ती आई असूनही "आई" नाही........!!

स्मिताचा नवरा सुयश लग्नानंतर चार वर्षातच छोट्याश्या  आजाराने अचानकच गेला. तो होता तेव्हा सगळं चांगलं सुरू होतं तिचं सासरी. सासू सासरे आणि लग्न मोडून घरी राहत असलेली नणंद यांच्याबरोबर जमवून घेत स्मिताचा संसार चालला होता.
तसा कोणाचा त्रासही नव्हता. जे ते आपापलं मान ठेऊन होतं. नणंद सुद्धा कामाला जात होती. ती यांच्या संसारात लक्ष घालायची नाही.
पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक सुयश गेला. आणि सगळयांची मनं फिरली.
ज्याच्यासाठी स्मिताला सून म्हणून आणली, तोच घरात नाही म्हटल्यावर सर्वांचा स्मितामधला इंटरेस्टच निघून गेला. तो नाही तर ही कशाला? सगळ्यांची वागणूकच बदलली एकदम. 
घरात धुसफूस सुरू झाली. स्मिता जुळवून घ्यायला बघायची, पण कोणाला तिच्याशी बोलावंस वाटायचं नाही. स्मिताला खूप वाईट वाटायचं. 
सुयश गेला तेव्हा चार महिन्यांची प्रेग्नंट होती स्मिता. 
तो असता तर किती छान असती तिची मानसिक स्थिती. आता तो नव्हता तर तिच्याकडे कोणाला बघावसंही वाटत नव्हतं. 

रितीप्रमाणे सातव्या महिन्यात बाळंतपणासाठी तिला आई माहेरी घेऊन आली. तिने अगदी सर्व केलं स्मिताचं.  पूर्ण महिने भरताच स्मिताने गोंडस मुलाला जन्म दिला. मुलगा झाल्याची बातमी सासरी पोहचताच सगळे आनंदाने धावत आले बाळाला पाहायला.
सगळ्यांना बाळ, सुयशचं दुसरं रूपच वाटत होतं.
सासूबाईना तर खूप घाई झाली होती बाळाला घरी न्यायची.
स्मिताला वाटलं, बाळ पोटात होतं तेव्हा तर कोणी विचारत नव्हतं, बाहेर काय आलं सगळ्यांच प्रेम ओतू जायला लागलं!!

सासूबाईंनी तर बारसं आम्ही तिकडे करू म्हणून हट्ट धरला. पण स्मिताच्या आईनेही आता एवढं बाळंतपण केलं तर सव्वा महिन्याने आम्हीही बारसं करूनच सोडणार म्हणून अडवून धरलं.
बारसं झालं आणि दुसऱ्या दिवशीच स्मिताच्या सासरकडच्यांनी तिला आपल्या बरोबरच घरी आणलं.
 सगळेजण बाळ अनयचे खूप लाड करत होते. जणू काही ते अगदी त्यांच्याच हक्काचंच आहे, असं त्याच्याशी वागत होते.
स्मिताला मात्र अजूनही तितकी चांगली वागणूक मिळत नव्हती. सासूबाई फक्त दूध प्यायला तिच्याकडे सोडायच्या आणि बाकी सर्व वेळ त्याला घेऊन बसायच्या. सगळी कामं स्मिताच्या अंगावर टाकायच्या.
नणंदही तिला मूल-बाळ नाही म्हणून अनयवर सगळी माया पाखडायची. त्या दोघीत अनय स्मिताला जास्त मिळायचाच नाही. 
स्मिताशी आपुलकीने वागणारं, तिची काळजी करणारं त्या घरात कोणी नव्हतंच.
ती आपली एकाकी दिवस ढकलत होती तिथे. 

अनय थोडा मोठा झाल्यावर स्मिताही नोकरीला जाऊ लागली. तसंही घरात तिला कोणी विचारात नव्हतं. आणि माहेरी जाऊन उगीच घरच्यांवर भार टाकावा असंही तिला वाटत नव्हतं. काही दिवस नुसतच रहायला जावं म्हटलं तरी, सासूबाई म्हणायच्या तू जा खुशाल, पण बाळाला काही आम्ही पाठवणार नाही. आम्हाला नाही करमणार त्याच्याशिवाय.

स्मिताला फार एकटं वाटायचं. घरी आल्यावर अनयला जवळ घेतलं की खूप रडायला यायचं तिला. तिला वाटायचं आज सुयश असता तर किती वेगळं असत आमचं आयुष्य!!
कधी कधी तर तिला हे असं जगणं पण नको वाटायचं. अनयकडे बघून ती आला नुसता दिवस ढकलायची.

