कौटुंबिक
मराठी कथा
सणवार
नको ग बाई, तुझं तुलाच ठेव ते सगळं.........
बरं, उपवास करताना नाही पाहिलस, पण मी आजारी असल्यावर घरातली कामं करताना पाहिलयस ना तू त्यांना?
ते काही मला माहित नाही......
हो का? म्हणजे चला, मला जशी माझी आजी, आई आणि बाकी सगळ्या आठवतात प्रत्येक सणाला तशी मीही तुला नंतर नक्कीच आठवणार.
ती छबी राहावी मनात...........!!
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०
आई, हरितालिकेचा उपवास कुमारिकांसाठी आहे ना ग? मग तू का अजूनही करतेस ग?, ओवीने कुतूहलाने विचारलं.
असं काही नाही, लग्न झालेल्या बायका आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, आपला संसार सुखावह व्हावा, यासाठीही करतात.
खरंच का ग आई, असे उपवास करून काही होतं?
जशी ज्याची श्रद्धा बाळा...…...पूर्वापार चालत आलंय. ज्याला जमतं, पटतं ते करतात. मी लहान असताना ना आम्ही मैत्रिणी अगदी आवर्जून करायचोच उपवास हरितालिकेचा. आणि आम्हाला तर पूर्ण विश्वासही होता, हे व्रत केल्यावर चांगला, मनासारखा नवरा मिळणारच!! तो मिळावा यासाठीच करायचो. कोणी कोणी तर पाणीही न पिता करायच्या. एकदम कडक!!
बापरे!! पाणीही न पिता? मी तर न खाता दोन तास राहू शकत नाही, त्या सगळ्या कशा राहत असतील ग आई?
अगं एकदा मनानं ठरवलं, आणि तुमचा त्या गोष्टीवर पूर्ण विश्वास असला ना की काही अवघड नाही. तुलाही जमेल ओवी.
नको ग बाई, तुझं तुलाच ठेव ते सगळं.........
पण आई तू बाबांसाठी वटपौर्णिमा करतेस, हरितालिका करतेस, बाबांना नाही ग पाहिलं कधी तुझ्यासाठी कुठलाही उपवास करताना??
बरं, उपवास करताना नाही पाहिलस, पण मी आजारी असल्यावर घरातली कामं करताना पाहिलयस ना तू त्यांना?
अगदी भांडी घासण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत सर्व करताना पाहिलंयस ना तू?
कुठे बाहेरगावी गेले की आवर्जून मला साडी आणि तुला ड्रेस आणताना पाहिलंयस ना तू त्यांना?
माझे बाबा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा त्यांची सर्व जिम्मेदारी उचलताना पहिलयस ना तू?
माझ्या वाढदिवशी न चुकता काहीतरी छान प्लॅनिंग करून सरप्राईज देताना देखील पाहिलंच आहेस ना त्यांना तू?
मग न करेनात का उपवास? उपवासापेक्षा माणसाचं कर्म जास्त महत्वाचं!! ते चांगलं असेल तर आपोआप सगळी फळं मिळतात. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते ओवी. एकाने असं केलं म्हणून दुसऱ्यानेही तसच केलं पाहिजे असं थोडंच आहे?
आणि माझं म्हणशील तर माझी श्रद्धा आहे. माझ्या आजीला, आईला, मामी, मावशी, काकीला अगदी लहानपणापासून हे सर्व करताना बघितलं, म्हणून आपोआप आवड निर्माण झाली. त्या त्या सणांना त्यांची आठवण हटकून येतेच अगदी. डोळ्यासमोर जशाच्या तशाच येतात त्या सगळं करताना. ते माझ्या मनात तसंच राहावं, म्हणूनही मी करते जमेल तशी व्रतवैकल्य. आणि करताना मनात तो भावही येतो. फक्त पतीचंच नाही, सर्वांचच हित चिंतते मी. सर्वाना सुखी ठेव हिच नेहमी प्रार्थना असते माझी.
आणि कोण जाणो, तू आत्ता म्हणतीयेस, मी नाही करणार असं काही. कदाचित नंतर प्रत्येक सणाला तुझ्याही मनात हे सर्व करतानाची माझी छबी येईल, आणि तुही सुरू करशील असं काही? आपल्या आवडत्या माणसांचं सर्वच जपून ठेवावं वाटतं नेहमी आपल्याला.........
ते काही मला माहित नाही......
पण तुला आणि तुझ्या त्या मैत्रिणींना मिळाले का ग मनासारखे नवरे, ते सांग मला पहिले?
खरं तर मनासारखं फारच कमी लोकांना मिळतं ओवी. जे मिळालय त्यात चांगलं शोधायची किमया साधली की सगळंच चांगलं वाटायला लागतं.
हो ते तर मी आत्ताच ऐकलं बाबाचं कौतुक, तुझ्या तोंडून. कळली मला तुझी किमया आई!!
ही व्रतवैकल्य करूनच साधली गेलीये हो ती.......मी उपवास करताना शारीरिक शुद्धिबरोबर मनाचं शुद्धीकरणही करत असते. मन चंगा तो सब चंगा!! नाहीतर कितीही काही करा, कशालाच अर्थ नाही.
हे अगदी खरं आई. पण त्या दोन हरितालिका, त्यांना वाहिलेली पत्री, त्यांच्यासमोर तू काढलेली रांगोळी, ते समोर ठेवलेलं गूळ खोबरं......बघूनच प्रसन्न वाटतय हं मनाला. सकाळी तुझा फोटोही काढलाय मी अगदी मनोभावे पूजा करताना. त्यांच्याबरोबर तुझंही रूप माझ्या मोबाईलमध्ये आणि डोळ्यातही साठवून घेतलय मी........
हो का? म्हणजे चला, मला जशी माझी आजी, आई आणि बाकी सगळ्या आठवतात प्रत्येक सणाला तशी मीही तुला नंतर नक्कीच आठवणार.
आणि आता कितीही नाकं मुरडलीस तरी मला मनात ठेवून तू हे असं सगळं अगदी आवडीने करणार, खात्री आहे मला!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article