मराठी कथा
सामाजिक
दणका........!!
शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०
हॅलो, क्या मेरी बात 'कावेरी पाटक' जी से हो रही है?
हा बोला.......
जी आप 'कावेरी पाटक' है?
पाटक नाही पाsठsक. नाव बरोबर घ्या पहिले.
ओके. आप ही है ना कावेरी पाsठsक जी?
हो बोला. मीच आहे ती.
जी मै हायकोर्टसे बात कर रहा हूँ। आपने जो लोन लिया था ना उसका हफ्ता बाकी है, तो हायकोर्ट मे हमारे पास आपका केस आया है। आपको आधे घंटेमे आपकी बॅलन्स EMI पेड करनी पडेगी.......
हो काss? भाऊ तुम्हाला माहिती आहे का हो, हा हप्ता कधीचा पेंडिंग आहे तो?
हा मॅडमजी, बता देता हूँ, ये आपकी सितम्बर की EMI बाकी है।
भाऊ महिना कुठला चालू आहे हो?
हा मगर आपको दो तारीख तक भरना था, आपने अभी तलक नही भरा.......
आता कावेरीची सटकली. तोंडात हजार शिव्या येत होत्या तिच्या. त्यातल्या त्यात सबुरीने पण जरा आवाज चढवूनच ती म्हणाली, वेडं लागली आहेत का तुम्हा लोकांना? दोन तारखेला भरायचा हप्ता पंधरा तारखेला नाही भरला म्हणून केस टाकणार का तुम्ही?
मॅडमजी सुनिये बात मेरी, केस पिछे हट सकता है, आपको आधे घंटे मे कुछ भी करके आपका EMI भरना पडेगा। तुरंत भरदो, नही तो केस चढ जायेगा मॅडमजी!!
कुठल्या जमान्यात आहात रे तुम्ही लोकं? केस चढेल असं, अशा अविर्भावात बोलताय जसे सहा महिन्यांपासून हप्ते बाकी आहेत आमचे!! या महिन्याचाच बाकी आहे ना? भरू आम्ही जमेल तसं. इतके महिने इमानदारीत भरले ते बघा पहिले. काय परिस्थिती आहे माहीत नाही का तुम्हाला?
ऐसा नाही मॅडमजी. फिर बहुत टेन्शन हो जायेगा?
कोणाला टेन्शन होईल?
आपको और किसको? केस चढ जायेगा तो आपको कोर्ट आना पडेगा।
कावेरी मोठ्याने हसून म्हणाली, ठिक आहे. एका महिन्याच्या राहिलेल्या हप्त्यासाठी कोर्टात खेचणार का तुम्ही? खुशाल खेचा. तुम्हाला काय यडी वाटतात का सगळीच लोकं, तुम्ही कोर्टाची भीती दाखवली की घाबरून पैसे भरायला?
आणि असले तर भरणार ना?
चला, ठेवा मुकाट्याने फोन. करा काय करायचं ते. मी सुद्धा रेकॉर्ड केलय तुमचं बोलणं, मी मानसिक छळाची तक्रार केली तर तुमचं काय होईल ते बघा आता. आणि मला उगाच धमकी द्यायची सवय नाही तुमच्यासारखी.
पर मॅडमजी सुनिये तो........
काही नाही ऐकणार मी, करत कावेरीने तो फोन बंदच करून टाकला.
पुन्हा त्याचा फोन आला दोन वेळा, कावेरीने तो उचलला नाहीच अजिबात.
कावेरीने तिच्या घराच्या नूतनीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. दोन्ही वर्ष तिने ते अगदी नीट फेडलं होतं. शेवटचं वर्ष उरलं होतं फक्त. पण आता मात्र तिला ते नीट जमत नव्हतं. कर्ज घेताना तिचा नवरा नको म्हणत होता, त्याचं म्हणणं होतं, अजून एक दोन वर्षानी करू ठिक सगळं. पण कावेरीला ते गरजेचं वाटत होतं. म्हणून ती त्यावेळी मी कर्ज काढते असं म्हणाली. नोकरी आहेच मला, हप्ते कधी संपतील कळणारही नाही. आणि खरंच तिनेही दोन वर्षे अगदी नीट सर्व पार पाडलं.