तोही मोठा होऊ लागला तशी त्याची त्याच्या आजीशीच   ऍटॅचमेन्ट जास्त झाली. ही नोकरीसाठी दिवसभर बाहेर, आली की घरातली कामं असायची समोर वाट बघत. तिला त्याला तेवढा वेळ देता यायचाच नाही. 

तिचं असं एकटेपण बघून तिचे आईवडील तिच्या मागे लागले होते, दुसरं लग्न कर म्हणून.
आता तीही विचार करू लागली. ज्यांना आपण नकोय तिथे उगाच राहण्यात काय अर्थ?

ती तयार झाली तसं आईवडिलांनी तिच्यासाठी एक चांगलं स्थळ पाहिलं. तिच्या सासरकडच्या लोकांनाही सांगितलं. त्यांना तिच्याशी काही देणघेणं नव्हतं. त्यांनी होकार दिला. मात्र स्मिताचा जीव अनयसाठी अडकत होता.
नविन स्थळी सगळी पूर्व कल्पना दिली होती.  तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं, सागरचं देखील हे दुसरं लग्न होतं. त्याला स्मिताच्या मुलाचा काही प्रॉब्लेम नव्हता. तिचा मुलगा तिच्याबरोबर राहायला सागरची काहीच हरकत नव्हती.

पण स्मिताच्या सासूबाई मात्र मुलाला सोडायला अजिबात तयार नव्हत्या. आमच्या घराण्याचा कुलदिपक आहे तो, आम्ही त्याला दुसरीकडे नाही पाठवणार, तो नसेल तर मी जगूच नाही शकणार. मला मारा आणि न्या त्याला कुठे न्यायचंचय तिथे, हेच त्या जेव्हा तेव्हा कांगावा करून बोलत बसायच्या.

त्यांच्या अशा वागण्याने स्मिताचाही नाईलाज झाला.
तिने सागरशी लग्न केलं, पण इच्छा असूनही तिला अनयला आपल्या बरोबर नेता आलं नाही. अनयलाही जास्त आजीचाच लळा असल्याने तो मजेत राहत होता. पण इकडे स्मिताला मात्र मुलाच्या आठवणीने खूप बेचैन व्हायचं. तिला वाटायचं एक मिळतं तर एक सुटतं, असं का?

सागर तिची मनस्थिती समजून तिच्या कलाने वागायचा.
प्रत्येकवेळी तिच्याबरोबर अनयला भेटायला जायचा.
सासूबाई बरेचदा काही न काही कारण काढून त्यांची भेट होणार नाही हेच बघायच्या. त्यांना वाटायचं ही एक दिवस आपल्यापासून पोराला घेऊन जाईल. नणंदही त्यांनाच सामील होती. तिच्याही उध्वस्त जीवनाची आशा होता अनय.
स्मिता त्या दोघींनाही खूप समजवायची मी तुमच्या मर्जीविरुद्ध नाही नेणार त्याला, पण मला भेटू तर द्या माझ्या मुलाला.  
पण तरीही दोघीही दिवसेंदिवस जास्तच अडवून धरायला लागल्या होत्या.
त्यांनी छोट्या अनयवरही प्रेमाची अशी जादू केली की तो देखील आई आई करून स्मिताकडे येईनासाच झाला. 

तिचा नवरा सागर म्हणायचा, आपण केस टाकू, कस्टडी आपल्याकडेच घेऊ. पण स्मिताला ते नको वाटायचं. एक मुलगा घालवलाय त्यांनी, या वयात आणखी भोग नको त्यांच्या वाटेला.
ती बिचारी तरीही त्यांचाच विचार करायची.
जेव्हा ते भेटू देतील तेव्हाच आणि त्यांच्याच हिशोबाने आपल्या पोराला भेटायची. 
कधी दोन महिन्यातून एकदा तर कधी चार महिन्यातून एकदा.......
तिला वाटायचं, अनय खूष आहे ना मग झालं तर. तो हाक देईल तेव्हा मी असेनच त्याच्यासाठी..........!!

या कथेतल्या आईसारखीच एक खरी आई सुद्धा झुरतेय, आपल्या मुलासाठी. तो आता चौदा पंधरा वर्षाचा आहे. अनयसारंखच लहान असतानाच त्याला हिसकावून घेतलंय तिच्या सासरकडच्यांनी. तिच्या नशिबात तर ओझरती भेटही नाही आपल्या मुलाची............
नवरा गेला तसं सासर तुटलं आणि तिचं मुल मात्र आमच्या पोराची आठवण म्हणून तिच्यापासून ओढून घेतलं.

तिचीच कथा थोडीशी फेरफार करून मांडलीये माझ्या शब्दांत, तिच्या दुःखाला फुंकर घालायचा हलकासा प्रयत्न म्हणा हवंतर........


©️स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel