ये घर बहुत हसीन है.........!!

मंथन, आज आपल्या घरी बाबांचे मित्र आले होते ना, ते जाताना काय बोलले ऐकलस?

नाही माझं नव्हतं एवढं लक्ष......

ते म्हणाले, फारच छोटं घर आहे बुवा तुमचं, मोठं घेऊन टाका की आता!!

काय? ते असं बोलले, ऋता?

हो ना, मला खूप वाईट वाटलं. मला माझं घर जसं आहे तसं खूप आवडतं. आणि घर म्हणजे काय शे-पाचशे रुपयाला मिळणारी गोष्ट आहे का, घेऊन टाका म्हणे.

पण ते काका असं बोललेच कसे, याचाच मी विचार करतोय??

का? त्यात काय, त्यांचं असेल ना मोठं घर, त्यांना काय बोलायला.

हो मोठं घर आहे त्यांचं, पण आत्ता झालंय अगं. काका-काकू रिटायर झाल्यावर आलेल्या पैशात घेतलय ते. एवढी वर्ष आपल्याहून लहान घरात काढली त्यांनी. छोट्याश्या दोन खोल्या होत्या, आणि सहा माणसं होती घरात. ते दोघे नवरा बायको, त्याची दोन मुलं, आणि त्यांचे आईवडील. आम्ही कितीदातरी जायचो ना त्यांच्या घरी.
आणि खरं सांगायचं तर काकूही मला नेहमी त्या एवढ्याश्या घरात देखील समाधानीच वाटायच्या. कधी त्यांना दुर्मुखलेलं बघितलं नाही मी. जरा दोन माणसं वाढली तर एकदम गच्च भरल्यासारखं वाटायचं त्यांचं घर.

मग? तरी कसं असं बोलले रे ते मंथन? बोलताना कुणाला लागेलं याचा विचारही न यावा त्यांच्या मनात? आणि आपणही त्या स्थितीतून गेलो असताना??

जाऊ दे तू नको विचार करू जास्त. वय झालेल्या माणसांचं काय मनावर घ्यायचं एवढं?

पण याच वय झालेल्या माणसांना आपण काही सांगायला गेलो तर म्हणतात ना लगेच, उगीच नाही केस पिकले आमचे. आमच्याकडे अनुभव जास्त आहे सगळ्याचा. मग समोरच्याला उगाच दुखवू नये, हे कसं कळत नाही बरं?

कितीही म्हटलं तरी लागलच ऋताला!! तसे तिच्या घराला लहान म्हणणारे पहिलेच नव्हते ते. पटकन कोणीतरी आलं- गेललं बोलून जायचं सहजच, घर तसं लहान आहे नाही!! गावाकडून आलेले नातेवाईक तर हमखास बोलायचेच. त्यांचंही बरोबर, त्यांना मोठ्या घराची सवय. त्या मानाने मुंबईतलं तीन खोल्याचं घर सुद्धा टिचकच भासायचं त्यांना!!

पण ऋताला मात्र नेहमी वाटायचं, घर लहान असो की मोठं, त्यात राहणारी माणसं कशी आहेत यावर त्या घराचं मोठेपण अवलंबून असावं ना? 
बाहेरून आलेल्या कोणत्याही माणसाचं हसतमुखाने स्वागत जिथे होतं, ते घर मोठं असो की छोटं काय फरक पडतो?
जे घर दुसऱ्याच्या दुःखात त्याचा आधार बनतं, ते घर खुशाल असेना का लहान? 
ज्या घरातली माणसं गोडीगुलाबीने बोलून- चालून,  कधी रागावून, प्रसंगी भांडून का होईना एकमेकांच्या बरोबर आहेत, ज्यांच्या मनात एकमेकांसाठी भरपूर जागा आहे, त्या घराचं घरपण त्याच्या आकारावरून का जोखावं?
घर मोठं असो की लहान, आपण ते कसं ठेवतो त्यावर आहे ना सगळं? 
ज्या घरात पाऊल टाकल्यावर प्रेमाची ओल जाणवते, जिव्हाळा वाटतो, मुख्य म्हणजे मनाला प्रसन्न वाटतं, ते घर  नक्कीच मोठं!!

घर हसरं असेल तर छोटंही तितकच अमूल्य........

देवाच्या मंदिरात पाया पडताना काय आपण मंदिर बघून पाया पडतो का? ह्या देवाचं मंदिर छोटं, आपण मोठ्या मंदिरातल्या देवाला पाया पडू. देव कुठेका दिसेना आपले हात जोडले जातातच ना?
तसंच माणसं बघून घरं जवळ करावी,  घरं बघून माणसं नको ना जवळ करायला!!

जाऊ दे, कोणाला किती का छोटं वाटेना. पण माझ्या आवडत्या माणसांनी भरलेलं हे माझं घर मला तरी खूप खूप आवडतं. ऋताच्या मनातला आनंद चेहऱ्यावर पसरला, तसं तिला ते गाणंही आठवलं, आणि वाटलं; किती खरे बोल आहेत त्यातले!! ज्याचं घर त्याच्या डोळ्यांनी बघावं कुणी, मग आकार न दिसता त्याच्यातलं प्रेमही दिसेल!! 

मनात आलं तसं, गुणगुणायलाही लागली ऋता.......

जो चाँदनी नहीं तो क्या, ये रोशनी है प्यार की
दिलों के फूल खिल गये, तो फ़िक़्र क्या बहार की
हमारे घर न आयेगी, कभी खुशी उधार की
हमारी राहतों का घर, हमारी चाहतों का घर
किसी को देखना हो गर
तो पहले आ के माँग ले, मेरी नज़र तेरी नज़र.........
ये तेरा घर ये मेरा घर, ये घर बहुत हसीन है
ये घर बहुत हसीन है ........

काय पटतंय का ऋताचं तुम्हाला?? कसं आहे तुमचं घर? छोटं की मोठं अजिबात नाही विचारत हा मी........


©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel