मला तुझ्या पास्टशी काही देणं-घेणं नाही.....!!

दृष्टी दिसायला अगदी लोभस मुलगी. स्वप्रयत्नाने करियर मध्येही उंची गाठलेली. कोणालाही अगदी चुटकीसारखी पसंत पडेल अशी. प्रश्न हिला कोणी पसंत पडण्याचाच होता. 
तिच्या कंपनीमध्ये तसे बरेचजण तिच्यात इंटेरेस्टड होते.  तिला त्यात मयूर चांगला वाटायचा. मयूर दिसला की तिला कुठेतरी आत हलल्यासारखं व्हायचं.
ही फायनान्स डिपार्टमेंटमध्ये तर तो प्रोडक्शनमध्ये होता.
बरेचदा ते मिटिंग्सनाच भेटायचे. नुसतं बघणं व्हायचं, त्याचंही आणि तिचंही.
तसे तर दोघही लग्नाचे होते. नजरेने एकमेकांना आवडतही होते, पण.........
पण काही घडतच नव्हतं, त्यांच्यात.

एकदा मात्र कंपनीच्या कँटीनमध्ये लंच करताना मयूरच्या एका कलीगने त्याला हिच्याकडे स्टेअर करताना पकडलं, आणि तिथून ते सगळीकडे पसरलं, म्हणजे त्या कलीगनेच पसरवलं. 
दृष्टीच्या कानावर आलं, तेव्हा तर तिच्या मनात गुदगुल्याच झाल्या.
पण हे सगळं लांब लांबच होतं, तो काही स्वतःहून पुढे येतच नव्हता. शेवटी हिनेच त्याची सगळी माहिती काढायचं ठरवलं.
 

तिच्या डिपार्टमेंटमधली रिचा त्याच्याशी छान, फ्रिली बोलायची.
दोघही अगोदरपासून ओळखत असावेत, म्हणून मग दृष्टीने एक दिवस डायरेक्ट रिचालाच विचारलं. 
रिचा म्हणाली, तू सिरीयस होऊ नको हा त्याच्याबद्दल. 
हा माझ्याच कॉलेजमध्ये होता. आणि त्याची दोन अफेअर्स तर मी समोरच बघितलीत. त्यातली एक माझी जवळची मैत्रिणच होती. किती कोणाबरोबर राहील याची काही गॅरेंटी नाही.

हे ऐकून दृष्टीला पुढे काही बोलताच आलं नाही. 
पण रात्री झोपताना मात्र तिच्या डोक्यातून त्याचा विषय जातच नव्हता.
तिने विचार केला, आपण रिचाला त्याच्या अफेअरबद्दल कुठे विचारलेलं? तो कसा आहे स्वभावाने हे जाणून घ्यायचं होत आपल्याला.
आणि अफेअरचं काय, त्या वयात बहुतेकांबरोबर होतं असं........म्हणून काय तो लग्न करण्याचा लायकीचा नाही हे कसं समजू शकतो आपण?
मलाही कोणी आवडत होतच की त्यावेळी.....

दुसऱ्या दिवशी ती पुन्हा फ्रेश मनाने रिचाकडे गेली, आणि तिला म्हणाली, तू त्याला ओळखतेस, म्हणून मी तुझ्याकडे आलीये. मला तो चांगला वाटतो. मला तू त्याचा पास्ट सांगू नको, खरं खोटं बघायला मी नव्हते त्यावेळी तिथे. मला तू हे सांग, तुला त्याचा स्वभाव कसा वाटतो?
रिचा म्हणाली, दृष्टी खरंच किती मॅच्युअर आहेस ग तू!! तूच आज मला नव्याने विचार करायला शिकवलंस. माणूस कितीही चांगला वागला तरी आपण त्याचा पास्ट मनात ठेऊनच राहतो, आपणही विसरत नाही, आणि त्यालाही विसरू देत नाही.
मला माफ कर आणि खरं सांगू कुठेतरी माझ्या मैत्रिणीचं आणि ह्याचं अफेअर तुटल्याचा राग माझ्या मनात होता, म्हणून मी काल असं बोलून गेले.
पण मयूर खरंच स्वभावाने खूप चांगला आहे, मदतीला तर एक नंबर माणूस, काहीही प्रॉब्लेम घेऊन जा तो सॉल्व्ह करणारच!! मला वाटतय अगोदरच्या प्रेमातल्या अपयशामुळे तो पुढाकार घ्यायला घाबरतोय बहुतेक. पण तू त्याला खूप आवडतेस एवढं नक्की........

दृष्टीला खूप छान वाटलं, आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे, प्रत्येकवेळी काय मुलानेच पुढं आलं पाहिजे असं थोडंच आहे?? आणि इतकं ठरलं आहे तर उगाच वेळ कशाला घालवा??

दुसऱ्या दिवशी दृष्टी सुंदरसा ड्रेस घालून एकदम मस्त तयार होऊनच ऑफिसला आली, इतरांच्या खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या. मयुरकडूनही मिळाली पण फक्त नजरेतून.
यावेळी मात्र त्याच्या नजरेने दिलेली कॉम्प्लिमेंट तिने हसून घेतली.
दोन मिनिटं त्याला कळलंच नाही ही आपल्याशीच हसतेय का ते!! 
पण नंतर मात्र स्वतःला सावरून त्यानेही तिला छानशी स्माईल दिली.

काय करावं तिला सुचतच नव्हतं, कसं सांगावं त्याला?
शेवटी तिने रिचालच गाठलं, आणि त्याचा नंबर घेतला.
खूप धीर एकवटून तिने त्याला मेसेज केला, भेटायचं की नुसतं बघतच रहायचं??
याला कळलंच नाही काही, तिचा नंबर नव्हता त्याच्याकडे.
त्याने who ?? म्हणून मेसेज केला...
हिने लगेच रिप्लाय पाठवला, सध्या तुझी कलीग, पण संध्याकाळी भेटलो तर कदाचित कायमची सोबती होऊ शकते- दृष्टी फ्रॉम फायनान्स.

मेसेज वाचून तो ऑफिसमध्ये होता, म्हणून उडू नाही शकला फक्त!! 
पण एका क्षणात ''अफकोर्स, खूप आवडेल" असा मेसेज त्याने तिला पाठवून दिला.

ते त्या दिवशी भेटले, पुढेही अनेकदा भेटले, त्यांचे सूर जुळले आणि कायमचे एकमेकांचेही झाले.
दृष्टीने काही डिसीजन घेण्याआधी मयुरने तिला स्वतःच्या पास्टबद्दल सर्व काही सांगितलं. खरंतर ते तिला तसंही माहिती होतंच. 
तिने त्यावेळीही त्याला अगदी ठासून सांगितलं, मला तुझ्या पास्टशी काही देणं-घेणं नाही.

विशेष म्हणजे पुढे कधीही त्याचा पास्ट तिच्या बोलण्यातून सुद्धा डोकावला नाही, तिने तो डोक्यातून काढला तो काढलाच. तो आता कसा आहे हेच तिला जास्त महत्वाचं होतं..........
पास्ट घट्ट पकडून ठेऊन तिला त्यांचा प्रेझेंट खराब करायचा नव्हता.

पण दृष्टीसारखा विचार करणारे किती असतात?
आता त्या बच्चन साहेबांचंच बघा ना, त्यांची मुलं मोठी झाली, नातवंड झाली, तरी अजूनही त्यांचा तरुण वयातला रोमान्स लोकं  विसरतच नाहीत.   
अठ्ठयाहत्तरीला पोचलेल्या माणसाला अजूनही डिवचणं, 
त्याची  खिल्ली उडवणं सुरू आहेच......!!

नवऱ्याचं काही असेल तर बायको विसरेल, एकवेळ बायकोचा पास्ट नवराही विसरेल, पण या पास्टची साक्षीदार असलेली      लोकं त्यांच्या मरेपर्यंत ना विसरणार ना विसरू देणार ........


दुसऱ्याचं नको ते बरोब्बर लक्षात राहतं लोकांच्या.........!!

हो की नाही??

©️ स्नेहल अखिला अन्वित


लेख आवडल्यास माझ्या 'हल्ला गुल्ला' या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा.........





 


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel