बायकोची स्ट्रॅटेजी........!!

उर्मिला, का अशी बोललीस तू तुझ्या मैत्रिणीला? माझं नाव का घातलस मध्ये? काय तर म्हणे यांना नाही खपणार!!
जिथे तिथे मला का मध्ये आणते तू, तुझ्या नावावर खपव की काय खपवायचय ते, मी का बळीचा बकरा?

तोंडावर असं बेधडक नाही म्हणायला बरं वाटतं का उन्मेष? ती माझी स्कुटर मागत होती तिला कुठे जायचं होतं म्हणून.......

द्यायची की मग? आणि स्कुटर तुझी; ती तिला द्यायला, न खपणारा मी कुठून आलो मध्ये?

हो पण तुझ्या आडून मीच माझ्या मनातलं बोलून घेतलं रे. ती नवशिकी, कुठे पाडली बिडली माझी स्कुटर तर भुर्दंड तुलाच होईल ना रे? तो नको व्हायला म्हणूनच बोलले मी तसं.........

चालला असता तो मला. उगीच तिच्यापुढे मला खराब केलं. काय वाटेल आता तिला माझ्याबद्दल उर्मिला?

ओहहs ते टोचतय का जास्त? तिला काय वाटेल ते सोड; पूढे आणखी काही बोललास तिच्याबद्दल, तर मला जे काही वाटेल ना ते तुला फाssर महागात पडेल.

बरं ती राहिली. त्या दिवशी त्या कामवाल्या मावशींना म्हणालीस, आमच्या ह्यांना सगळी भांडी स्वच्छ लागतात. घर टापटीप लागतं. अगदी नीट काम कर हं........
मी कधी तोंड घातलं ग तुझ्या भांड्यात, कधी बोललो तुला त्यावरून? कधी घरातल्या पसाऱ्याकडं लक्ष दिलं?

तसं बोलावं लागतं उन्मेष. आमची ना, नंतर मैत्री होते. कुणाचा तरी धाक नको का त्यांच्यावर?

म्हणून माझ्यासारख्या स्वभावाने गरीब माणसाचा?

तू साधासुधा आहेस ते माझ्यासाठी, त्यांना कुठं काय माहिती आहे? मी आहे ना मध्ये मध्ये तुझ्या नावाने ठसन द्यायला.....

पण म्हणून काय प्रत्येकापुढे तू मला खडूस ठरवणार का उर्मिला?
सकाळी तो सामान देणारा माणूस आला, त्याने जोरात बेल वाजवली तर त्याला काय म्हणालीस, अरे साब चिल्लायेगा, इतना क्यों आवाज करता है?
तू स्वतः घरात दणादणा भांडी आपटत असतेस, मोठमोठ्याने बोलत असतेस, तुझाच आवाज सतत घुमत असतो घरात, कितीही वाटलं तरी तुझं तोंड दाबू शकत नाही मी, तर त्या परक्याला कशाला  बोलायला जातोय एका मिनिटासाठी? 

मी कुठं म्हणते जा म्हणून, तुझं नाव पुढं करते फक्त.   तेवढं तर मी करू शकतेच ना रे. त्या माणसांना वाटतं बेल वाजली की आतल्याने लगेच उडत यावं. म्हणून एका वेळी दोनतीनदा लगादार वाजवत राहतात. असं डोकं फिरत ना.......
मी सांगितलेलं, अगोदरही नको वाजवू बाबा एवढं. पण मनावर नाही घेतलं त्यानं. दात विचकून हसून दाखवलेलं फक्त. साब चिल्लायेगा म्हटलं ना आता, पुढच्यावेळी बघ एकदाच वाजवतो की नाही!!

हे असं माझं नाव खराब करून ठेवलयस तू जिकडे तिकडे. सगळ्यांना मी एकदम कडक वाटतोय. सगळे चार हात लांब राह्यला लागलेत माझ्यापासनं.

चांगलं आहे की मग उन्मेष!! अशी तर मी सुद्धा घाबरत नाही तुला, बाहेरचं कोण घाबरणार होतं??

तो वरच्या राणेंचा बारावीतला पोरगा वरून खाली येत होता, तर मला समोर बघून केवढा दचकला, आणि त्याला काय झालं वाटून मी सुद्धा!!
सांग आता माझ्या नावाने काय करणी केलीस त्याच्यावर??

काही नाही रे. दुपारच्या वेळी असल्या मोठ्या मोठया आवाजात गाणी लावायचा ना तो, झोपेचे बारा वाजायचे अगदी. प्रेमाने सांगून कळलं नाही त्याला, मग म्हटलं, आमच्या ह्यांचं डोकं सटकलय तुझ्यावरून. तू दिस फक्त त्यांना, तुझे कान शाबूत ठेवतात का बघ गाणी ऐकायला!!

मी साधी माशी नाही मारली ग आत्तापर्यंत कधी, त्याला कसलं ठेवून देतोय! हातावर बसलेल्या डासांचा पण चापटी मारून जीव नाही घेतला मी कधी.........

त्याला कुठे माहिती आहे ते? त्या सोशल मीडियावर तरी कुठे आपण खरे असतो तसं दिसतो. आपण आभास जसा निर्माण करू तसेच वाटतो ना सगळ्यांना? हल्ली त्या आभासावरच जास्त विश्वास बसतो लोकांचा!!

उर्मिला, अगं तो वॉचमनही त्या दिवशी मला समजावत होता, इतना घुस्सा नही करनेका, शांती से लेने का सब कुछ........

मला तर वाटलं, ह्याचे आटे ढिल्ले नाहीत ना? मग लक्षात आलं, तुझी कृपादृष्टी ह्याच्यावरही पडलेली दिसतेय.

मग काय, आगाव आहे भारी तो. त्याची नजर मला बरी नाही वाटत. म्हणून मी मुद्दाम त्याच्यावर गुरगुरत असते, तुझ्या नावाने. 
तुला बघूनच धास्तावतात रे लोकं. तुझी पर्सनॅलिटी पण तशीच आहे ना. लोकांना लगेच खरं वाटतं. असा उंचापुरा धिप्पाड तू........

हो पण नुसता दिसायलाच ग बाई. स्वभाव पापभिरू आहे माझा. आणि तू मात्र सगळीकडे मी व्हिलन असल्यासारखा गाजावाजा करून ठेवलायस. कसल्या एकेक स्ट्रॅटेज्या वापरतेस ग तू?

तुला सांगू उन्मेष, ते तसं केलंय ना म्हणून तुझ्या वाटेला कोणी जात नाही. ही दुनिया तुझ्यासारख्या माणसाला कधी खिशात टाकेल कळणारही नाही. साधं राहून काही उपयोग नाही रे. पक्कं रहायला पाहिजे इथे. मी आहे म्हणून तुझ्या साध्या  स्वभावाचा फायदा नाही घेत, दुसरी कोणी असती ना तर तुला केव्हाच गिळून बसली असती. 

मारला, समस्त स्त्रीवर्गाने पेटंट घेऊन ठेवलेला डायलॉग मारलासच एकदाचा. तसा आज जरा उशिरानेच आला बरं का?
पण उर्मिला, तू जसं सादर करतेस मला लोकांसमोर, तसा मी खरंच असतो तर, तुझं काय झालं असतं कल्पना करून बघ जरा!!

काही झालं नसतं उन्मेष, कुठल्याही नवऱ्यांना वठणीवर आणण्याचं टेक्निक आम्हा बायकांच्या अंगात मूलभूतच असतं !!

म्हणजे काही झालं तरी तुम्ही बायका चलाखच, असंच म्हणायचंय ना तुला?

कोई शक?

तुझ्याबद्दल तर अजिबातच नाही ग उर्मिला🙏🙏🙏


©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज- हल्ला गुल्ला नक्की लाईक आणि फॉलो करा.


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel