मराठी कथा
विनोदी
विसरायच्या गोष्टी आठवायच्या किती........??
रविवार, १५ मार्च, २०२०
मधे एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, आई पोरांना शाळेत सोडायला तर निघते, पण कारमध्ये पोरचं घ्यायला विसरते.
आणि जेव्हा ते तिच्या लक्षात येतं तेव्हा नुसती खदाखदा हसत बसते. विसराळूपणाची केवढी मोठी हाईट!!
ती बया परदेशातली होती, बिनधास्त हसत सुटली, व्हिडिओही बनवला. आपल्याइकडे असं झालं तर केवढा घोर लागेल त्या बाईच्या जीवाला. अरे बापरे, अल्झायमर वगैरे झाला की काय इतक्यातच आपल्याला, एवढी मोठी गोष्ट विसरू शकतो आपण? या विचारांनीच ती बाई अर्धमेली होईल.
आणि उरलेली बाकीची लोकं ( स्पेशली तिच्या घरचेच) तिला भाजून खातील.
मरेपर्यंत उठता बसता तिला ऐकवत राहतील, विसरळूपणाचा टॅग लागेल तिच्यावर जन्मभरासाठी!!
आपल्याकडं एवढं हलकं कोण घेणारे होय ??
पण त्या बाईंची करामत बघितली, आणि मला मात्र खूपच जास्त हायसं वाटलं. चला, इतकं तर अजून विसरत नाही आपण........
कधी भाजी- आमटीत मीठ राहतं, कधी कुकर गॅसवर ठेवून गॅस ऑन करायचा राहतो, कधी तापवायला ठेवलेलं पातेलंभर दूध त्याचं पुरतं नामोनिशाण मिटेपर्यंत गॅसवर राहतं, कधी कुठली महत्वाची गोष्ट खूप जपून ठेवली की पाहिजे त्या वेळी नेमकी कुठे ठेवली ते आठवत नाही, कधी नवऱ्याशी भांडताना काही महत्वाचे मुद्दे बोलायचे राहिले, हे भांडण संपून प्रेमालिंगन देताना आठवतं, बस् इथपर्यंतच मजल आमची.
तारीख आणि वार कधीच पटकन न आठवणं वगैरे छोट्या छोट्या गोष्टी डेली बेसिसवर चालूच असतात, ते द्या सोडून.
पण त्या बाईसारखा प्रताप काय अजून झाला नाही हातून!!
ह्या इतकुश्या गोष्टी होतात तरी धाकधूक लागते जीवाला, हळूहळू त्या गजनीतल्या अमिर खानसारखी तर गत होणार नाही ना आपली?
पण जेव्हा बरेचदा माझ्याएवढी किंवा माझ्याहून कमी वयाची माणसही विसरताना बघते तेव्हा मात्र मला, मी बऱ्यापैकी नॉर्मल वाटते.
माझा नवरा आणि त्याच्या हातावर हात मारलेली माझी मुलगीही, त्यांच्या समोर ठेवलेला डबा जवळपास आठवड्यातून दोनदा तरी विसरून जातातच.
ऑफिसला निघताना नवरा गाडीपाशी जाऊन हमखास काहीतरी राहीलं म्हणून परत येतोच येतो.
आणि इकडे मी मात्र उगाच माझ्याच विसरण्याचं टेन्शन घेत बसते.
मागे माझा मामेभाऊ गावाहून आला होता, तेव्हा परत जाताना त्याच्या घराची चावी आमच्याकडेच विसरला आणि लक्षात आलं ते गाडीत बसून तास झाल्यावर, त्यातून त्याच्या घरचे देखील दुसरीकडे गेलेले, आला परत माघारी!!
असे एकेकाचे आयटम बघितल्यावर मला मी त्यातल्या त्यात बरी वाटते बाई........
कालच मैत्रिणीचा फोन आला आणि म्हणाली, तुला काही तरी सांगायचं होतं ग, काय ते लक्षातच येत नाहीये.
मी म्हटलं, हाय किती बरं वाटतय आपल्यासारखं असं कोणी बघून.......
अशा छोट्या छोट्या गोष्टी माहेरी असताना विसरल्या ना की कोणी लक्षही देत नाही तिकडं, पण सासरी मात्र आवर्जून लक्षात ठेवल्या जातात बरं का. मी स्वतः सासरी जाईपर्यंत माझी स्मरणशक्ती अगदी उत्तम आहे असं समजत होते, पण सासरी आल्यावर मात्र जगातली एकमेव विसरळू मीच, असा नवीन शोध लावून दिला गेला मला.
माझ्या एका मैत्रिणीचा तर पार कॉन्फिडन्सच घालवून टाकला होता तिच्या सासूबाईंनी, तिच्या विसरण्याचं अवडंबर माजवून!! त्यांची स्वतःची पोरं तिच्याहून जास्त विसरत असताना......डोळ्यात भरायचं ते हिचंच विसरणं!!
या विसरण्याची सुद्धा मज्जा आहे बरं का!!
सगळं विसरतं ते आत्ता आत्ताचच. जुन्या गोष्टी काहीच विसरत नाहीत. मला माझ्या लहानपणाची एकूण एक गोष्ट आठवते, अगदी पहिलीतल्या वर्गातल्या बाई, आणि मित्र मैत्रिणी, त्यांची नावं सुद्धा!! त्यावेळी मैत्रिणीशी झालेली भांडणं आणि त्यांनी दिलेलं प्रेम सुद्धा!! पण तेच काल परवाचा मॅटर आठवायला एक क्षण विचार करावा लागतो. असं का, ते देवच जाणे.........
हे मात्र खरं की मला त्या बाईच्या पोट धरून हसण्याचं फार फार कौतुक वाटलं, पण तिच्या जागेवर मी स्वतःला नुसतं इमॅजीन केलं, तर हार्टबीटस् वाढले माझे!!
अशी पोरं कुठं विसरून आले तर हसणं राहीलं बाजूला, धक्क्यानेच जीव जाईल माझा........
मी म्हणते, तुम्हाला तरी झेपेल का हो??
असे तुमचेही किस्से असतील विसराळूपणाचे तर नक्की सांगा बरं का, वाचायला नक्कीच आवडेल आणि आपल्यासारखी अनेक मंडळी आहेत, हे बघून माझी गजनीच्या वाटेवर चालल्याची हळहळ जरातरी कमी होईल.......!!
©️स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article