असावं काही तिचंही तिच्यासाठी........!!

लहानपणापासून मृदगंधाला नाचायची खूप आवड होती. अगदी वर्षादिडवर्षाची असल्यापासून गाणं लागलं की ठेका धरायची ती. जशी मोठी होत होती तसं नाचाचं वेड आणखी वाढत होतं. घरी पाहुणे आले की हिच्या नाचाचा कार्यक्रम ठरलेला असायचाच. शाळेतल्या गदरिंगमध्येही मृदगंधाचा खास कार्यक्रम असायचा. नाचाच्या कुठल्याही स्पर्धेत तिला बक्षीस मिळायचंच मिळायचं.
तिचं ते वेड बघून सर्वाना वाटायचं, ही मोठी नृत्यांगनाच होणार!!
तिच्या घरचे कधी तिला प्रोत्साहन दयायचे, तर कधी सारखी काय ग नाचत असते, करत वैतागून ओरडायचे.

थोडी मोठी झाल्यावर तिच्या मनात आलं, आपण क्लासिकलही शिकूया. म्हणून घरच्यांच्या मागे लागून तिने शास्त्रीय नृत्याचा क्लासही लावला. तेही आवडीने शिकली मृदगंधा.......

पुढे पुढे मात्र कॉलेज मध्ये गेल्यावर इतर ऍक्टीव्हीटीज, अभ्यास यात तिचा नाच थोडा मागे पडू लागला. पण सुटला मात्र नव्हता. कारण तो तिच्या अंगात, तिच्या प्रत्येक श्वासात होता.
ती घरातल्या घरात इकडे तिकडे करतानाही नाचत असायची. तो सतत तिच्याबरोबरच होता.

पुढे कॉलेजही झालं, मृदगंधाला तिच्या आवडत्या क्षेत्रात नोकरीही लागली. तिचं सगळं तिच्या मनाप्रमाणे चालू होतं.
असंच एके दिवशी तिचे नातेवाईक घरी आले असता, नाचाच्या कॉम्पिटिशनचा कार्यक्रम टिव्हीवर सुरू होता. तो बघून ते तिला म्हणाले, आम्हाला वाटलेलं तू सुद्धा अशी टिव्हीवर झळकशील, बघावं तेव्हा नाचत असायचीस. एवढी नाचकाम शिकलीस, काय उपयोग झाला त्याचा? 

मृदगंधा म्हणाली, माझं नाचणं माझ्या आनंदासाठी होतं. कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये चढाओढ करण्यासाठी नाही.
मला नाही आवडत असल्या जीवघेण्या कॉम्पिटिशनमध्ये उतरायला. मला नकोय माझ्या हौसेची प्रसिद्धी!!
पण तिचं हे बोलणं त्या नातेवाईकांना पटलं नाहीच पण तिच्या घरच्यांनाही पटत नव्हतं.
सर्वाना वाटायचं, एवढी छान नाचायची, एवढ्या क्लासला जायची म्हणजे तिने काहीतरी मोठं नावं कमवायला हवं होतं.  टिव्हीच्या चॅनलवर चालणाऱ्या स्पर्धा तरी जिंकायला हव्या होत्या. थोडक्यात स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी नाचायला हवं होतं.  त्यावर पैसे कमवायला हवेच होते.
मात्र मृदगंधाला वाटायचं, का असं? एखादा छंद आपल्या स्वानंदासाठी असू नये का? सगळ्याचाच बाजार मांडलाच पाहिजे का? सगळ्या छंदांच रूपांतर पैसे कमावण्यातच झालं पाहिजे, हा अट्टाहास का?
स्वतःचं स्वतःसाठी असं काही राहू दिलं तर काय होतं??
नाच सुटलाय कुठे माझा? जिथे मला वाटतं, जेव्हा मला वाटतं, तिथे माझ्या आनंदासाठी मला हवं तसं नाचतेच की मी!! एखाद्या साच्यात अडकवून घेऊन मी माझा आनंद का जपू? 
मी माझ्या मनात उमटणाऱ्या प्रत्येक तरंगांना पैशाचं मोजमाप का लावू??

जे छंद पैसे मिळवून देतील, नाव कमवून देतील, अशांनाच का जपू?? ते लागतात, तेव्हा काय आपल्या मनात असा विचार तरी आला असतो का??
ज्यांना आतून वाटतं, त्यांनी जरूर आपल्या आवडीचं रूपांतर हवं तसं करावं. पण कुणाची जबरदस्ती नसावी ना त्यावर......
खूप वाईट वाटायचं मृदंगधाला, कोणी तिला असं डिवचलं तर.....पण तिचं म्हणणं समजून घेणारं कोणीच नव्हतं.

पुढे दोन वर्षातच तिचं लग्नही झालं. तिच्या नवऱ्याला मात्र तिने काही न सांगताच तिची नृत्याप्रती आवड आपोआपच कळली. एक दिवस तो म्हणाला, मृदगंधा तुला नाचायला खूप आवडतं ना ग? 
ती म्हणाली, हो. पण मी तुला हे सांगितलं तर नव्हतं!! 
त्यावर तो म्हणाला, अगं तू सांगितलं नाही तरी कळलं मला.
तुझ्या अंगात एक लहर असते सतत. बरेचदा चेहऱ्यावर विलोभनीय हावभाव असतात, आणि कितीतरी वेळा तुझ्या एकांतात मी तुला स्वतःच्याच तालात थिरकताना बघितलंय. अहाहा, स्वतःमधेच रमलेलं इतकं सुंदर रूप असतं ना ते तुझं !! मला तुला बघतच राहावंसं वाटतं.

हो मला खूप आवडतं नाचायला, पण फक्त माझ्यासाठीच!! माझ्या स्वानंदासाठी!! माझं नाचणं स्ट्रेस रिलिव्हर आहे माझं!! माझं नाचणं सुख आहे माझं.......

वा!! छानच की. असावं असं काहीतरी आपल्या स्वतःसाठी खास असं....... मृदगंधा उत्साहाने म्हणाली, खरंच तुलाही असं वाटतं?
तिचा नवरा म्हणाला, वाटतं म्हणजे वाटतच. मला ही गायला खूप आवडतं बरं का!! पण फक्त स्वानंदासाठी. मी शिकलोयही अगदी शास्त्रोत्र सगळं. करियर करायचं म्हणून वगैरे नाही निव्वळ आवड, हौस म्हणून.........
कुणी गायला सांगितलं, आणि मला वाटलं तर गातोही, नाहीतर माझं सूर लावणं हे माझ्या अन् माझ्याच आनंदासाठी आहे फक्त!!
हे ऐकूनच मृदगंधा हरखून गेली. फायनली आपलं मन समजणारं कोणी मिळालं आपल्याला, असं वाटलं तिला.

स्वान्तःसुखायही काही असतं, हे समजणारी माणसं आहेत, हेच बघून मन अगदी भरून आलं तिचं.......

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel