नावं ठेवणं सोप्पं.........!!


अरारा!! आजच्या दिवशी सकाळची सुरुवातच खोट्यापासून, काय हे मुकुंद?

मग काय? सुट्टीच्या दिवशी कस्टमर अटेंड करायला सांगतायत, का तर म्हणे, तोही आरामात असेल घरी, व्यवस्थित पटवता येईल. आता नकार द्यायला कारण शोधावं लागणार ना? पहिले तुला आजारी पाडणार होतो, मग म्हटलं नको उगाच खरं झालं तर, माझीच पंचाईत होईल. मग बाबांना, परत म्हटलं नको, चांगले ठणठणीत आहेत उगीच बोला फुलाची गाठ नको. मग स्वतःलाच आजारी पाडलं, म्हटलं जाऊ दे काय ते माझ्यावर येऊ दे. 

आता मी त्यांना म्हटलं असतं, आज कस्टमरला पटवायचा मूड नाही माझा, तर चाललं असतं का त्यांना? म्हणून टेपवलं, लूज मोशन झालय.
खरं नाही पचत ग लोकांना, मग अशी थाप मारावी लागते, ती सहज पचते.
कितीही नाही म्हटलं तरी खोटं बोलावच लागतं बाई........

बरं चल खूप झाली पोपटपंची, घरी आहेस तर पंखे बिंखे पुसून घे, साफसफाई कर जरा घराची.

मला तो पण मूड नाही ग अंजली.......

मागच्या रविवारीही तुला मूड नव्हता, आताही नाही. घरी काम करायचं म्हटलं की तुला मूडच नसतो कधी मुकुंद......

बघ हेच, मी खरं सांगितलं तर लागली कचकच करायला, डोकं दुखतंय म्हटलं असतं तर चार वेळा आली असतीस विचारायला, वाटतय का बरं, वाटतय का बरं करत !!
म्हणून खरं बोलायला नको वाटतं, खरी भावना कोणी समजून घेतच नाही. 

गेले चार रविवार तुला प्रेमाने सांगतीये, साफसफाई कर, तुझा मूड बनतच नाहीये. आता ते लाटणं आणते आणि घालते तुझ्या टाळक्यात म्हणजे मूड बनेल बरोब्बर........

साफसफाईच करायची आहे ना, करतो ग बाई करतो. पण उगीच त्या लाटण्याची खोटी हुल देवू नको हं अंजली.....आजच्या दिवशी तरी हिंसेचा विचार करू नकोस!! तसही ते लाटणं परवडेल एकवेळ पण तोंड फुगवून बसलीस तर ते जास्त महागात पडेल मला. आणखी चार काम लावून देशील पाठीमागे.........

आता कसा आलास ताळ्यावर!! नाष्टा कर आणि सुरू कर दिलेलं काम मुकाट्यानं....

हे असं व्हसकण्यापेक्षा विनम्रतेने सांगितलं असंतस तर किती बरं वाटलं असतं मनाला. 

अहो मुकुंदराव, तुमच्याकडून साफसफाई करणं शक्य होणार आहे का आजच्या दिवसात?
छे, किती फनी वाटतं असं, बायको आपल्या नवऱ्याला आर्जव करतीये.
त्यापेक्षा 'ए, चल उठ घर झाडून घे', असं दमात घेतलं की चुटकीत काम होतं.

पण हेच आम्ही जरा आवाज चढवला चुकून तर तुमच्या डोळ्यात गंगा जुमना व्हायला लागतात त्याचं काय?
तुम्ही नवऱ्यांना दमात घेणार हवं तेवढं आणि आम्ही दम दिला तर मौनव्रत धारण करून आमचा दम काढणार, हे बरंय.

सगळी आदर्शवादी मूल्यं स्वतःच्या सोयीनुसार आचरणात आणता हं तुम्ही बायका, मानलं पाहिजे तुम्हाला!! 
आम्ही एकदा टेप मारली तर जन्माचे खोटारडे ठरतो, तुम्ही दहा वेळा मारल्या तरी सत्यवादीच. कारण कुठल्या नवऱ्याला तुमच्याकडे बोट करून स्वतःचे ग्रह फिरवून घ्यायची हौस असणार ना?

आम्ही चापटी मारली तर हिंसक, तुम्ही लाटणी पेकाटात घातली तरी अहिंसावादी.

भटकायला, शॉपिंगला, पिक्चरला जाताना, असेल नसेल तेवढी सगळी विनम्रता बाहेर काढता, आणि घरातली काम करवून घेताना बरोब्बर ऑर्डरी सुटतात तुमच्याकडून.

शिवाय या सगळ्याने काम नाही झालं तर मौनव्रताचं अस्त्र कायम असतच तुमच्याकडं!!
बरोबर ना अंजली??

मुकुंदा, हिच जगरहाटी आहे रे बाबा. त्याला धरूनच चालावं लागतं आम्हाला. तेच पचतं नवऱ्यांना. बायकोची खरी भावना कोणी समजूनच घेत नाही. काही का असेना, आमच्याकडून मूल्यं कुठेतरी आचरणात तरी आणली जातायत ना?
नाहीतरी आजकाल कोण विचारतं, कोण जपायचा प्रयत्न करतं सांग मूल्यांना?
आणि कोण विश्वास ठेवतं त्यावर? खोटं सहज पचतं, अन् तेच खरंही मानलं जातं!!

एक दिवसही आपल्याला ज्यांच्यासारखं वागणं जमत नाही, त्यांना नावं ठेवायला मात्र आपण सर्वात पुढे असतो..........हो ना?

मुकुंदाला यावर पुढे काहीही न बोलता दिलेलं काम करणं जास्त योग्य वाटलं.......!!


©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel