आनंददायी
प्रेरणादायी
मराठी कथा
हा पिवळा गुलमोहोर........माझ्या घरासमोरचा. माझ्या घरातल्या प्रत्येक खिडकीतून दिसणारा. माझ्या घरासमोर यांची रांग आहे. त्यातलं हे झाड माझं खूप आवडतं, कारण हे स्वैपाकघराच्या खिडकीतून अगदी समोर दिसतं. माझा आवडता रंग पिवळा. आणि आता हा असा इतका पिवळाधम्म होऊन बसलाय की मला सतत त्याच्याकडे बघतच राहावसं वाटतं!!
ऑल इज वेल.......
शुक्रवार, १० जुलै, २०२०
हा पिवळा गुलमोहोर........माझ्या घरासमोरचा. माझ्या घरातल्या प्रत्येक खिडकीतून दिसणारा. माझ्या घरासमोर यांची रांग आहे. त्यातलं हे झाड माझं खूप आवडतं, कारण हे स्वैपाकघराच्या खिडकीतून अगदी समोर दिसतं. माझा आवडता रंग पिवळा. आणि आता हा असा इतका पिवळाधम्म होऊन बसलाय की मला सतत त्याच्याकडे बघतच राहावसं वाटतं!!
असं एकमेकांकडे बघून बघूनच गहिरी दोस्ती झालीये आमची..........
अगदी हल्लीचीच गोष्ट. नुकतच लॉकडाऊन सुरू झालेलं, पहिला दिवस पार पडला, पण दुसऱ्या दिवशी मात्र मन कोण जाणे भीतीने ग्रासलं गेलं. कसं व्हायचं, कसं निभवायचं, कसं सगळ्यांना जपायचं, जमेल का हे सगळं, एवढ्या वर्षात पहिल्यांदाच अशी वेळ आली ही, नको नको ते विचार मनात येऊन घश्याला कोरड पडल्यासारखं झालं म्हणून पाणी प्यायला गेले, तर नेहमीप्रमाणे हे गुलमोहोराचं झाड समोर आलं.
तसं आम्ही बरेचदा नजरेने एकमेकांशी बोलत असतो. अगदी लहान असताना साताऱ्याला आमच्या घराच्या येण्याजाण्याच्या वाटेवर लाल गुलमोहोर होता. घराच्या खिडकीत बसले की समोर दिसायचा. तेव्हापासूनची गट्टी आहे गुलमोहोराशी. त्या लाल फुलांचा सुगंध अजूनही तसाच्या तस्साच आठवणीत आहे. तो लाल होता इथे पिवळ्यांची रांग आहे. ही घरासमोरची गुलमोहोराची झाडं मला माझ्या खूप जवळची, अगदी माहेरची वाटतात. त्यांचा नेहमी मनाला आधार वाटतो.
त्या दिवशीही पाणी पिता पिता माझ्या आवडत्या झाडाकडे बघत बसले, तर उगाच डोळे भरून आले. नेहमीप्रमाणे आमचं मुक्याने बोलणं सुरू झालं. मी म्हटलं, बघ ना रे काय चाललंय हे......
तर तो हलकेच हसून म्हणाला, कशाला ग घाबरतेस एवढी??
तीनचार महिन्यांपूर्वी माझी अवस्था काय होती माहीत नाही का तुला??
तेव्हा माझी रया गेलेली बघून किती हुरहूरायचीस??
सगळं सगळं सुटलं होतं माझ्याकडचं. सगळ्या फांद्या मोडून पडल्या, पानं गळाली, पक्षांची किलबिल हरवली, कसा झालो होतो मी. बघवत तरी होतो का कुणाला??
मलाही वाईट वाटत होतं खूप, असं सगळं तुटून जाताना......
पण मी न खचता दटून राहिलो, वाईट काळ हळूहळू का होईना पण गेला, आणि मग एके दिवशी पुन्हा पालवी फुटली, आणि हा हा म्हणता मी बघ कसा भरभरून डवरलो.
पुन्हा एकेक फांदी येऊ लागली, तिला पुन्हा अनेक फांद्या फुटू लागल्या, म्हणता म्हणता हिरवागार करून टाकलं त्यांनी मला!!
मग पुन्हा ते सोडून गेलेले सारे पक्षी घरटी बांधयला लागले. त्यांचे संसार फुलू लागले, त्यांच्या किलबिलाटाने माझ्यात पुन्हा चैतन्य संचारलं, आणि मी अधिकाधिक फुलू मोहरू लागलो. थोड्या महिन्यांपूर्वी अगदी ओकाबोका झालेला मी बघतेयसना कसा पानाफुलांनी, ऊर्जेच्या पिवळ्याधम्म रंगानी सजलोय!!
नको काळजी करूस, ही वाईट वेळ लवकरच जाईल आणि सर्वकाही चांगलं होईल......
माझ्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू आलं, Thank u म्हणून त्याला एक छानसा फ्लाईंग किस दिला. मनातली सगळी उदासी दूर झाली, आणि आनंदाची लहर उमटली. मोबाईल घेतला आणि "ऑल इज वेल" गाणं मोठ्याने लावलं. त्या गाण्याबरोबर मीही ऑssल इज वेssल म्हणत गायला कम केकटायला सुरुवात केली.
पोरं, त्यांच्या बापासकट हिला काय झटका आला म्हणून पाहायला लागली, पण त्यानंतर पुढच्याच क्षणी सारं घर ऑल इज वेल, ऑssल इज वेssल म्हणत गायला नाचायला लागलं.........
त्या दिवसापासून रोज सकाळी उठलं की पहिले मी त्या गुलमोहराला हाssय करून त्याच्याकडून ऊर्जा भरून घेते, अन् तो पिवळाधम्मक मस्त डोलून मला आश्वस्त करत म्हणतो, आता लवकरच सगळं काही चांगलं होणार आहे बरं..........!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
Previous article
Next article
