आनंददायी
कौटुंबिक
मराठी कथा
सणवार
सामाजिक
जा आता तिकडे, उगीच इथे स्वैपाकघरात लुडबुड नको करुस, आज्जी ओरडेल उगाच, असं म्हणत सुहासीने परीला जवळजवळ बाहेर ढकललच.
सुहासीला कळेना, एकदम असं आपल्या सासूला झालं काय? काल तर गौरीची तयारी करताना माझ्यावर खेकसल्या होत्या या. आतापर्यंत तर कधी नव्हत्या या अशा!! दर गौरी-गणपतीत काय कुठल्याही सणाला यांचा तमाशा ठरलेलाच असतो. यांच्या मनाप्रमाणे कितीही काही केलं तरी याचं तोंड वाकडच असतं नेहमी.
सुहासीच्या मनात बरंच काही चाललं होतं, तेवढ्यात तिला सासूबाईंनी बोलावलं.
सवाष्ण समाधानाने गेल्यावर मात्र सुहासीला राहवलं नाही, ती भरल्या घरात ढसाढसा रडायला लागली. तिला असं पाहून मुलगी देखील तिला बिलगून रडायला लागली. सगळेच आपआपली काम सोडून बाहेर आले.
तिला एवढं रडताना पाहून सासूबाईनी तिला जवळ घेतलं, आणि म्हणाल्या, का पचणार नाही? एवढी वर्ष तुला मागे ठेवून आम्ही खायचो. आम्हाला पचलं ना ते. दर गौरी जेवणाला आमच्याकडून राहिलेलं तू तोंडात घालायचीस, कधी तर एवढंस राहत असेल, त्यावरही समाधान मानायचीस. तुझे आवडते पदार्थ तुझ्यासमोर आम्ही संपवून टाकायचो, तरी कधी काही बोललेली आठवत नाही मला तू.
सुहासी या गौरींनी बदलवलं ग मला. काल आपण गौरीची तयारी करत होतो, तर तुझ्याकडून चुकून स्टँडला धक्का लागला, आणि मी तुझ्यावर खेकसले. तुला नको नको ते बोलले. तुझ्या माहेरचाही उद्धार केला. तुझे डबडबलेले डोळे दिसले मला, पण मी त्याकडे दुर्लक्ष करून गौरीच्या नाकात नथ अडकवायला गेले, तर मला त्या गौरीचे डोळेही तुझ्यासारखेच डबडबलेले दिसले त्याक्षणी एकदम. आणि घाबरून काळजात जोरात कळ गेली. भास होता की काय होतं कोणास ठाऊक, पण जाणवलं एवढं खरं!!
छोटया परीच्या काहीतरी मनात आलं तशी ती पटकन उठली, गौरींजवळ गेली, त्यांना निरखून बघितलं, आणि आनंदाने टाळया वाजवत म्हणाली; आज्जी, तुझ्या दोन्ही गौरी तर आज हसतयात की ग गोड गोड!!
छान वाटलं ना आज्जी आता तुला, परी नाचत म्हणाली. तसं तिच्या आज्जीने तिला जवळ घेतलं आणि तिचा पापा घेत म्हणाली, तू आणि तुझी आई, माझ्या खऱ्या गौरी, तुमच्याशी चांगलं जमवून घेतलं की या दोन गौरीच काय आपलं घरही नेहमीच हसायला लागेल, हे कळलंय हो मला आता!!
हे नुसतं ऐकूनच घरातल्या सगळ्या गौराया अगदी प्रसन्नतेने हसल्या .......
अन् गौर प्रसन्नतेने हसली........
बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०
अगं थांब त्याला कुठे हात लावतेस, गौरींना नैवेद्य दाखवायचाय अजून. त्याशिवाय कुणी काही तोंडात टाकायचं नाही, आज्जी ओरडेल नाहीतर, सुहासी आपल्या सहा वर्षांच्या परीला म्हणाली.
कधी होणार तुमचं, केव्हाची वाट पाहतेय मी, मला भूक लागली, परी एवढंस तोंड करून म्हणाली.
रोज जेवतेस ना वेळेवर, एक दिवस वाट पहायची जरा. गौरींना नैवेद्य दाखवून सवाष्ण बाईचं पान वाढलं की तुला बसवेन तिच्याबरोबर.
एवढाss वेळ, मला खरंच भूक लागली. ती भजी दिसतायत, पुरणपोळी दिसतेय समोर, मला खावंसं वाटतय आणखीनच......परी काकुळतीने म्हणाली.
जा आता तिकडे, उगीच इथे स्वैपाकघरात लुडबुड नको करुस, आज्जी ओरडेल उगाच, असं म्हणत सुहासीने परीला जवळजवळ बाहेर ढकललच.
ती किरकिरतच आतल्या खोलीत जाऊन बसली.
तिला बघून जरा टेकायला म्हणून तिथे बसलेली तिची आज्जी उठली. स्वयंपाकघरात गेली आणि परीचं ताट वाढून गौरीला नमस्कार करून तिला जेवायला सांगितलं.
सुहासीला कळलंच नाही काय झालं ते, ती सासूबाईंना म्हणाली, काय झालं चुकलं का काही माझं? सवाष्ण नाही आली अजून, गौरीला नैवेद्य नाही दाखवला, तुम्ही तिला का वाढलत? तुमचं तर नेहमी सगळं कडक असतं. ती आली होती माझ्याकडे भूक लागली म्हणून, मी तिला समजावून पाठवलं होतं. थांबली असती ती.
हो थांबली असती ती, पण मलाच तिचा चेहरा बघून राहवलं नाही. सवाष्ण कधी येणार काय माहीत? तिने सांगितलेली वेळ जाऊन अर्धा तास झाला. नैवेद्याच सगळं ठेवलंय मी बाजूला. खाऊ दे परीला. घरची चालती बोलती गौर आहे ती!!
सुहासीला कळेना, एकदम असं आपल्या सासूला झालं काय? काल तर गौरीची तयारी करताना माझ्यावर खेकसल्या होत्या या. आतापर्यंत तर कधी नव्हत्या या अशा!! दर गौरी-गणपतीत काय कुठल्याही सणाला यांचा तमाशा ठरलेलाच असतो. यांच्या मनाप्रमाणे कितीही काही केलं तरी याचं तोंड वाकडच असतं नेहमी.
सगळं नुसतं दडपणाखाली, सणाचा आनंद तो काय घेता येतच नाही कधी!!
आता काय नवीन मनात आलंय कोणास ठाऊक? पोरीला घालतायत खायला, मला जेवताना रडवणार वाटतं........
सुहासीच्या मनात बरंच काही चाललं होतं, तेवढ्यात तिला सासूबाईंनी बोलावलं.
ती गेली तशा त्या म्हणाल्या, आल्या बघ सवाष्ण बाई. गौरीच्या नैवेद्याचं ताट घेऊन ये आणि नैवेद्य दाखवून या सवाष्ण बाईंबरोबर तूही बस. मी वाढते तुम्हाला दोघींना.
सासूबाई हे बोलल्या, तसे भीतीने तिचे
हृदयाचे ठोके जास्तच वाढले, भरभर ही पळत होते आणि तिला अगदी सहज ऐकूही येत होते!!
ती पटकन म्हणली, काहीतरी काय, मी कशाला बसू. तुम्ही बसा हवतर. सगळेच बसा एकदम, बाबांना आणि ह्यांना पण वाढते मी.
नाही, आज तूच बस जेवायला यांच्याबरोबर. बाकीचे थांबतील थोड्या वेळ.
सुहासी तर ऐकूनच बिथरली. तिला काही केल्या समजेना, आपल्या सासूला नेमकं झालंय तरी काय? ती पुन्हा त्यांना म्हणालीच, अहो आई, माझ्या घशाखाली घास उतरणार नाही हो. तुम्ही सगळे जेवल्याशिवाय. इतक्या वर्षांची सवय मला शेवटी जेवायची. तुम्हीच बसा मी वाढते.
आता सणाच्या दिवशी वाद वाढवत बसणार आहेस का माझ्याशी, सासूबाईंनी डोळे वटारले तशी, सवाष्ण बाईसमोर आणखी तमाशा नको म्हणून ती मुकाट्याने जेवायला बसली. सासूबाईंनी तिला अगदी आग्रह करून वाढलं, पोटभर जेवायला लावलं. सुहासीला पहिले जमेचना, असं कधी घडलंच नव्हतं ना यापूर्वी. पण ते कुणी दुसऱ्याने वाढलेले गरम गरम पदार्थ एकेक करून पोटात जायला लागल्यावर तिचं मनच पोटापेक्षा जास्त तृप्त झालं.
सवाष्ण समाधानाने गेल्यावर मात्र सुहासीला राहवलं नाही, ती भरल्या घरात ढसाढसा रडायला लागली. तिला असं पाहून मुलगी देखील तिला बिलगून रडायला लागली. सगळेच आपआपली काम सोडून बाहेर आले.
सुहासी रडतरडतच सासूबाईंना म्हणाली, काय चुकलं असेल तर सांगा, पण असं नका वागू हो. मोठं पाप केल्यासारखं वाटतय मला, तुमच्या सर्वांच्या अगोदर जेवले मी आज. मला हे पचणारच नाही.
दुसरी काही शिक्षा द्या पण हे असं नका वागू हो आई!!
तिला एवढं रडताना पाहून सासूबाईनी तिला जवळ घेतलं, आणि म्हणाल्या, का पचणार नाही? एवढी वर्ष तुला मागे ठेवून आम्ही खायचो. आम्हाला पचलं ना ते. दर गौरी जेवणाला आमच्याकडून राहिलेलं तू तोंडात घालायचीस, कधी तर एवढंस राहत असेल, त्यावरही समाधान मानायचीस. तुझे आवडते पदार्थ तुझ्यासमोर आम्ही संपवून टाकायचो, तरी कधी काही बोललेली आठवत नाही मला तू.
मग आज पहिल्यांदा गौरी जेवणाला घरची गौर तृप्त झाली तर तिला का नाही पचणार?
पण आई, हे काय असं अचानक सगळं इतकं बदललं?, सुहासी मनातलं बोललीच एकदाची.
सुहासी या गौरींनी बदलवलं ग मला. काल आपण गौरीची तयारी करत होतो, तर तुझ्याकडून चुकून स्टँडला धक्का लागला, आणि मी तुझ्यावर खेकसले. तुला नको नको ते बोलले. तुझ्या माहेरचाही उद्धार केला. तुझे डबडबलेले डोळे दिसले मला, पण मी त्याकडे दुर्लक्ष करून गौरीच्या नाकात नथ अडकवायला गेले, तर मला त्या गौरीचे डोळेही तुझ्यासारखेच डबडबलेले दिसले त्याक्षणी एकदम. आणि घाबरून काळजात जोरात कळ गेली. भास होता की काय होतं कोणास ठाऊक, पण जाणवलं एवढं खरं!!
जणू गौर मला सांगत होती, घरच्या गौरीला दुखवलस, रडवलस आणि माझं काय कौतुक करत बसलीयेस?? तिच्याकडं बघ पहिले. माझं खरं अस्तित्व लेकिसुनांत आहे. त्यांच्या त्रासाने मी पण दुःखी होणार..........
कितीही मोठी पैठणी नेसवा, सोन्या- रूप्याने मढवा, कितीही सजवा धजवा, पन्नास प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा मी हसणार नाहीच!!
आणि खरंच ग माझी गौर हसताना मला दिसली नाहीच कधी. अगोदरही नाही आणि आताही नाही.
छोटया परीच्या काहीतरी मनात आलं तशी ती पटकन उठली, गौरींजवळ गेली, त्यांना निरखून बघितलं, आणि आनंदाने टाळया वाजवत म्हणाली; आज्जी, तुझ्या दोन्ही गौरी तर आज हसतयात की ग गोड गोड!!
परीच्या आज्जीने झटकन गौरींकडे पाहिलं, आणि म्हणाली, खरंच की!! माझी गौर हसतेय आता.....
छान वाटलं ना आज्जी आता तुला, परी नाचत म्हणाली. तसं तिच्या आज्जीने तिला जवळ घेतलं आणि तिचा पापा घेत म्हणाली, तू आणि तुझी आई, माझ्या खऱ्या गौरी, तुमच्याशी चांगलं जमवून घेतलं की या दोन गौरीच काय आपलं घरही नेहमीच हसायला लागेल, हे कळलंय हो मला आता!!
सुहासी, संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तेव्हा तुझ्या मनासारखं कर सगळं. पाहिजे तश्या नटा तुम्ही दोघी घरच्या गौरी, मी नाही काही खुसपट काढणार नेहमीसारखी. पण तुम्हाला नजर लागू नये म्हणून दृष्ट मात्र आठवणीने काढेन हा यावेळी!!
हे नुसतं ऐकूनच घरातल्या सगळ्या गौराया अगदी प्रसन्नतेने हसल्या .......
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article