पण या वर्षी मार्चपासून बऱ्याचजणांप्रमाणे तिचीही नोकरी सुटली. आणि हप्ते भरणं अवघड होऊ लागलं. तरी तिच्या नवऱ्याने स्वतःहून पुढे येऊन हप्ते भरलेही. थोडं मागं- पुढं होत होतं एवढंच. त्याच्यावर भार पडला होता सगळाच. कामाला जात होता तो, पण पगार वेळेवर मिळत नव्हता त्याचा.
तरीही त्यांचा हेतू चांगला होता, म्हणून अडचण असूनही त्यांनी हप्ते थांबवले नव्हते.
म्हणूनच त्या फायनान्स कंपनीच्या वसुली खात्यातून असा फोन आला त्याचं आश्चर्य तर वाटलंच तिला, पण भयंकर रागही आला.
तिला वाटलं, अरे प्रामाणिक माणसांनाही हे सोडत नाहीत? डिटेल्स दिसतात ना सगळ्या समोर?
आणि असं टॉर्चर कसं करावं वाटतं माणसाला? नको त्या भित्या का दाखवाव्या वाटतात, अशा वेळीही?
माणुसकी दाखवा, असे दिवसातून पन्नास मेसेज आम्हाला येतात तसे यांना येत नसतील का?
कोणी खरंच भाबडं माणूस असेल तर जीवाचं काय होईल त्याच्या, एकदम कोर्टातूनच फोन आला म्हटल्यावर? आणि नोकरी धंदा नसेल तर काय करावं त्यांनीही? जरा विचार नाही येत लोकांना घाबरवताना, अशा अवघड परिस्थितीतही.
इतर वेळीही नकोच खरंतर, पण अशा वेळी तर नकोच नको. आधीच माणसं खचलीयेत, त्यात हे आणखी भर घालणार, त्यांची मनस्थिती बिघडवायला.
ह्यांना नकोच सहन करायला असा विचार करत ती उठली आणि त्या कंपनीच्या साईटवर जाऊन कस्टमर सपोर्ट मध्ये दिलेल्या मेल एड्रेसवर तिने खरमरीत मेल टाकला. ज्याने फोन केला होता त्या माणसाच्या नंबरसहीत. रेकॉर्ड केलेलं संभाषण पण त्याला जोडलं. आणि आता तुमच्याकडून ऍक्शन नाही घेतली गेली तर आम्ही नक्कीच यावर कारवाई करू असं खडसावलं.
नवरा कामावरून आला तसं, तिने त्यालाही सांगितलं. तो तर हसायलाच लागला तिने मेल केला म्हटल्यावर. पण तिला माहीत होतं, नुसतं हातावर हात मारून बसण्यापेक्षा हे नक्कीच बरं........
मात्र अगदी अनपेक्षितपणे दुसऱ्या दिवशी तिला तिच्या मेलचं उत्तर आलेलं दिसलं. त्यात त्यांनी माफी मगितली होती. आणि आम्ही आमच्या वसुलीखात्याला कस्टमरशी नीट बोलायचं, असं बजावलय हे ही सांगितलं. पुन्हा असं होणार नाही हे देखील त्यात नमूद होतं. त्रासाची भरपाई म्हणून त्यांनी तिला सहा महिने उशिरा हप्ते भरल्याबद्दल चार्जेस लावले होते ते सगळे माफ़ करून टाकले आहेत, असंही स्पष्ट लिहून पाठवलं होतं. कावेरीला तर ही अपेक्षाच नव्हती. साधारण चार साडेचार हजार माफ झाले होते तिचे. तिने पटकन नवऱ्याला तो मेल फॉरवर्ड करून फोन केला, त्याला सर्व सांगितलं आणि मीच तुझ्यापेक्षा जास्त हुशार असं म्हणत त्याच्या त्यावेळच्या हसण्याचं उलट त्याच्यावरच जोरजोरात हसून प्रतिउत्तर दिलं.
हे लिहिलंय ते अगदी खरं घडलेलं आहे. माझ्या मैत्रिणीने सांगितलेला अनुभव आहे हा. तक्रार करून काही होणार नाही, ती लोकं पक्की असतात, आपला कसला निभाव लागतोय, असा विचार करून सोडून देतो आपण. पण आपल्याला कसलाही त्रास झाला आणि आपण बरोबर असू, तर तक्रार ही करायलाच हवी. मग ते कोणी का असेना!!
सामान्य माणसाचा दणका दाखवायला हवा म्हणजे हवाच.........
काय वाटतं तुम्हाला??
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article