सावधान पालकहो सावधान.........!!

असंच मागच्या वर्षीच्या एका मे महिन्यातल्या टळटळीत दुपारी मुलगा बाजूला खेळत होता, मी आणि मुलगी त्याच्याबरोबर खेळत खेळत पेंगत होतो. तेवढ्यात माझा मोबाईल गायला लागला, खरंतर मला तो उचलायचाही कंटाळा आला होता, पण ऐकेचना म्हणून वैतागून उचलला, तर पलीकडून अगदी गोsड, लाडिक आवाज काढत, माझ्या मुलीचं नाव घेऊन एका बाईने विचारलं, तुम्ही हिचीच आई बोलताय का?? 

तिच्या अतिगोड आवाजावरून मी हेरलं हा फोन नक्की कुठून आलाय.....

आणि त्वरित सावध झाले.....
तिला मीही मग तितकाच गोड आवाज काढत म्हटलं,
हो हो मीच बोलतेय बोला ना........
तुमची मुलगी आठवीत गेली ना आता?
मी म्हटलं, हो गेली तर आहे, तुम्हाला साखर वाटायची राहिली का?
तसं नाही हो, तुम्ही मुलीला घेऊन भेटायला येऊ शकता का??? 
मी म्हटलं, कशाला आणि कुठे घेऊन यायचं तिला?? इतक्या लवकर कर्तव्य पार पाडत नाहीत आमच्यात!!

काय हो तुम्ही, मी ना अमुक अमुक क्लासमधून बोलतेय. तुमच्या मुलीचं फ्युचर ब्राईट करायचंय असेल तर आमच्या क्लासशिवाय पर्याय नाही. तिच्या शाळेतल्या खूप जणांनी ऍडमिशन घेतली आहे आतापासून?? नावं सांगू का तुम्हाला??

मी म्हटलं, काही गरज नाही त्याची. आम्ही डोळे मिटून कुणालाही फॉलो करणाऱ्यातले नाही. 
अहो, तुमच्या मुलीच्या फ्युचरचा प्रश्न आहे हा, बाईने गोड स्वर सोडून समोरच्याला घाबरवण्याचा स्वर काढला.
मी तिला म्हटलं, आमच्याच मुलीच्या फ्युचरचा प्रश्न आहे ना, बघू आमचं आम्ही. तुम्ही निवांत रहा.
तरी ती बोललीच, पण चांगला क्लास लावणं गरज आहे, सध्याची!!
हे बघा माझी मुलगी आता जिथे क्लासला जाते, तो क्लास आमच्या दृष्टीने चांगलाच आहे. तोच मी कॅन्टीन्यू करणार आहे आम्हाला दुसरीकडे पाठवण्यात काही इंटरेस्ट नाही.
एवढं बोलून मी फोन पटकणार तेवढ्यातच ती झटकन म्हणाली.
अहो आठवीत गेली ना तुमची मुलगी आता? मग आता दहावीच्या दृष्टीकोनातून नको का विचार करायला??
मी म्हटलं कशाला?
दोन आणखी वर्ष आहेत की बाकी अजून दहावीला...
तसं नाही आत्ता पासून तुम्ही चांगला क्लास लावलात तर तिचे परसेंटेज खूप वाढतील.
मी म्हटलं, बाईs मी सांगितलं ना की ती ऑलरेडी चांगल्याच क्लासला आहे. 
तसं नाही, तुम्ही एकदा फक्त एकदा भेटायला या, आपण समोरासमोर बोलू. आणि विषय सोडवू.
थोडक्यात तिला म्हणायचं होतं, या मग तुम्हाला कशी जाळ्यात अडकवते बघाच.

मी तिचं प्रपोजल शक्य तितक्या नम्रतेने धुडकावून लावलं. 
हा फोन आमच्या इथल्या एका नामांकित क्लासमधून होता.
ह्या क्लासला घातलं की पोरं नक्की चमकणार, अशी बऱ्याच पालकांची श्रद्धा.

असो.....

तर या बाईला माझा सपशेल नकार देऊन झाला होता. तरी पुन्हा एक महिना सोडून त्याच मधाळ आवाजात तिने फोन करून विचारलं, हॅलो तुम्ही हिची आई का?
खरंतर हा प्रश्न ऐकल्यावरच माझं डोकं सटकलेलं. त्या बाईला माहीत होतं मीच ती, तरी मुद्दाम??
पुन्हा मी शांततेने म्हटलं, मी नाही का तुम्हाला मागच्या वेळीच सांगितलेलं, हो म्हणून. तुम्हाला डाऊट का यावा परत??
कामाचं बोला......
मी ना अमुक अमुक क्लासमधून बोलतेय......
माहीत आहे हो, मी सांगितलेलं ना इंटरेस्ट नाही म्हणून
खोटा आव आणून बया बोलली, हो का. पण तरी तुम्ही विचार करून बघा ना.
मी म्हटलं, तुम्ही आमचं नाव पहिल्यांदा खोडून टाका. आणि पुन्हा फोन करण्याचे कष्ट घेऊ नका.

यानंतर मध्ये काही दिवस गेले, माझा नवरा एक दिवस म्हणाला, अगं त्या अमुक क्लासवाल्या एका बाईचा फोन येतोय सारखा. 
मला ऑफिसमधून नीट काही बोलता येत नाही, बघ ना जरा तू.
मी म्हटलं, देवाss आता त्यांनी तुला पकडलं वाटतं.
म्हणजे मी पटले नाही तर नवऱ्याकडे गाडी वळवली?
हद्द झाली यार!!

सर्वात मोठा डाऊट मला हा आहे की यांना पूर्ण खानदानाचे नंबर वाटतं कोण?
कारण ओपन डे ला बरेचसे क्लासवाले पॅम्प्लेट्स घेऊन पालकांची वाट अडवून उभे असतात. पण मी आतापर्यंत एकदाही चुकूनसुद्धा यांंना धडकले नाही.
मग कोण?? बरं ते सांगतात, आम्हाला इतर पालक देतात रेफरन्स म्हणून, चला मान्य करू एकवेळ. माझ्या मुलीच्या फ्रेन्ड्सकडे माझा नंबर असेलही, पण तिच्या वडिलांचा कसा असेल? कधीही न देता??
यांना नंबर पुरवले जातात, असं मला तरी खात्रीने वाटतं.

तर नवऱ्याकडे डाळ शिजली नाही म्हणून पुन्हा आणखी दोन महिन्यांनी मला फोन आला, पुन्हा तेच नव्याने!!
मी म्हटलं तुम्ही काय 'गजनी' समजता काय आम्हाला?
पालक येडे बिडे वाटतात की काय तुम्हाला? नाव खोडा म्हणून सांगितलं तरी फोन करताय. कळस झाला हो आता.
मी खूप नाही नाही ते बोलले, सर्व इकडचं तिकडचं फ्रस्टेशन काढलं, आयती बकरी मिळाल्यावर.
वाटलं आता त्यांची खोड मोडली.

पुन्हा कोणाला रिपीट फोन करताना चार वेळा विचार करतील.
पण नाही हो नाही, हल्ली शिक्षणाकडे बिझनेस म्हणून बघतात बरेचजण, माझी मुलगी आता नववीत गेली, अजूनही त्यांचं दर चार महिन्यांनी फोन करणं चालूच आहे. अगदी आता कोरोनाच्या लोकडाऊन मध्ये सुद्धा त्यांचा बिझनेस सुरूच होता. 
प्रत्येकवेळेला मी खूप रागाने बोलते, तरी ते त्यांचा निर्लज्जपणा सोडत नाहीतच. नंबर सुद्धा वेगवेगळे वापरतात, ते तरी किती ब्लॉक करणार आपण?
चतुरपणे काबीज करायचं असतं यांना.

पण यात पालकांची चुकीही तेवढीच वाटते मला. त्यांनी अवास्तव महत्व देऊन ठेवलंय, दहावीबरोबर, आठवी- नववीला. आमच्या पालकांना दहावीचीच काळजी असायची. हल्लीचे आठवीपासून सुपर अलर्ट होतात. पॅकेज डिल झालंय आठवी-नववी- दहावी, आता या क्लासेससाठी.

हल्लीच कॉल आला होता पुन्हा, तेव्हा त्यांना म्हटलं, आता घरातून खेचून न्यायचं तेवढं बाकी राहीलं आहे तुमचं, ते पण सुरू करा की.
किती तो जीव जातोय आमच्या मुलांचं फ्युचर ब्राईट करण्यासाठी तुमचा?? कमाल आहे!!

खरंच मोठे मोठे क्लास, त्यांच्या मोठ्या मोठ्या फिया भरून पोरांचे परसेंटेज वाढतात का?? 
माझा बिलकुल विश्वास नाही, आणि जे यांच्या जाळ्यात अडकतात, त्यांना आपण कितीही समजवा, पोरांचं फ्युचर ब्राईट करायचं खूळ त्यांच्या डोक्यातून जातच नाही.

सगळेच क्लास असे असतील असं नाही, पण हा माझा अगदी म्हणजे अगदी खरा अनुभव आहे, बाकी तुमचं तुम्ही ठरवा काय ते.......


©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझ्या 'हल्ला गुल्ला' या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा........


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel