प्रेरणादायी
मराठी कथा
सामाजिक
आपली माणसं अशीही असतात........??
सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०
त्या दिवशी, फायनली सिद्धीच्या हातात ऑफर लेटर मिळालं होतं. तिला हवं तसं तिच्या मनासारखं सगळं जमुन आलं होतं. साधारण वर्षाच्या प्रतीक्षेनंतर..........
कोण आनंद झाला होता तिला, कृतज्ञता व्यक्त करायला म्हणून मोठा पेढ्यांचा बॉक्स घेऊन ती भावाच्या घरी गेली. आपल्या काका काकूंच्या पाया पडून तिने तो बॉक्स त्यांच्या हातात ठेवला. तर काकू तिला बजावत म्हणाली, आमच्या मुलामुळे जॉब मिळाला तुला. आता त्याचं नाव राख हो. त्याची मान खाली जाईल असं काहीही करू नकोस कधी. त्या शोकेसमधे ट्रॉफीज दिसतायत ना, त्या त्याने मिळवल्या आहेत, बेस्ट परफॉर्मन्स देऊन, कळलं?
आणि एक लक्षात ठेव, ऑफिसमध्ये तो तुझा दादा नाही. त्याला 'सर' म्हणूनच म्हणायचं.
सिद्धीचा तर चेहराच पडला त्यावेळी, आपल्याच काकूकडून हे ऐकून.
क्षणात साऱ्या आनंदावर विरजण पडल्यासारखं वाटलं तिला. किती उत्साहाने ती पेढे घेऊन आली होती. किती कृतज्ञता होती मनात तिच्या!! कसंबसं स्वतःला सावरलं तिनं, पण घरी परत आल्या आल्या मात्र डोळ्यातून अक्षरशः पूर आल्यासारखं पाणी वाहू लागलं तिच्या.
अगदी खूप टोचलं होतं ते बोलणं तिला. तिच्या मनात आलं, हेच ते काका-काकू ना दरवर्षी अगदी मी लहान असल्यापासून दर सुट्टीत पंधरा पंधरा दिवस येऊन हक्काने राहतात, गावातल्या आमच्या घरी. माझ्या जन्मापासून ओळखते ना काकू मला. नाव खराब करेन असं वागणारी मी यांना वाटले तरी कशी? मला एवढं कळत नाही का?
गेली सहा वर्ष मी हॉस्टेलवर घरापासून लांब राहतीये, कधी कुठली बातमी आली का कानावर कोणाच्या? ध्येय समोर ठेऊन अभ्यास एके अभ्यास केला, ते हे ऐकण्यासाठी का?
आपल्याच जवळच्या माणसांनी हे बोलावं, याचंच तिला सर्वात जास्त वाईट वाटत होतं.
सिद्धीने अगदी छोट्या खेडेगावात राहून दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. आख्ख्या जिल्ह्यात पहिली आलेली ती दहावीला. साहजिकच तिच्या महत्वाकांक्षा मोठ्याच होत्या. त्यासाठी मोठ्या शहरात जाऊन हॉस्टेलवर राहून तिने आपलं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केलं.
त्या शहरात तिचे काका-काकू देखील राहत होते. पण आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास नको, आणि पाच सहा वर्षांचा प्रश्न होता, म्हणून तिने हॉस्टेलवर रहायच ठरवलं. आणि तिचं कॉलेज त्यांच्या घरापासून तसं खूपच लांबही होतं.
शिक्षण पूर्ण झाल्यावर अर्थातच तिचीही इतरांप्रमाणे नोकरीसाठी शोधाशोध सुरू झाली.
जरी अगदी फर्स्ट क्लास मिळाला होता तिला, तरी पाहिजे तशी, आपल्या शिक्षणाला साजेशी नोकरी मिळायला तिला खूप कठीण जात होतं. जवळपास दर आठवड्याला एखादा तरी इंटरव्ह्यू द्यायचीच ती. तरी पण कुठे ना कुठे काहीतरी फिस्कटायचंच.
जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं तरी तिला तिच्या मनासारखी नोकरी काही मिळालीच नाही. तिलाही त्यामुळे फ्रस्टेशन यायला लागलं होतं. तिच्याबरोबरीच्या सगळ्यांनी छोट्या- मोठ्या मिळतील त्या नोकऱ्या पकडल्या होत्या. राहिली होती हिच, कारण हिला वाटायचं, इतके वर्ष एवढे कष्ट घेऊन मी फक्त अभ्यास केला, ते चांगलं करियर करण्यासाठीच. मग आता मी कुठेही का ऍडजस्ट करू? का माझी किंमत कमी करू? हवी तशी मिळत नाहीये नोकरी म्हणून समोर दिसेल ते का स्विकारू? वेळ लागतोय तर लागु दे, मी धीर धरेन. पण आता मी तडजोड करणार नाही.
तो एका वर्षाचा काळ खूप कठीण होता तिच्यासाठी.
तिच्या काकांचा मुलगा तिथल्याच एका मोठ्या कंपनीत सिनिअर मॅनेजर पदावर होता. जेव्हा त्याच्या कंपनीत ओपनिंग निघाली, तेव्हा त्याने त्याच्याकडून सिद्धीला रेकमेंड केलं.
कंपनी खूपच जास्त मोठी असल्याने नुसत्या रेकमेंडेशनने काम नक्कीच होणार नव्हतं.
सिद्धीचे रितसर सगळे राऊंडस् झाले. अगदी सगळीकडून पारखलं गेलं तिला,
नॉर्मल कॅंडिडेटसारखं. टफ कॉम्पिटिशन होती तिथेही. पण यावेळी सिद्धी जिंकली,अगदी सगळ्याच बाजूने. तिला पॅकेजही हवं तसं मिळालं. एकदाचं स्ट्रगल संपलं तिचं.
तो आनंद आपल्या लोकांबरोबर साजरा करायला म्हणून ती काका-काकूंच्या घरी गेली, तर तिचा तो एवढ्या प्रतिक्षेनंतर मिळालेला आनंद तासभर सुद्धा टिकू दिला नाही तिच्या आपल्याच लोकांनी...........
खूप खूप वाईट वाटलं तिला, खूप खूप रडली ती त्या दिवशी; पण त्यानंतर मात्र जिद्दीने पेटून उठली.
अगदी ठरवून इतकं स्वतःला कामात झोकून दिलं की जो बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड तिच्या भावाला, कंपनी जॉईन केल्यावर सहा वर्षांनी मिळाला होता, तो अवघ्या दोन वर्षात तिने मिळवून दाखवला, त्याबरोबर वरच्या हुद्द्यावर प्रमोशन पण!!
मग मात्र मुद्दामहूनच पुन्हा एकदा ती पेढे द्यायला तशीच गेली, आपल्या माणसांकडे, त्यावेळी तिचा भाऊही समोर होता, तो म्हणाला; आई, सिद्धीने माझी मान आज अभिमानाने ताठ केली. आज तिच्याबरोबर सगळे माझंही अभिनंदन करत होते.
सिद्धीने पेढ्यांचा बॉक्स काकूच्या हातात ठेवला, आणि म्हणाली, आता यावेळी गावी याल तेव्हा तुम्हालाही माझ्या घरच्या शोकेसमध्ये अशीच ट्रॉफी दिसेल, खूप छान वाटेल ना तुम्हाला?
काकूने तोंडदेखलं 'हो' म्हणत झटकन मान फिरवली खरी, पण तरीही काकूचा पडलेला चेहरा सिद्धीला दिसलाच, अन् तेव्हा कुठे आग शांत झाली, तिच्या मनातली.........!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज- हल्ला गुल्ला नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article