कौटुंबिक
मराठी कथा
सामाजिक
अगं ईशा, ते बघ ना त्या समोरच्या झाडाची फांदी कशी तुटलीये, किती छान वाढत होतं, कुणाचा तरी धक्का लागलेला दिसतोय.
पण दुपारी पडल्या पडल्या कितीही अडवलं तरी मनात विचार यायलाच लागले, बघितलं तर सोसायटीत असंच वाढलेलं ते झाड. सासूबाईंनी स्वतः लावलेलंही नव्हतं, तरी ते तुटलं तर त्यांना किती वाईट वाटलं.
ते झाड बेवारस होतं, मी तर ह्यांच्या एकुलत्या एका मुलाची बायको, नात्याने यांची सून.
त्या झाडाला मिळालं तसं प्रेम माणसाला का नाही?? ते तर किती दूरचं, ना नात्यातलं ना गोत्यातलं.....
जाऊ दे, सोडून द्यावं नेहमीसारखच, असं म्हणत चहाचं आधण ठेवावं म्हणून ती उठायला आणि सासूबाई तिच्या खोलीत यायला एकच गाठ पडली.
काय करू ग, हे नातंच असं आहे ना? मला पण मुलगी नव्हती, आणि मीही विचार करायचे, सून हिच माझी मुलगी असेल, तिला अगदी मुलगीच मानेन.
होतं ग, कधी आतल्या आत वयामुळे तब्बेतीचीही कुरकुर चालू असते, सगळंच काही सांगता येत नाही, आणि मग नाही करावी वाटली तरी चिडचिड होतेच.
आज कधी नव्हे ते सासूबाईचे डोळे आपल्यासाठी भरून आलेले पाहून ईशाला खूपच रडायला आलं.
ईशाच्या सासूबाई काही न बोलता तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या फक्त, आणि ईशाला त्या स्पर्शात आईची माया जाणवून आणखी खूप खूप भरून येत होतं.........
©️ स्नेहल अखिला अन्वित
सासूबाई, मी काय तुमची कोणीच नाही??
गुरुवार, २३ जुलै, २०२०
अगं ईशा, ते बघ ना त्या समोरच्या झाडाची फांदी कशी तुटलीये, किती छान वाढत होतं, कुणाचा तरी धक्का लागलेला दिसतोय.
जरा जातेस का, एक चिंधी घेऊन, त्याला तुटलय तिथे बांधली ना की पुन्हा जोडलं जाईल ते.
राहू दे, थांब मीच जाते, त्याशिवाय मला चैन पडणार नाही, एवढं बोलून ईशाच्या सासूबाई खाली गेल्या सुद्धा.
अगदी निगुतीने ती तुटलेली फांदी त्यांनी चिंधी लावून जोडली.
वर आल्या आणि ईशाला म्हणाल्या, आत्ता बरं वाटलं बघ मला.
ईशा त्यांच्याकडे बघून नुसतं कसंनुसं हसली........
पण दुपारी पडल्या पडल्या कितीही अडवलं तरी मनात विचार यायलाच लागले, बघितलं तर सोसायटीत असंच वाढलेलं ते झाड. सासूबाईंनी स्वतः लावलेलंही नव्हतं, तरी ते तुटलं तर त्यांना किती वाईट वाटलं.
मग माणसाचं मन तुटलं तर काही वाटत नाही का?
झाडाचं दुःख कळतं त्यांना माणसाचं दुःख कळत नाही असं कसं??
कधी जाणून बुजून, कधी अनवधानाने, मीही दुखावली गेलीये त्यांच्याकडून, पण मला नाही कधी असं आपलेपणाने गोंजारलं.
त्या झाडाच्या फांदीला तर कुणी तिसऱ्यानेच तोडलं होतं, तरी ह्या सावरायला गेल्या.
रागावून किंवा दुखावून झाल्यावर का होईना, पण नंतर मलाही असं जवळ घेतलं असतं, आईच्या मायेने डोक्यावरून हात फिरवला असता तर आमंचही नातं प्रेमाने जोडलं गेलं असतं. ज्यात राग रुसवे तर असते, पण अंतरी मात्र एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी असती.
ते झाड बेवारस होतं, मी तर ह्यांच्या एकुलत्या एका मुलाची बायको, नात्याने यांची सून.
मानली तर मुलगीच........
काही डोक्यात ठेऊन आले नव्हते येताना, सासू हिच आई आता तुझी, आईने खूपदा बजावून सांगितलेलं.
मीही मानलं.
वागायलाही लागले होते तशीच, आई आई करून पुढे मागे करायचे. पण ह्यांना ते काही रुचलं नाही, ह्यांनी नेहमी योग्य ते अंतर मेंटेन ठेवलं.
धुसपुस व्हायची तेव्हा वाटायचं, त्यात काय आई नाही का ओरडायची आपल्याला??
पण आई रागावून, भांडून झाल्यावर काही वेळाने जवळ घ्यायला यायची. तिच्या कुशीत आणखी रडायला यायचं खरं, पण मायेची ऊबही मिळायची. दोघींचं मन स्वच्छ होऊन जायचं.
इथे कोणी नाही येत जवळ घ्यायला, मी खरंच सगळं सगळं विसरून जाईन, जर ह्यांचा आईच्या मायेने डोक्यावरून हात फिरला तर.......
त्या झाडाला मिळालं तसं प्रेम माणसाला का नाही?? ते तर किती दूरचं, ना नात्यातलं ना गोत्यातलं.....
मन हळवं जवळच्या माणसासाठी का नाही......??
जश्याजश्या एकेक गोष्टी मनात येत होत्या, तश्यातश्या त्या ईशाच्या डोळ्यात जास्त पाणी आणत होत्या.
तिला वाटलं, जावं आणि विचारावं का, माझ्याबद्दल का असं नाही वाटलं कधी जे त्या झाडाबद्दल वाटलं??
सासूबाई, खरंच का हो मी तुमची कोणीच नाही??
जाऊ दे, सोडून द्यावं नेहमीसारखच, असं म्हणत चहाचं आधण ठेवावं म्हणून ती उठायला आणि सासूबाई तिच्या खोलीत यायला एकच गाठ पडली.
मी उठतच होते, चहा करायला. ईशा काहीश्या आश्चर्यानेच म्हणाली.
त्यावर तिच्या सासूबाई म्हणाल्या, चहा पिऊया ग नंतर. आज मुद्दाम आले तुझ्याकडे. सकाळी मी जेव्हा तुला म्हटलं ना झाडाची फांदी जोडून बरं वाटलं, तेव्हा तुझा पडलेला चेहरा आणि डोळ्यातून कोणत्याही क्षणी ओघळेल एवढं भरलेलं पाणी मला खूप काही सांगून गेलं ग.
आज दुपारची झोप लागलीच नाही नेहमीसारखी, जणू तुझा चेहरा समोर येऊन बोलत होता सारखा, मला का नाही असं जोडून घेत तुमच्याबरोबर??
पहिल्यांदा माझं मन मला म्हणालं, अगं पहिले घरातलं माणूस जोड, मग बाहेरचं.
काय करू ग, हे नातंच असं आहे ना? मला पण मुलगी नव्हती, आणि मीही विचार करायचे, सून हिच माझी मुलगी असेल, तिला अगदी मुलगीच मानेन.
पण काय होतं कुणास ठाऊक, कुठूनतरी तो इगो डोकावतोच, ते सासुपण बाहेर येतंच. कधी मागचं आठवतं, माझी सासू कशी मला त्रास द्यायची, कधी वाटतं उगाच नको डोक्यावर चढवायला, आपल्यालाच जड जाईल मग. कधी काही वेगळंच असतं डोक्यात, राग कुणा भलत्यावरच असतो, आणि निघतो मात्र हक्काच्या सुनेवर......
होतं ग, कधी आतल्या आत वयामुळे तब्बेतीचीही कुरकुर चालू असते, सगळंच काही सांगता येत नाही, आणि मग नाही करावी वाटली तरी चिडचिड होतेच.
पण आज मी तुझ्याशी नव्याने जोडायला आलीये, तुझ्या त्या सकाळच्या चेहऱ्याने आतून हलवलं मला........
आज कधी नव्हे ते सासूबाईचे डोळे आपल्यासाठी भरून आलेले पाहून ईशाला खूपच रडायला आलं.
तीही त्यांच्या कुशीत शिरून म्हणाली, मी ही चुकलेय हो आई, बरेचदा छोट्या छोट्या कारणांचा मी सुद्धा बाऊ केलाय, बहुतेक माझाही दुसऱ्या कुणावरचा राग तुमच्यावर निघत असावा. हक्काच्या ना आपण एकमेकींसाठी!!
पण आज तुम्ही आलात स्वतःहून, मला सगळं मिळालं. आपलं नाही पटलं ना तर भांडू, पण नंतर मात्र अशाच पुन्हा जवळ येऊ. हे जवळ येणच गरजेचं आहे एकमेकांशी प्रेमाने जोडलं जाण्यासाठी........हो ना??
ईशाच्या सासूबाई काही न बोलता तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या फक्त, आणि ईशाला त्या स्पर्शात आईची माया जाणवून आणखी खूप खूप भरून येत होतं.........
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज हल्ला गुल्ला नक्की लाईक आणि फॉलो करा........
Previous article
Next article