इच्छाशक्ती........!!

ऐक ना अमेय, माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आहे रे एक.......

कसली इच्छा आहे तृप्ती, तू बोल फक्त. तुझ्या कुठल्या इच्छा पूर्ण नाही केल्या आजपर्यंत, सांग जरा?

अमेय असं म्हणाला, तसा तृप्तीला जरा कॉन्फिडन्स आला बोलायचा; ती म्हणाली, तुला खरं सांगू. मी अगदी केव्हापासूनच ठरवलेलं. एक मूल माझं स्वतःचं असणार आणि एक मी दत्तक घेणार. आपला ध्रुव पाच वर्षांचा झाला. आणि मलाही आता वाटायला लागलंय, आणखी एक बाळ असावं. एक छोटीशी छकुली यावी घरात!!

अगं मग दत्तक कशाला, आपलंच येईल की. ज्यांना मुलंबाळं होत नाहीत ते घेतात दत्तक. आपण कशाला घ्यायच?, अमेयचं गणित साधं सरळ होतं .

पण त्याच्या म्हणण्याला उडवून लावत तृप्ती म्हणाली, असं कुठे लिहलय थोडंच?
मी कॉलेजमध्ये होते, तेव्हा एक सोशल ऍक्टिविटी म्हणून नेलं होतं आम्हाला, लहान मुलांच्या आश्रमात.
तिथे ती काही अगदीच तान्ही, काही आपल्या ध्रुव एवढी, काही त्याहून थोडी मोठी, कोवळ्या वयातली मुलं बघूनच मनात काहूर माजलं होतं त्या वयातही माझ्या. मी तर किती अनुकूल परिस्थितीत वाढले होते, मुख्य म्हणजे डोक्यावर आईबाबांचं छत्र होतं. सतत त्यांच्या प्रेमाचा वर्षाव अंगावर असायचा. आणि समोर बघत होते ती मुलं या सगळ्याला पारखी होती. प्रेमाची भुकेली होती. 
कित्येक दिवस ती डोळयासमोरून जातच नव्हती माझ्या. तेव्हाच ठरवलं, अगदी फार काही नाही करू शकले, तरी किमान एका मुलाला आपण आपल्या घरात आणायचंच. त्याला आपल्याला मिळालं तसं प्रेम द्यायचंच.

तिचं ऐकून अमेय म्हणाला, तृप्ती, विचार तर फार चांगले आहेत तुझे. पण प्रत्त्यक्ष आचरणात आणणं तेवढं सोप्प नाहीये. स्वतःचं एक मूल असताना, दुसरं दत्तक घेणं, त्याच्यावर तेवढं प्रेम करणं, वाटतं तितकं साधं नाही. कशावरून तू दुजाभाव नाही करणार?

अमेय, मी माझ्या मनाची पूर्ण तयारी करूनच बोलतीये तुझ्याशी. हे चार दिवसांपूर्वी ठरवलंय आणि तुला सांगतेय असं नाहीये. वीस वर्षाची होते, तेव्हापासून मनात धरून बसलीये हे मी. स्वतःला सगळे प्रश्न विचारून झालेत माझे. आणि तुला माहितीये, स्त्री मध्ये मातृत्वाची भावनाच सर्वांत जास्त असते. तिचं स्वतःचंच काय दुसऱ्याचं मुल जरी समोर आलं तरी तिच्या मनात ममताच सर्वप्रथम दाटून येते. आणि आपण दत्तक घेणार म्हणजे ते आपलंच होणार, कायद्यानेही आणि आपल्या मनानेही.
मग आपलंच झाल्यावर दुजाभाव कसा येणार? कुठली आई दोन मुलात दुजाभाव करते सांग?
तू देशील ना साथ, ते बोल फक्त, तृप्ती अगदी आत्मविश्वासाने सारं बोलत होती.

ते बघून अमेय म्हणाला, मला काही प्रॉब्लेम नाही. मलाही आवडेल तुला साथ दयायला. पण आपण एकटेच नाही आहोत. आपल्या आईबाबांचा होकारही गरजेचा आहे. त्यांनीही तेवढंच आपलं मानलं पाहिजे बाळाला.

हो, नीट पटवून दिलं तर नक्कीच तेही स्वीकारतील. माझ्या आईवडिलांना तर मी आधीच सांगितलंय, त्यांची मानसिक तयारी झाली आहे. 
आपण बोलूया, तुझ्याही आईवडिलांशी.
कदाचित थोडा वेळ लागेल, पण अयोग्य असं काही नाही यात, याची खात्री पटल्यावर नक्कीच ते साथ देतील आपल्याला.
 

आणि तृप्तीला वाटलं, तसच झालं. दोघांनी जेव्हा अमेयच्या आईबाबांना विचारलं, तेव्हा त्यांचाही अनपेक्षितपणे होकारच आला. उलट इतका चांगला विचार केल्याबद्दल अमेय आणि तृप्तीला शाबासकीही मिळाली त्यांच्याकडून.

तृप्तीला खरंतर, आणणारं मूल कुठलं असेल, कोणाचं असेल, वगैरे प्रश्न अपेक्षित होते, त्यांच्याकडून. पण सर्वजणच विचारांनी तितकेच पुढारलेले बघून खूप लकी फिल झालं तिला त्यावेळी.

तिला तर विश्वासच वाटत नव्हता, इतकं सुरळीत सगळं खरंच घडलं?  पण म्हणतात ना, आपल्या मनात काही चांगलं असेल, तर सगळीकडून त्याला साथ मिळते. तसंच घडलं अगदी तिच्याबाबतीत.

लगेचच तृप्तीने सगळी चौकशी सुरू केली. प्रत्येक ठिकाणी वेटिंग लिस्ट मोठी होती. आणि त्यातही साहजिकच कोणाला एकही मुलंबाळं नाही, त्यांनाच जास्त प्राधान्य दिलं जात होतं. एक मूल असताना दुसरं मुलं दत्तक हवं असलेल्या पालकांसाठी जास्त अवघड होतं, समोरच्याला खात्री देणं. अगदी घरच्या प्रत्येकाची मानसिकता बघून ठरवलं जाणार होतं सगळं. या सर्व दिव्यांतून पार व्हायला नाही म्हंटलं तरी अडीच वर्ष गेलीच, तेव्हा कुठे ध्रुवची छोटुशी दिड वर्षाची बहीण 'मृगया' घरी आली. आणि पुन्हा एकदा सगळं घर दुडुदुडु धावणाऱ्या चिमुकलीच्या तालावर आनंदाने नाचू लागलं..........!!

एक तप लागला, पण तृप्तीने स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मनात योजलेलं प्रत्यक्षात आणलंच..........


©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज- हल्ला गुल्ला लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel