कौटुंबिक
मराठी कथा
सणवार
हो ना ग, या गौरींनाही जाऊ दयावं वाटत नाही आणि तुलाही सोडावं वाटत नाही. काय करू जीव गुंतुन जातो ग तुमचं करण्यात. कितीही केलं तरी दमायला होतच नाही. तुम्ही येता तेच उत्साह घेऊन. एरवी आम्ही तिघच. तुझ्या भावाचा काय पाय असतो घरात? तू होती तेव्हा नुसता चिवचिवाट असायचा. आता सून आली की मग घर भरेल पुन्हा. त्याचं जुळेपर्यंत एकटेपणा आहेच नेहमीचा.
हो ना, इतकं काय काय करतेस आणि इतका आग्रह करतेस की मला ओरडावं लागतं, आता पोट फुटेल माझं आई.
मग काय ग, तू वर्षातून दोन-तीनदा येणार, त्या गौरीतर फक्त एकदाच, मला तर आवडणारं सारं पुढे करावं वाटतं तुमच्या. आणि माझ्या हाताने खाऊही घालावं वाटतं. त्याशिवाय मनाला चैन नाही पडत.
आई, पुन्हा डोळे ओले नको करू बाई!! आम्हा लेकींच्याही जीवावर येतं ग एवढा सुखसोहळा सोडून जाताना. तुम्ही असता म्हणून मिळतं एवढं भाग्य आम्हाला. इथं माहेरी आलं की वाटतं ते झोपळ्यावाचून झुलायचे दिवस आपल्या आईबाबांनी घट्ट पकडून ठेवलेत खास आपल्यासाठी. हवं ते करा, हवं तसं वागा, इथे कोणी तुम्हाला अडवणार नाही. इथे कोणीही तुमच्याकडून कसलीही अपेक्षा करणार नाही. इथे फक्त लाड होणार, तुम्ही कितीही मोठे झालात तरी, तुम्हाला पोरं झाली तरी, तुम्हाला लहान लेकरू फक्त इथेच समजलं जाणार.
आई, त्या तू वेगवेगळया गोष्टींनी भरून दिलेल्या पिशव्या उघडताना जीवाची नुसती कालवाकालव होते. असं वाटतं, अगदी आत्ता या क्षणी घट्ट मिठी मारावी तुला. मी न मागितलेलही आठवणीने तू त्या पिशव्यांत घातलेलं असतं. पुढची फेरी येईपर्यंत पुरणारं असतं अगदी सगळं. त्याला हात लावूनच सुखदुःखाचे दिवस काढते मी तिथले. पावलोपावली तिथे तुमचं प्रेम आठवतं मला........
म्हणून तर म्हणते ना मनुडी, गौरी आणि लेकी सारख्याच!! कितीही राहा म्हटलं, कितीही थाट केला, तरी जायच्या दिवशी सगळं मागे सोडून जाणारच. अन् आमच्यासाठी ठेऊन जाणार, खूप साऱ्या गोड आठवणी, त्याच आठवणींना मनात ताजं टवटवीत ठेऊन बसायचं आम्ही, तुमच्या माहेराला परत येण्याच्या वाटेकडे डोळे लावून.........!!
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
पाठवणी.........!!
गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०
मने, आज गौरी जाणार, आणि तू पण कशाला आजच निघतेस ग? आणखी दोन दिवस राहा की. सूनं सूनं वाटेल घर अगदी.
आई, त्या गौरीसारखी मीही माहेरवाशीणच की!! आज ना उद्या मला परतावं लागणारच. आणि अजून दोन दिवस जरी राहिले तरी तुझं मन भरणार आहे का सांग? दोन दिवस काय, दहा दिवस राहिले तरी निघताना हेच म्हणशील, राहा की ग आणखी दोन दिवस............
हो ना ग, या गौरींनाही जाऊ दयावं वाटत नाही आणि तुलाही सोडावं वाटत नाही. काय करू जीव गुंतुन जातो ग तुमचं करण्यात. कितीही केलं तरी दमायला होतच नाही. तुम्ही येता तेच उत्साह घेऊन. एरवी आम्ही तिघच. तुझ्या भावाचा काय पाय असतो घरात? तू होती तेव्हा नुसता चिवचिवाट असायचा. आता सून आली की मग घर भरेल पुन्हा. त्याचं जुळेपर्यंत एकटेपणा आहेच नेहमीचा.
तू आलीस, राहिलीस की चैतन्य आल्यासारखं वाटतं पूर्ण घराला. तुझे बाबा बघितलेस ना, मी काही सांगितलं की हलणार नाहीत अजिबात, पण पोरीसाठी दहा वेळा खालीवर करतील.
तुला सांगू मनुली, मला ना गौरीचं अन् तुझं येणं- जाणं सारखंच वाटतं बघ.
दोघींच्याही आगमनाची अगदी तशीच आतुरता, हुरहूर असते. येई येईपर्यंत मन थाऱ्यावर नसतं. घरी आलेल्या दिवशी तुम्हाला कुठे ठेऊ अन् कुठे नको असं होतं. किती कौतुक करू अन् किती नको असं वाटतं. दुसऱ्या दिवशी काय खायला घालू अन् काय नको असं होतं. तुमच्यासाठी कितीही पदार्थ बनवले तरी हात थकत नाही. तुमच्यापुढे तुमच्या आवडत्या पदार्थानी भरलेलं ताट ठेवलं की मगच मन भरतं आमचं!!
हो ना, इतकं काय काय करतेस आणि इतका आग्रह करतेस की मला ओरडावं लागतं, आता पोट फुटेल माझं आई.
आणि त्यातून कितीही खाल्लं तरी मी अंगाला लागेल एवढं जेवलीये असं तुला कधीही वाटतच नाही.
मग काय ग, तू वर्षातून दोन-तीनदा येणार, त्या गौरीतर फक्त एकदाच, मला तर आवडणारं सारं पुढे करावं वाटतं तुमच्या. आणि माझ्या हाताने खाऊही घालावं वाटतं. त्याशिवाय मनाला चैन नाही पडत.
अन् तुम्ही लेकी लाघवीही किती!! आलात की लाडाने किती काय काय करून घ्याल आणि काय नाही!! पण त्यातही आनंद, समाधान मिळत आम्हाला. तुमच्या हसण्याने मन फुलतं आमचं. नुसतं न्याहाळत राहावं वाटतं, कितीही बघितलं तरी आणखी बघावंस वाटतं. खरंच किती तो सारखेपणा गौरीत आणि लेकीत!!
आणि तो आनंद घेता घेताच परतायचा दिवस येऊन ठेपतो. असं वाटतं, अरे अगदी एवढ्यात सरले दिवस?
मग ते दोन असो की चार, की असेनात का पंधरा, कितीही असले तरी चुटकीसरशी उडून गेल्यासारखे वाटतात.
ही परत पाठवणी नको वाटते ग....... धरून घट्ट धरून ठेवावं वाटतं, तुमच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला!!
आई, पुन्हा डोळे ओले नको करू बाई!! आम्हा लेकींच्याही जीवावर येतं ग एवढा सुखसोहळा सोडून जाताना. तुम्ही असता म्हणून मिळतं एवढं भाग्य आम्हाला. इथं माहेरी आलं की वाटतं ते झोपळ्यावाचून झुलायचे दिवस आपल्या आईबाबांनी घट्ट पकडून ठेवलेत खास आपल्यासाठी. हवं ते करा, हवं तसं वागा, इथे कोणी तुम्हाला अडवणार नाही. इथे कोणीही तुमच्याकडून कसलीही अपेक्षा करणार नाही. इथे फक्त लाड होणार, तुम्ही कितीही मोठे झालात तरी, तुम्हाला पोरं झाली तरी, तुम्हाला लहान लेकरू फक्त इथेच समजलं जाणार.
पाऊलं जड होतात ग आमचीही आई, इथून निघताना.
सूनं सूनं आम्हालाही वाटतं, घरी गेल्यावर. सारखं आमच्या मागं पुढं करणारं तिकडे कोण असतं? प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते. ते तुमचं भरपूर लाड करणं, सारखं डोळ्यासमोर येतं, डोळ्यात नकळत पाणी आणतं.
मन पुन्हा तुमच्याकडे ओढलं जातं......
आई, त्या तू वेगवेगळया गोष्टींनी भरून दिलेल्या पिशव्या उघडताना जीवाची नुसती कालवाकालव होते. असं वाटतं, अगदी आत्ता या क्षणी घट्ट मिठी मारावी तुला. मी न मागितलेलही आठवणीने तू त्या पिशव्यांत घातलेलं असतं. पुढची फेरी येईपर्यंत पुरणारं असतं अगदी सगळं. त्याला हात लावूनच सुखदुःखाचे दिवस काढते मी तिथले. पावलोपावली तिथे तुमचं प्रेम आठवतं मला........
हं, बोलण्यात गुंगवून ठेवलंस ना मला नेहमीसारखं. वेळ किती झाला बघ आई. निघायला हवं मला आता.
अगं, तुम्ही कितीही छान, सुंदर जामानिमा केलात तरी परतीच्या दिवशी मोह सोडून जावं लागणारच आम्हाला. चल, त्या गौरींनाही हलवून डोक्यावरून अक्षता टाक, त्यांचीही पाठवणी कर. चार वाजले आई, निघू दे आम्हाला.
म्हणून तर म्हणते ना मनुडी, गौरी आणि लेकी सारख्याच!! कितीही राहा म्हटलं, कितीही थाट केला, तरी जायच्या दिवशी सगळं मागे सोडून जाणारच. अन् आमच्यासाठी ठेऊन जाणार, खूप साऱ्या गोड आठवणी, त्याच आठवणींना मनात ताजं टवटवीत ठेऊन बसायचं आम्ही, तुमच्या माहेराला परत येण्याच्या वाटेकडे डोळे लावून.........!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article