अशी पाखरे येती.........!!

खूप दिवसांपासून इच्छा होती, पक्षांसाठी खायला प्यायला काही ठेवावं, पण राहूनच जात होतं. 
तसं पोरगी लहान असताना तिने आणि तिच्या पप्पाने मिळून चिऊताईसाठी छानसं घर बनवलं होतं, पण चिऊताईंनी त्या घरात राहण्यासाठी वा त्यात काय ठेवलंय हे पाहण्यासाठी कणभरही उत्साह दाखवला नाही, त्यामुळे बाप लेकीचं घरटं घरटं करत नाचण्याचं कौतुक, चार दिवसातच संपुष्टात आलं होतं.
बरेचदा उन्हाळ्यात पाणी देखील ठेवलं, पण तिथेही फारसं कोणी फिरकलच नाही कधी.
या वर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा माझं मन पक्षी प्रेमाने उफाळून आलं, आणि नवऱ्याच्या खनपटीला बसून ताबडतोब त्याच्याकडून खिडकीत दोन भांडी बसवून घेतली. 
 
कोsणी तुझ्या भांड्यात खायला प्यायला येणार नाही, तो आणि मुलगी मला त्यांच्या अनुभवावरून सतत डिवचवत होते. मुलगा फक्त माझ्या बाजूने होता, तसाही तो नेहमीच माझ्या बाजूनेच असतो म्हणा!! सध्यातरी त्याला मीच सगळ्यात प्यारी वाटते, पुढचं पुढे........😉


ही खाण्यापिण्याची भांडी लावली, तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. तसंही लगेच कोणी उडत उडत येऊन बसेल, आणि चटापटा खायला लागेल अशी मला अपेक्षाही नव्हती.
नवरा आणि पोरीचं मात्र येऊन जाऊन, आलं का कोणी आलं कोणी करत चिडवणं सुरू होतं.


दुसरा दिवस उजाडला, सकाळी पहिले जाऊन खिडकी उघडली, आणि खाल्लं का काही कोणी म्हणून पाहिलं, तर सर्वकाही तस्सच्या तस्सं होतं. खाणं सोडा पण पाण्यालाही कोणी तोंड लावलं नव्हतं. मन खट्टू झालं खरं, पण आशा मावळली नव्हती. म्हटलं, जाऊ दे, त्यांना खबर लागली नसेल अजून. 


पोरग्याने उठल्या उठल्या पहिले विचारलं, आली का मम्मी चिऊताई??
म्हटलं, नाही रे आली, पण येईल नक्की.
नवरा आणि पोरीचं खुसखुसणं चालू होतंच. 
दर तासाभराने खिजवायला नवरा विचारायचा, आलं का, आलं कोण?
मी म्हणायचे येतील रे नक्की येतील, लगेच कसे येतील? ते पण कोणावर विश्वास ठेवण्याआधी जोखत असतील कदाचित........


दुपार झाली, तरी कोणी फिरकलं नाही. अगदीच म्हणायला चार वाजता एक कावळा खिडकीच्या दांडीवर आला, मला त्यातल्या त्यात बरं वाटलं. म्हटलं कावळा तर कावळा......
कोणी आलं तरी!! 
पण तोही नुसता डोकावून गेला, तोंड काही घातलच नाही त्या भांड्यात, पाण्यालाही शिवला नाही.
भsयंsकर वाईट वाटलं........


पुढचे दोन दिवस असेच गेले, मी तरीही आशेने पक्षी कधीही आले तरी नाऊमेद होऊन जाऊ नयेत, म्हणून त्यांच्या खाऊची व्यवस्था करतच होते.


चौथ्या दिवशी पहाटेला सहज जाग आली, तर चिमण्यांच्या चिवचिवटाचा आवाज आला, खिडकीत हलकीशी हालचाल  जाणवली. मन आनंदी झालं, आणि त्यांचा विचार करत आणखी छान झोप लागली. 
सकाळी उठून भांड्यात डोकावलं, तर थोडंफार चिवडल्यासारखं वाटलं. 
मुलीला म्हटलं, चिमण्या आल्या होत्या अगं सकाळी.
आता कळलं त्यांना, येतील बघ नेहमी.
मुलीने 'लगे रहो मम्मीबाई' करत पाठीवर थोपटलं. इतके दिवस चिडवून का होईना पण तिच्या मनाने आता माझ्या पार्टीत एन्ट्री मारली होती.


त्याच दिवशी दुपारी एक कावळा त्याच्या दोस्ताला घेऊन आला, खिडकीच्या गजावर दोघांनी मिळून खालीवर केलं, मग दोघांनी आळीपाळीने खाण्याच्या भांड्यात डोकावून बघितलं, आणि काय त्यांच्या मनात आलं कोण जाणे, आले त्याहीपेक्षा जास्त वेगाने ते परत उडून गेले.
ते दोघे कावळे आले, आणि परिक्षण करत होते तेव्हा, मनात आनंदाचं फुल उमलायच्या तयारीत होत, पण त्यांनी बेदरकारपणे त्याला उमलण्याआधीच चुरडून चुरडून टाकलं.
मला तर वाटत होतं, त्यांच्या मागे मागे आपणही उडत उडत जावं, त्यांची मानगूट पकडून त्यांना घेऊन यावं आणि मुकाट्याने खायला लावावं. 


खूप खूप कसंनुसं होत होतं मला, एकतर हा घाट चिमण्यांना समोर ठेऊन घातलेला, चिमण्या जाऊ दे; कावळ्यांनी पण तोंड फिरवावं???


असं करत करत साधारण आठवडा गेला असेल, एकही पाखरू आम्ही ठेवलेल्या खाण्यापिण्याच्या भांड्यात इंटरेस्ट दाखवत नव्हतं. 
आता घरचेही म्हणायला लागले, पक्षीही नाकारतायत बघ.
तेरे हाथ का खाना किसीss को नही खाना.........
माझ्या स्वैपाकाचा उजेड मला माहित असल्याने, मला त्यांच म्हणणं ठामपणे नाकारताही येत नव्हतं.
तशी बाकीही इतर गोष्टींची लालूच दाखवून झाली होती, चोच कुठल्याच गोष्टींना मारली जात नव्हती.
मनात उदासी दाटून, अगदी दाssटूssन येत होती........


मग एकदा वाटलं, DDLJ मध्ये कसे सिमरनचे बाबूजी आओ ssआओ करून कबुतरांना बोलवत होते, तसं आपण पण करून बघूया. 
लग्गेच मुलांबरोबर खिडकीतून पक्ष्यांना या याss या याss करून पाहिलं. पक्षी तर काही आले नाहीच, पण चार कुत्री उगाच खिडकीजवळ येऊन भुंकू लागली.
हाही प्लॅन फ्लॉप झाला.


मग दुसऱ्या दिवशी खिडकीत बसून मुलाला कावळ्या, चिमणीची छान छान गाणी म्हणायला लावली, एक दोन करता करता बिचाऱ्याने जवळपास साडेचार गाणी म्हटली, तरीदेखील एकाही पक्षाचं मन द्रवलं नाही म्हटल्यावर त्याचा मूड हाफ झाला, आणि त्याने तुझे सगळे आयटम फुसके असतात मम्मी, म्हणून माझ्याशी कट्टी करून टाकली.
त्या कावळ्या चिमणीच्या नादात पोराच्या आणि माझ्या नातेसंबंधात मात्र थोडावेळ का होईना वितुष्ट आलं.


तरीही मला कुठेतरी वाटत होतं, आयेंगे मेरे कावळा चिमणी जरूर आयेंगे..........  

आणि खरंच, पुढे काही दिवसांनी आदल्या रात्री त्यात टाकलेला खाऊ सकाळी निम्म्याच्या वर संपलेला दिसला, मला इतका आनंद वाटला की काय सांगू!!


आणखी दोन दिवसांनी दुपारी एक कावळा नेहमीप्रमाणे आला, मी तर मुद्दाम बघितलंच नाही त्याच्याकडे, आपण कौतुकाने खायला आले म्हणून बघावं आणि ह्यांनी तोंड वेंगाडून निघून जावं, हा रोजचा खेळ झाला होता त्यांच्यासाठी......
आमच्या घरातलं कोणीही त्याला बघून एक्साईट झालं नाही म्हणून की काय कोणास ठाऊक, पण त्या दिवशी मात्र तो अन्नाला शिवला, स्वतः तर खाल्लंच, आणि काव काव करून दुसऱ्यालाही बोलावलं. हे दोघे आले आणि त्यांना पाहून आणखी चार जण आले. प्रत्येकजण आळीपाळीने चोचीत खाणं घेऊन बाजूला जाऊन ग्रीलवर थांबत होतं, अगदी लाईन लावून खात होते सगळे!!


हाssय मला काय वाटलं असेल त्या क्षणी, ते फक्त माझी पोरगी आणि पोरगाच जाणे.......!!


दोघांनी आनंदाने नाचत जाऊन त्यांच्या पप्पाला बोलावून आणलं, आणि त्याला टेचात म्हणाले, बघ पप्पा आमच्या मम्मीच्या जेवणाचे फॅन किती जमलेत........
पप्पाने तोंडावर नाही दाखवलं, पण त्यालाही मनात बरं वाटलंच........


त्या दिवसापासून पुढे तिथे कावळे मंडळ सतत फिरकायला लागलं. त्या भांड्यात काही टाकायचं अवकाश, क्षणार्धात त्यांचा म्होरक्या झडप घालायला येतो आणि मग काव काव करून बाकीच्यांना आमंत्रण देतो.
चिमणी नही तो कावळाही सही करत करत, मी त्या कावळे जमातीच्या कधी प्रेमात पडले, मलाही कळलं नाही.
तेच होते जे मी काही देईन ते चवीचवीने खात होते, ते खात राहायचे, मी त्यांच्याकडे कौतुकाने बघत राहायचे.
प्यार तो हो ना ही था..........💕💕💕


माझ्या हातची मुगाच्या डाळीची खिचडी, त्यांची भारी फेवरेट आहे. खिचडी भांड्यात टाकली रे टाकली की पाच मिनिटाच्या आत चट्टामट्टा करून टाकतात.
कोणीतरी तुटून पडतंय आपण बनवलेल्या गोष्टीवर हे पाहण्याचं भाग्य मला फक्त कावळ्यांमुळेच लाभलं.......!!


तर या कावळ्यांवर मी समाधानी होते, चिमण्या न येण्याचं दुःखही पार विसरले होते. 
सकाळ सकाळ येऊन त्या थोडंफार खात होत्या, पण त्याचं  सुख- दुःख मी सोडलं होतं.


एकदा मात्र आम्ही दुपारी खिडकी थोडी ओढून घेतली होती, आणि चिवचिव कानावर आली, म्हणून मी फटीतून हळूच बघितलं तर दोन ठमाया मस्तपैकी खादडत बसल्या होत्या.
खिडकी नेहमीसारखी उघडी नव्हती म्हणून थोड्या वेळाने आणखी देखील काही ठमाया आल्या, आणि त्या भांड्यात नाचत नाचत खाऊन गेल्या.
अच्छा, यांना असं हवं होतं तर.......
एकदम मस्त वाटलं मला, ज्या हव्या होत्या त्याही आल्या एकदाच्या, लपून छपून का होईना......
हळूहळू या लाजत मुरडत येणाऱ्या चिमण्या बिनधास्त झाल्या, आणि खिडकी उघडी असतानाही  खाऊ खायला येऊन चिवचिवाट करू लागल्या.


कावळे, चिमण्या, आणि आतातर कबुतरं, साळुंख्याही येतात. सध्या तरी एवढेच जमा झालेत. मी खूष आहे, दोन अडीच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आता कुठे त्यांना आमची खिडकी हक्काची वाटू लागलीये.


आमचाही खूप मस्त टाईमपास होतो, या सगळ्यांच्या हालचाली टिपताना!! काहीही खाताना यांचा वाटा काढतोच, पण कधी जास्तीचं उरलं सुरलं घातलं, तरी मनावर न घेता गट्टम करून टाकतात. यांच्या कृपेने घरातलं अन्न अजिबात म्हणजे, वाया जात नाही, घरचे नसेनाका पण बाहेरचे तरी मेरे हाथका बना मिटक्या मारत खातात!!


और क्या चाहीये, बोलो.........??


©️ स्नेहल अखिला अन्वित


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel