काहीही खपवून घेणार नाही........!!

भांडण हा जवळपास प्रत्येक नवरा-बायकोचा जिव्हाळ्याचा, टाईमपासचा विषय. जर हलका घेतला तरच हं.....
पण जर दोघांनीही त्यामध्ये इगो नावाचा लांडगा आणला, तर मग तो विषय कधी स्फोटक बनेल काही सांगता येत नाही.

आपले प्रेम आणि सुमनही तसेच. कधी प्रेमाने कधी रागाने भांडत भांडत संसार करणारे!! दोघांचही एकमेकांवर खूप प्रेम आणि खूप प्रेम म्हणून भांडणंही खूप खूप.
कचाकचा आणि वचावचा भांडून जीव शांत झाल्यावर मात्र पुन्हा ते तितक्याच निर्मळ मनाने एकत्र येत.
गोडशी मुलगीही होती दोघांना सहा वर्षाची. बऱ्यापैकी गुण्यागोविंदाने राहत होते सगळे.

एकदा मात्र असंच कुठल्यातरी कारणाने प्रेम आणि सुमनचं वाजलं, दोघांना काय झालं कुणास ठाऊक कोणी मागे हटायचं नावच घेईना. प्रेम सुमनच्या नावाने ठो ठो करतोय अन् सुमन प्रेमच्या नावाने ठणाणा करतीये.
पोरगी बिचारी एवढसं तोंड करून बसली होती. कधी ह्यांचा बाजार आटपणार म्हणून!!

पण यांचा बाजार आवरायच्या ऐवजी वाढतच चालला होता, आणि अचानक काय प्रेमच्या मनात आलं कोणास ठाऊक; त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि सुमनने तोंड बंद करावं म्हणून त्याने तिच्या सणकन् कानाखाली वाजवली.
सुमनला दोन मिनिटं काही कळलंच नाही, हे असं एवढ्या वर्षात पहिल्यांदा घडलं होतं. 
मुलगीही घाबरली, बावरून बसली.

सुमन रागाने बेडवर गेली, आणि रडायला लागली, पण तेवढ्यातच विजेच्या वेगाने उठली, प्रेमच्या जवळ गेली; त्याच्या पाठीत जोरात गुद्दा घातला आणि म्हणाली पुन्हा माझ्या अंगावर हात उगारशील तर बघ. मी काहीही खपवून घेणाऱ्यातली नाही.
प्रेम तिच्याकडे बघतच राहिला. तिने सगळा जीव एकवटून घातलेला गुद्दा त्याला चांगलाच लागला होता.
खरं तर राग यायला पाहिजे होता त्याला तिचा, पण का कोणास ठाऊक त्याला तिचं कौतुकच वाटलं. 
तो तिच्या जवळ जाऊन तिला सॉरी म्हणाला. घडला प्रकार दोघही नंतर विसरून गेले आणि पुन्हा एक झाले, प्रेम होतंच ना.......

पण त्यानंतर कधीही, सुमनचा कितीही राग आला तरी प्रेमचा हात पुन्हा उगारला गेला नाही. त्याला आपली चूक कायमची समजली.

सुमनने त्यावेळी विचार केला, मी आज याने हात उठवलेला सहन केला, तर त्याला पुढच्यावेळी आणखी जोर येईल, चालतं हिला सगळं. मुलगीही बघतेय माझी, तिला काय लहानपणापासून दाखवून देऊ, स्त्रीच्या जातीला अन्याय सहन करावाच लागतो. मुळीच नाही!! म्हणूनच रडत बसण्यापेक्षा तिने वाराला उत्तर देऊन प्रेमला स्वतःचा हिसका दाखवून दिला.

खरंच, आपण सहन करतो म्हणून थोपवल्या जातात बऱ्याच गोष्टी, आणि त्यात आपणच अडकतो मग, आपणच दुःखी होतो. 
वर जे घडलंय ती फँटसी नाही, खरी गोष्ट आहे मला एकीने  सांगितलेली. तिने हे केलय, कारण वाट्टेल ते सहन न करण्यासाठी अंगात धमक असावी लागते ती तिच्याकडे होती.............

प्रेम आपल्या जागी आणि रिस्पेक्ट आपल्या जागी, काय म्हणता??


©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझ्या 'हल्ला गुल्ला' या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा........


गोष्ट खरी पण आठवली हे वाचून👆

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel