच चिर, कुकर लावताना डाळीत आणि तांदळात पाणी पण त्याच ठरवायच्या. पुरती गांगरून जायची उल्का. तिला वाटायचं एवढ्या मला सूचना देण्यापेक्षा स्वतःच करावं की मग सगळं .
तिच्या घरी असं नव्हतं. कोणी तिला अशा सारख्या सूचना दयायचं नाही, कोणी काही बनवताना तिच्या मागे उभं राहायचं नाही. मोकळीक होती सर्व बाबतीत.
उल्का ऑफिसला जायची, पण तिला संध्याकाळी परत घरी जावसच वाटायचं नाही.
ती उमेशलाही सांगायची. माझ्या मनाचा कोंडमारा होतोय रे. प्रत्येकवेळी माझ्या मागे असतात त्या. मला अशी सवय नाही. आपल्याला तर नीट बोलायलाही नाही मिळत रात्रीशिवाय. सारखे ते दोघे आपल्यामध्ये बोलत असतात.
उमेश म्हणायचा होईल सर्व नीट हळू हळू. थोडा धीर धर.
उल्काने धीर धरत धरत तीन वर्षे काढली. पण काही बदललच नाही. उलट तिला सर्वांनी जास्तच ग्रॅंटेड धरलं.
अजूनही तिला तिच्या मनासारखं काही करताच येत नव्हतं. उमेश मस्त होता. त्याचं काहिच रुटीन चेंज झालं नव्हतं. पण उल्काचं मात्र सर्वच सुलट्याचं उलटं होऊन बसलेलं.
कधी बरं वाटत नाही म्हणून रजा घेतली, तर आरामात झोपता यायचं नाही. कधी कामाचा कंटाळा आला तर सांगता यायचं नाही.
तिला वाटायचं, मला माझी स्पेसच नाहीये. आता मी उमेदीच्या दिवसात असं मन मारून जगत राहू, नंतर वय झाल्यावर मोकळीक मिळेलंही कदाचित, पण त्याचा काय उपयोग?
ती उमेशलाही बरेचदा सुचवायची, मी नाहीये आनंदी इथे.
कठीण जातंय मला असं बंधनात राहणं. आपण दुसरीकडे राहू ना. जास्त लांब नाही, जवळच कुठेतरी. पाहीजेतर हाकेच्या अंतरावर. पण जिथे मला स्वातंत्र्य असेल.
पण उमेश काही मनावर घ्यायचाच नाही, त्याच काही हललं नव्हतं ना!!
त्याला वाटायचं, त्याच्यात काय एवढं ? सगळ्याच मुलींना लग्नानंतर ऍडजस्ट करावं लागतं.
उल्काला वाटायचं, सगळ्या करतात म्हणून मी केलं पाहिजे असं नाही ना? मी नाहीये खूष. मला नाही वाटत माझ्या तरुणपणातली वर्षं मी अशी कुढत कुढत काढावीत.
लग्नाअगोदर तुझ्यासाठी काहीही करेन असं छाती ठोकून म्हणणाऱ्या उमेशला तिच्यासाठी घर सोडणं कठीण वाटत होतं.
उल्का किती म्हणायची, संबध तोडायला सांगत नाहीये रे मी. आपण त्यांच्यासाठी सदैव असू. जवळ राहून कडवटपणा वाढत चाललाय. त्यापेक्षा लांब राहून आहे तेवढी गोडी टिकवून ठेऊ.
तुमचं सगळ्यांचं सगळं व्यवस्थित चाललंय, कुचंबणा होतीये ती माझीच. मला इथे माझं काहीच वाटत नाहीये, आणि कुणी ते वाटूनही देत नाहीये. मला अशा ठिकाणी जायचंच जिथे काहीतरी माझं असेल.
ज्या घरातून बाहेर पडल्यावर मला पुन्हा परतायची ओढ लागेल.
समजावून समजावून दमली उल्का, उमेशने कधी मनावर घेतलंच नाही. तिच्यासाठी काही करण्याची वेळ आली होती तरी काही केलंच नाही.
लग्नाअगोदर मागे असताना किमान शंभर वेळा तरी बोलला असेल उमेश, तुझ्यासाठी काहीही करेन, दोन-तीन म्हणता म्हणता दहा वर्ष झाली तरी उल्का अजूनही वाट बघतच होती, त्याने तिच्यासाठी काहीतरी करण्याची..........!!
©️स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article