बायकांचं ऐकायला काय जातं.......??

आकाशला अगदी चाळीशीतच डायबेटीसने गाठलं.
रिपोर्ट आला तसा अनघा ओरडलीच त्याच्यावर.
तरी मी सांगत होते, बाहेरचं सारखं अचकट विचकट खाणं सोड म्हणून. वडा पाव शिवाय तर दिवस नाही जायचा  तुझा!! घरच्यापेक्षा तुम्हाला बाहेरचं चमचमीत लागतं ना, आता भोगा.......

वागण्याचं काही ताळतंत्र होतं का तुझ्या, रात्री दोन दोन तीन तीन पर्यंत मोबाईलवर गेम खेळत बसायचास, सकाळी तर उठावचं लागतं ना कामाला जायला लवकर? तरी मी सांगत होते, आवर घाल स्वतःवर म्हणून..........

हो ग बाई हो, आता ऐकेन तुझं सर्व, आकाश तिला बोलला तसं जेमतेम आठवडाभर त्याने तिचं सर्व ऐकलं.
त्यानंतर मात्र त्याचं ते नेहमीच रुटीन पुन्हा सुरू झालं.
त्याला सर्व गोष्टींची खूप सवय लागली होती.
चार वाजता चहा पिताना वडापाव, भजी किंवा काहीतरी चमचमीत त्याला लागायचंच.
आणि ऑफिस कॅन्टीनमध्ये समोर बनताना दिसायचं, मग याला कंट्रोल व्हायचंच नाही.
अनघा फोन करून बजावायचं काम करायची, पण अपायकारक आहे माहीत असूनही त्याच मन त्याकडे ओढलं जायचंच.

तसंच रात्रीही दहा मिनिटं बघू पाच मिनिटं बघू, एक गेम खेळू दे, म्हणत कसे दोन अडीच वाजयचे त्याला कळायचंही नाही. रोज मात्र ठरवायचा आज जागलो, उद्या झोपायचं पटकन, पण तो उद्या कधी यायचाच नाही.
अनघा ही सांगून सांगून थकून जायची आणि शेवटी कर काय करायचंय ते म्हणून सोडून द्यायची.

पण हळूहळू डायबेटीसमुळे बाकीही रोग आकाशच्या शरीरात शिरू लागले होते. औषधं तर चालू होती, पण पथ्य काहीच पाळत नसल्याने त्या औषधांचा काही परिणाम व्हायचा नाही.
सतत मागे लागणाऱ्या अनघाचा पण आकाशला वैताग यायचा. कधी तो तिचं ऐकायचा तर कधी मला नको शिकवूस जास्त म्हणून तिच्यावर खेकसायचा.

हे खाऊ नको ते खाऊ नको असं केलं की त्याला आणखीनच इच्छा व्हायची ते सर्व खायची. 

मुलगीही दहा वर्षाची होती, ती देखील त्याच्यावर रुसून बसायची ऐकलं नाही की. तो तेव्हढ्यापुरतं हो हो करायचा आणि पुन्हा स्वतःला हवं तेच करायचा.

शेवटी ज्याची अनघाला भीती होती तो दिवस आलाच.
एका रात्री त्याला छातीत कसंतरी वाटायला लागलं, दोन उलट्याही झाल्या. अनघा म्हणाली, चल जाऊ ऍडमिट हो. तो म्हणाला, नको ऍसिडिटी असेल. थोडा वेळ गेल्यावर पुन्हा त्याला छातीत कळा आल्यासारखं वाटलं, आता मात्र अनघाने त्याला जबरदस्तीच घरातून बाहेर काढलं. आणि हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली. चेक झाल्यावर कळलं त्याला घरीच माईल्ड ऍटॅक येऊन गेला होता, आणखी वेळ गेला असता तर काहीही होण्याची शक्यता होती.

अनघासकट सर्व जवळच्या नातेवाईकांना दगदग झाली, डॉक्टरांनी बजावलं, आता तब्बेतीकडे नीट लक्ष दिलं नाहीत तर तुम्ही तुमच्या बरोबर तुमच्या कुटुंबाचंही नुकसान कराल.
आकाशने भरल्या डोळ्याने डॉक्टरांना आश्वासन दिलं.

घरी आल्यावर अनघा त्याची अगदी बारकाईने काळजी घेत होती. त्याचं पथ्यपाणी अगदी काटेकोरपणे संभाळत होती.
पूर्ण रिकव्हर झाला तसा त्याने ऑफिस जॉईन करायचं ठरवलं. अनघाने अगदी प्रत्येक गोष्टीसाठी त्याचं प्रॉमिस घेतलं. आता तुझी प्रत्येक गोष्ट ऐकेनच असं त्याने तिला कान पकडून सांगितलं.

दोन महिने सगळ्यांपासून दूर राहिलाही. मग हळूहळू मनात यायला लागलं, आता तर आपण ठणठणीत झालोय.
कधीतरी काही बाहेरचं खाल्लं तर काय होणार आहे, रोज थोडच खायचंय.

मग कधीतरी आठवड्यातून एकदा म्हणता म्हणता दोनदा 
सुरू झालं, मग तिनदा, चारदा करता करता रोजच्यावर पोचलं.
फोनचही तेच, अनघाने हातातून खेचून घेतला तरी आता मी बरा आहे ग म्हणून तो काढून घेऊ लागला.
पुन्हा सगळं जैसे थे सुरू झालं.
अनघाला मात्र काळजीने कधी झोपही यायची नाही. हा असाच वागत राहिला तर काय होणार याचं?? 

पुढे पुढे त्याला तर औषधं घ्यायचाही कंटाळा येऊ लागला, अनघाच दटावून त्याला औषधं घ्यायला लावायची. आठवण करून दयायची तर हा बोलायचा सारखं मागे नको लागत जाऊ, कळतं मला माझं, उगाच सर्व गोष्टी शिकवत बसू नकोस.
अनघाला खूप वाईट वाटायचं, रागही यायचा, पण तरीही प्रत्येकवेळी सारं विसरून त्याला सांगत राहायचीच.
पण असं कुठवर चालणार होतं, स्वतःसाठी,स्वतःच्या कुटुंबासाठी आकाशने स्वतःच्या तब्बेतीकडे लक्ष देणं गरजेचं होतं, पण त्याला ती जाणीवच नव्हती.
एवढं काही होत नाही या ऍटीट्यूडने त्याचा जीव घेतलाच एका दिवशी.
कामावर असतानाच त्याला जोरदार ऍटॅक आला ज्याने त्याला काही करायला वेळ दिलाच नाही.

अवघ्या बेचाळीसव्या वर्षीच त्याच्या स्वतःच्या हलगर्जीपणामुळे त्याने आपला जीव गमावला. स्वतःपायी आपल्या कुटुंबाचं कायमचं नुकसान केलं.

घरी भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला अनघा रडून रडून एकच सांगत होती, त्याने काही ऐकलं नाही हो माझं!! स्वतःसाठीही नाही, आणि आमच्यासाठीही नाही..........

ही गोष्ट खरी पाहण्यातली आहे. जिच्याबरोबर घडलं तिचं म्हणणं होतं, आपण हजार वेळा सांगू, ऐकलं तर पाहिजे माणसाने. सारखा खेकसायचा तू नको सांगू मला, बायकांचं ऐकायचं म्हटलं तर यांचा इगो आड येतो. मग ते त्यांच्या भल्यासाठी का असेना........
माझी कळकळ त्यांच्यापर्यंत पोचली असती तर हा दिवस नसता आला हो...........
बायकांचं ऐकायला काय जातं या पुरुषाचं काय माहीत??

©️स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel