वाईट कोण व्यसन की माणूस.......??

आभा आणि प्रज्ञा दोन्ही सख्ख्या बहिणींची लग्नं एका मागोमाग वर्षभरातच झाली. आभा, प्रज्ञापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती, पण मनासारखं स्थळ मिळायला वेळ गेला. प्रज्ञाने स्वतःच जुळवलं असल्याने आभाचं झालं की लगेच तिचंही लग्न लावून दिलं गेलं.
नवीन नवीन दोन्ही जावयाचे त्यांच्या सासरी अगदी फार लाड होत होते.
तरी त्यातल्या त्यात मोठा जावई जास्त लाडाचा होता. एकतर तो त्यांनी निवडलेला होता, आणि दुसरं म्हणजे त्याला सुपारीचंही व्यसन नव्हतं. म्हणून त्यांना त्याचा फार अभिमान वाटायचा.

धाकटा जावई ड्रिंक्स करतो हे समजल्यापासून मात्र मन उडालं होतं त्यांच त्याच्यावरून. कसं तर, एकदा प्रज्ञाचे आईवडील त्यांच्याकडे रहायला गेले होते, तेव्हाच त्याच्या कंपनीमधे त्यांच्या टिमची सक्सेस सेलिब्रेशन पार्टी होती, त्यामुळे तो थोडं ड्रिंक करून आला होता. 
तसा तो इतरवेळीही कोणाला त्रासही द्यायचा नाही. येऊन झोपून जायचा. 
पण त्याने असं ड्रिंक केलेलं त्याच्या सासू-सासऱ्यांना अजिबात आवडलं नाही. ते त्याला काही बोलले नाहीत, पण प्रज्ञाला मात्र खूप ओरडले. हिच का तुझी चॉईस? जरा नीट तरी बघायचं. बघून बघून असला व्यसनीच बघितलास. आमचा मोठा जावई दारूला स्पर्श सुद्धा करत नाही. अगदी देवमाणूस आहे तो!!
बाबा, तो सारखा नाही घेत हो. आणि मला त्रास तर मुळीच देत नाही. आणि दारू पिणारा किंवा व्यसन असणारा माणूस वाईट आणि न घेणारा चांगला असं कसं म्हणू शकतो आपण? माणसाच्या एखाद्या सवयीचा त्याच्या स्वभावाशी का संबंध जोडायचा?
प्रज्ञाने त्यावेळी खूप प्रयत्न केलेला त्यांना समजावण्याचा पण तिच्या बाबांना काही ते पटलंच नाही. 

प्रज्ञाचा नवरा अधेमधे ड्रिंक्स घेत होता हे खरं असलं तरी तो तिच्यावर प्रचंड प्रेम करायचा हे ही तितकंच खरं होतं. स्वभावाने खूप हळवा होता तो. प्रज्ञाला कामात मदत करायचा, घरात लक्ष घालायचा. शिवाय कोणाच्याही अडीअडचणीला मदत करायला पुढे असायचा. 
तरीही प्रज्ञाच्या माहेरकडच्यांनी त्याच्यावर वाईट हा शिक्का मारून टाकलेला. व्यसन आहे कळल्यापासून त्यांना त्याच्यात फारसा इंटरेस्ट नसायचा.
त्यांच्या तोंडात सतत आभाच्या नवऱ्याचं गुणगान असायचं.

तसं पाहता, आभाचा नवरा तिच्यापेक्षा स्वतःवर जास्त प्रेम करणारा होता. खूप जपायचा तो स्वतःला. त्याला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मर्जीनुसार लागायची. बायकोने आपला प्रत्येक शब्द झेलला पाहिजे, असं त्याला वाटायचं.  
नोकरीला दोघही जायचे. पण तो घरातली एकही काडी इकडची तिकडे करायची कष्ट घ्यायचा नाही. सर्व त्याला हातात लागायचं. तो कामावरून आला की मस्त लोळत ऑर्डरी सोडत बसायचा. आणि आभा दमलेली भागलेली असली तरी त्याचा शब्द झेलत बसायची. तिला पर्यायच नसायचा दुसरा काही.

हे सर्व आभाच्या आईवडिलांनी बघून देखील त्यांच्या मतात फरक पडला नव्हता.
ज्याला व्यसन आहे तो  माणूस खराबच, हेच त्यांच्या डोक्यात पक्क होतं.

प्रज्ञाला वाईट वाटायचं पण एक दिवस त्यांनाही समजेल म्हणून ती सोडून दयायची. 

तो दिवसही लवकरच आला.
एकदा दुपारच्या वेळी, तिच्या वडिलांना असह्य पोटदुखीचा त्रास होऊ लागला आणि तो इतका वाढला की त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच करावं लागलं.
आईने दोन्ही मुलींना फोन केला. दोन्ही मुली धावत आल्या. दोघींनी आपल्या नवऱ्यांना फोन केले. प्रज्ञाचा नवरा गरज ओळखून त्वरेने निघून आला. 
आभाच्या नवऱ्याने मात्र ऑफिस सुटलं की तडक येतो,असं सांगितलं.
हॉस्पिटल मध्ये आल्या आल्या प्रज्ञाच्या नवऱ्याने तिथली सर्व सूत्रं हातात घेतली. सुरुवातीची सगळी धावाधाव केली. त्याच्या येण्याने सर्वा़ंना धीरही मिळाला. 

आभाचा नवरा ऑफिस सुटल्यावर येईपर्यंत आठ वाजले. थोड्या वेळ बसून चौकशी केल्यावर तो आभाला घेऊन निघूनही गेला. जाताना म्हणाला मात्र, मी राहिलो असतो तुमच्या इथे, पण उद्या मला ऑफिसला जाणं भाग आहे, महत्वाची मिटिंग आहे नेमकी.

प्रज्ञाच्या नवऱ्याने प्रज्ञाला आणि आईला घरी पाठवले, आणि तो रात्री हॉस्पिटलमध्येच राहिला.
त्याच रात्री नाही तर पूर्ण ट्रिटमेंट संपेपर्यंत एखादा टास्क असल्यासारखं तो सर्व काही करत होता. त्याची तिथली गरज ओळखून त्याने ऑफिसलाही आठवडाभर रजा टाकून दिली. आभा होती, पण तिचा नवरा मात्र जमेल तशी फेरी मारून जायचा. 
प्रज्ञाचा नवरा इतकं आपलं समजून सर्व करत होता की, हॉस्पिटल मधला स्टाफ तर त्याला त्यांचा मुलगाच समजायला लागला होता. तो दिसला नाही तर तिच्या आईला सर्व विचारायचे, मुलगा कुठे गेला तुमचा?

आता प्रज्ञाच्या बाबांच्याही मनातील तिरस्काराची जागा कौतुकाने घेतली होती. घरी आल्यावर त्यांनी खास बोलून दाखवलं. मुलगा काय करेल तेवढं माझ्या जावयाने केलं.
प्रज्ञा माझा दृष्टिकोन चुकीचा होता. माणसाची व्यसनं आणि त्याचा स्वभाव या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत, याचा अनुभव चांगलाच आला मला. आता मात्र मी कोणाचीही एकांगी पारख करताना नक्की चारवेळा तरी विचार करेन.

हे लिहावं वाटलं कारण परवाच एका मैत्रीणीचा फोन आला होता. तिचे वडील नुकतेच गेले होते. त्यांच्याबद्दल बोलताना ती मधेच म्हणाली, माझ्या बाबांना होतं व्यसन दारूचं, खूप नाव ठेवायचे नातेवाईक त्यांना. पण देवमाणूस होते ग ते. त्यांनी कधी आम्हाला त्रास म्हणून दिला नाही.
आईवर, आम्हा मुलांवर जीवापाड प्रेम केलं त्यांनी, आम्हाला काही कमी पडू दिलं नाही. आज ते नाहीत तर किती पोरकं वाटतय ग. 

शिवाय त्या दिवशी "दोन स्पेशल" मध्ये शुभांगी गोखले सुद्धा म्हणाल्या, सर्वाना मोहनचं व्यसन दिसलं. त्यांना माणूस कळला नाही. विचार केला तर वाटतं, काय असेल तो माणूस, ज्याच्या आठवणी इतके वर्ष त्या उराशी धरून बसल्यात. खूप भारावलं होतं मन त्यावेळी त्या दोघांमधली मनाची बांधिलकी बघून.  

तसे तर प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. मला व्यसनाचं समर्थन अजिबात करायचं नाही. व्यसन वाईटच. व्यसनांच्या आहारी जाऊन कुटुंबाला देशोधडीला लावल्याची उदाहरणं काही कमी नाहीत.
इथे मुद्दा आहे तो व्यसनाला माणसाच्या स्वभावाशी जोडून त्याला तोडून टाकण्याचा..........
बरेचदा आपण व्यसनी माणूस भले तो त्याच्या आहारीही गेला नसेल तरी त्याच्याबद्दल चुकीचं मत घेऊन बसतो.
मी स्वतःही अशी काही माणसं पहिली आहेत, ज्यांना व्यसन होतं, पण ती माणूस म्हणून खूप जास्त चांगली होती.
आणि लहानपणापासून असाही एक माणूस बघितलाय, ज्याला सुपारीचंही व्यसन नव्हतं, मात्र त्याची वृत्ती वाईट होती. तो कधी कोणाबद्दल चांगलं बोललेला मला आठवत नाही ना कोणाच्या कधी गरजेला धावल्याचही. 
सगळीच व्यसनी माणसं वाईट नसतात, आणि सगळीच निर्व्यसनी माणसं चांगली असतातच असं नाही.
इथेही दिसतं तसं नसतं लागू होतंच!!

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार :गुगल
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel