तू माझं इन्स्पिरेशन आहेस, मम्मी.......!!

संयुरी अभ्यास करताना मृदुला तिच्या बाजूला बसून तिची वह्या पुस्तकं चाळत होती. अगदी सहजच तिने त्यातली एक वही उचलली आणि ती बघता बघता त्यातल्या 
एका पानावर तिला "My mom is my inspiration" असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं दिसलं. ते बघून मृदुलाला एकदम मस्त फिल झालं. तिला वाटलं, खरंच का आपण कोणाची प्रेरणा होऊ शकतो?
ही तर मोठी व्हायला लागली तशी माझ्याशी सारखी वादच घालत असते. माझं पटत तर काही नाही, तरी मी तिचं इन्स्पिरेशन?

तिने लगेच संयुरीला दाखवलं, आणि म्हणाली काय ग हे?
असंही आहे का?
संयुरी म्हणली, ते? असच लिहिलंय. एवढं काही मनावर घेऊ नकोस!!

ऐकून मृदुलाचे डोळे लगेच भरून आले, ते पाहताच, संयुरीने तिला पटकन मिठी मारली आणि म्हणाली, हो मम्मा, खरं आहे तू आणि फक्त तूच माझी इन्स्पिरेशन आहेस!!

मम्मा, कळायला लागल्यापासून मला नेहमी हेच वाटायचं, मला माझ्या मम्मीसारखं व्हायचय!!
तुझ्याकडे अगदी बारकाईने बघायचे मी, आठवतं का सगळे म्हणायचे तुला, संयुरी दिसतेही तुझ्यासारखी आणि बोलतेही तूझ्यासारखीच. मला खूप भारी वाटायचं त्यावेळी!!

एकदा आठवतं, दिवाळीत मी हट्टून बसलेले, मला तुझ्यासारखी साडी नेसव म्हणून, त्यावेळी तू मला खूप जास्त आवडलेलीस, आणि मला तुझ्या सारखच दिसायचं होतं डिट्टो!!
हो ना, एवढ्याश्या बाहुलीला साडी नेसवता नेसवता किती  नाकेनऊ आलेलं मला. आणि चालता तरी येत होतं का ग तुला? 
नव्हतं येत अजिबात, पण तरीही मला तुझ्यासारखं इकडे तिकडे करायचं होतच!!

लहान असताना तुझं दिसणं, तुझे हावभाव सगळं आवडायचं, आणि मोठी होता होता कळलं, तू जशी बाहेरून छान आहेस अगदी तशीच आतूनही, मग तुझं सगळंच आवडायला लागलं.

मम्मी, तू ऑफिसवरून आलीस की पहिले घट्ट मिठी मारायचीस मला, ती मिठी त्या लहान वयातही खूप काही सांगून जायची मला. बाळा, मी ऑफिसला जाते खरी, पण मन तुझ्याबरोबरच असतं माझं, तेवढं समजून घे ना.
हो ग संयुरी, असंच वाटायचं मला, अजूनही वाटतं.
तेव्हा तर जास्तच, तू लहान होतीस ना. माझा सगळा वेळ तुझ्यासाठी हवा होता खरं तर........

पप्पाने आपल्याला सोडून दिलं नसतं, तर गेली नसतीस ना तू ऑफिसला, मम्मी?
संयुरी, पप्पाने आपल्याला नाही सोडलं, आपण त्याला सोडलं कळलं?

त्याच्याबरोबर राहणं म्हणजे माझं स्वत्व विसरणं होतं, तो बोलेल ते करायचं, तो सांगेल तसंच वागायचं, बस्स्  त्याला आवडेल तसंच राहायचं.
नव्हतं जमत मला, तरी मी तुझ्यासाठी म्हणून काढली सात वर्ष त्याच्याबरोबर. पण प्रत्येकवेळी स्वतःचं मन मारून जगणं नाही जमलं मला त्याहून जास्त. 
मम्मी, हो कळत होतं मला. किती घुसमट व्हायची तुझी. आणि तुला असं पाहून माझीही. आणि त्याला सोडल्यावर किती मोकळ्या झालो आपण!! 
तू तर नव्याने फुललीस जणू, किती भार होता ग मनावर तुझ्या!!
आता बघ ना; जरा तू हे नको करू, ते नको करू म्हटलीस, तर किती राग येतो मला, आणि तू कसं जमवलस इतकी वर्ष सारं मनाविरुद्ध??

संयुरी, तुझ्याकडे पाहून ग. तुझ्यासाठी धीर धरला होता. आपल्या मुलीला दोघांचं प्रेम मिळावं म्हणून. पण तो तुलाही माझ्यासारखंच ट्रिट करू लागला आणि माझा संयम सुटला.
त्याला तुलासुद्धा माझ्यासारखी नुसती मान डोलावणारी बाहुली बनवायचं होतं लहानपणापासूनच!!

मी तर नसतेच राहिले मम्मी, नक्कीच पळून गेले असते कुठेतरी!!
कुठे जाणार होतीस संयुरी, बाहेरच्या जगात देखील बरेचसे असेच आहेत, स्त्रीच्या कमतरतेला हायलाईट करून तिला खचवू पाहणारे. तिचे सर्वाधिकार स्वतःकडे राखून ठेऊन तिला कठपुतळीचं आयुष्य जगायला लावणारे.......
पळून जाऊन मार्ग नाही सुटत संयुरी, खंबीर राहून सुटतात. जे काय समोर आहे, त्याला धीटपणे सामोरं जाऊन सुटतात. 

बघ, म्हणूनच म्हणते मी तुला माझं इन्स्पिरेशन!! 
हो का? म्हणूनच भांडत असतेस सारखी माझ्याशी, त्याचं काय?
मग मम्मी, सगळंच कसं ग मी तुझं ऐकणार, नाही पटणार तिथे वाद घालणारच ना? कधी तू बरोबर कधी मी ही बरोबर असते. भांडताना आपल्या हेक्यात ते लक्षात येत नाही. पण नंतर येते ना मी तुला मिठी मारायला, आणि सॉरी बोलायला.
मी पण येते हा संयुरी, माझी चूक लक्षात आली की तुला सॉरी बोलायला.

एक विचारू संयुरी, तुला पप्पाची आठवण येते का ग? तुला भेटायचं असेल तर भेटू शकते तू. मला तुझ्यासाठी खूप गिल्टी वाटतं.
नाही, मला त्याचा विचार आला की मनात भीतीच येते  अजूनही. पण पुढे कधी काही वाटलं तर नक्की सांगेन.
सध्यातरी मला आपलं हे मोकळं मोकळं जग खूप आवडतं मम्मी.......
मलाही खूप आवडतंय; हे असं मोकळं, दडपणरहीत, स्वतःच्या मर्जीचं जगणं, नाहीतर त्या वरवरच्या प्रेमाच्या लेपणाखाली जीव अगदी दबला जात होता ग माझा संयुरी.........

बोलता बोलताच डोळयांतून धारा वाहू लागल्या मृदुलाच्या. संयुरीने पटकन तिचे डोळे पुसले आणि तिला जवळ घेऊन म्हणाली, आता नको ते आठवून दुःख करत बसायचं नाही हा मम्मी, तूला बघून मी हसते, तुला बघून मी जगते, तू माझं इन्स्पिरेशन आहेस ना मम्मी….......!!


©️स्नेहल अखिला अन्वित


फोटो साभार: गुगल


कथा आवडल्यास माझ्या 'हल्ला गुल्ला' या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा........


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel