बबन्या.........!!
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०
त्याला बघून आम्ही पोरं धूम ठोकायचो. तो दुरूनच दिसला येताना की आम्ही लपून बसायचो. भयंकर दहशत होती त्याची आम्हा मुलांच्यात!!
आम्ही जास्त दंगा केला, त्रास दिला की त्याच्या नावानं आम्हाला धमक्या दिल्या जायच्या, त्याच्या नावाने आम्ही चुपचाप बसायचो. शाळेला सुट्टी मिळायची म्हणून रविवार खूप आवडायचा, पण हाच रविवार महिन्यातून एकदा आमचा घातही करायचा........
कारण कुठल्यातरी एका रविवारी तो यायचा. छोटीशी पत्र्याची पेटी घेऊन, आणि त्यात असायची त्याची ती अवजारं, आमचा चकोट करणारी!!
हो, एवढ्या तेव्हढ्याला आम्हाला धमकावलं जायचं, जास्त शहाणपणा केला ना की बबन्याला बोलवून चकोट करतो की नाही बघाच तुम्ही!!
हा बबन्या आमचा खानदानी न्हावी होता. तशी साताऱ्यात बऱ्याच घरातली डोकी त्याच्या हातात होती. त्याचं नाव घेतलं की धडकीच भरायची मला तर लहानपणी. अजिबात म्हणजे अजिबात आवडायचा नाही मला तो. बाहेर फिरायला गेल्यावर रस्त्यात कुठे भेटला तरी मी लपायचे कुणाच्या तरी मागे. काही भरोसा नव्हता मला, तो दिसला की वाटायचं आता घरचे सांगतील की काय याला, बबन्या भेटलाच आहेस तर छाटणं करून टाक हिच्या केसांचं!! भीतीच बसलेली मनात त्याची.
बघितला तर उंच, सडपातळ असाच होता, भीती वाटण्यासारखं तोंड तर अजिबात नव्हतं. सदरा, लेंगा आणि डोक्यावर गांधी टोपी असायची नेहमी. वय असेल त्यावेळी चाळीशीच्या आगेमागे.
दिसायला अतिशय साधा, मात्र आम्हा पोरांना त्याचं नाव काढलं तरी घाम फुटायचा. तसा हसराच होता, पण घरच्यांनी सांगिल्यावर फुकट दमात घ्यायचा आम्हाला........
बोलवायला नाही लागायचं त्याला कधी, त्याचा तो बरोब्बर वेळकाळ बघून यायचा.
तो आला की आजोबा पहिला नंबर लावायचे. त्यांना चकोटच आवडायचा, तो ते आनंदाने करून घ्यायचे. मग मामा बसायचा, बबन्या त्याला साधासा कट मारून द्यायचा, त्यात तो खूष असायचा. आणि मग आमचा नंबर असायचा. मी आणि मामाची दोन मुलं, आम्ही तिघं तिनजागी लपलेलो असायचो. आम्हाला शोधून आणेपर्यंत बबन्याला चहा- नाष्टा मिळायचा. आम्ही लपून देवाची प्रार्थना करत बसायचो, बबन्या जाऊ दे, बबन्या जाऊ दे. पण बबन्या कसला जातोय?
तो चहाचे घोट रिचवत देशातल्या महत्वाच्या घडामोडींबाबत माझ्या आजोबांशी मोठ्या आवेशात चर्चा करत असायचा.
मामा आम्हा पोरांना एक एक करून शोधून आणत त्याच्यासमोर पकडून बसवायचा. धाsय धाsय रडायचो आम्ही, पण कुणा एकाला दया यायची नाही आमच्यावर........!!
तशी चकोट करायची भीती दाखवायचे, पण आम्हा पोरींचा चकोट काही व्हायचा नाही. तो व्हायचा माझ्या भावाचा!! त्याची सुटका नसायची त्यापासून. अन् त्याला बघून आम्हालाही उगाचच वाटायचं, आता आपलाही चकोटच होणार!!
पण जे काहीही व्हायचं ना, ते ही महाभयंकर असायचं. केस डोळ्यावर, कानावर येऊ नयेत याचा कडेकोट बंदोबस्त केला जायचा. मला पिक्चरमधल्या हिरॉईनीसारख दिसावं वाटायचं, पण बबन्या असा अवतार करायचा की नंतर स्वतःच सोंग आरशात बघून मला खलनायिकासुद्धा माझ्याहून लाखपट बरी वाटायची!!
त्या बबन्याला मात्र आम्हाला इतकं विचित्र रूप दिल्याबद्दल समस्त परिवारातर्फे शाबासकी मिळायची!!!
अस्सा अस्सा राग यायचा ना त्या बबन्याचा!! आणि घरच्यांचा पण. केस कापण्याबद्दल हरकत नाही, पण बऱ्या चेहऱ्याचं चांगलं नाही करता आलं तर ठिक आहे, पण बेक्कार काहीतरी करू नये ना!!
नंतर शेंबूड पुसायची अक्कल आल्यावर मी बबन्याला किती सूचना द्यायचे, पण एक ऐकायचा नाही. नुसतं हसायचा. काळाप्रमाणे बदलायचं नव्हतंच त्याला. पोरींना उठून दिसेल असा एखादा कट शिकायला काय हरकत होती त्याला?
सरसकट सगळ्यांच्या डोसक्यावरुन हवातसा वस्तरा फिरवायचा म्हणजे काय?
पुढे कळायला लागल्यावर मात्र मला केस वाढवायला खूssप आवडतं, असं जाहीर करून मी बबन्याच्या केशकर्तनाच्या छळापासून मुक्ती मिळवली. तरी तो मला कात्री दाखवून कापू का? कापू का? करत छळायचाच. नाहीतर घरच्यांना सांगायचा, हिला पण बसावा की. नवीन कट मारतो. समस्त पुरुषवर्गाचा होकार असायचा त्याला (ह्यांना माझ्या वेण्या घालायला लागायच्या नाहीत तरीही🙄 ), मी एकदाची घाबरून रडायला लागले की मग शांती मिळायची सर्वांना.......
पुढे मात्र बबन्याकडे माणूस म्हणून बघायला लागल्यावर तो मला चांगला वाटायला लागला.
हो, कारण अगोदर आम्हा मुलांना तो राक्षसच वाटायचा. मुलांना उचलून त्यांचे जबरदस्तीने केस छाटणारा राक्षस!!
आणखी थोडं मोठं झाल्यावर मात्र त्याची पूर्ण भीती गेली. अगदी त्याच्याशी गप्पा मारण्यापर्यंतही मजल गेली. त्याला काका, मामा काही लागलं गेलंच नाही कधी. घरच्यांनी सांगितलं असणारच लहानपणी, पण रागाने आम्हालाच त्याच्याशी कुठलंही नातं जोडावं वाटलं नसणार नक्कीच!!
केस कापता कापता तो त्याच्या अनेक कहाण्या आजोबांना, मामाला रंगवून रंगवून सांगायचा. त्यांचाही टाईमपास व्हायचा. तसं आजोबांना त्याच्याबद्दल सगळं माहीत होतं, त्यांनीच पकडून आणलेलं त्याला. तो अगदी मोकळेपणाने सर्व सांगायचा त्यांना. वयात अंतर असलं तरी मोकळी मैत्री होती त्यांच्यात.
हा बबन्या बरीच वर्ष येत होता आमच्याकडे, पण आजोबा गेले तसा काय याचा पत्ता लागला नाही.
नंतर मी त्याच्याबद्दल काही ऐकलंही नाही. अगोदर बाहेर गेलं की रस्त्यात दिसणारा बबन्या मला पुन्हा कुठेही भेटलाच नाही.......!!
मला कोणी लहानपणी सांगितलं असतं, या बबन्यावर मोठेपणी मी काही लिहीन, तर त्यावेळी मला येणाऱ्या सगळ्या सभ्य शिव्या मी घातल्या असत्या त्या माणसाला........इतका राग राग करायचे मी बबन्याचा.
पण आता वाटतं, बंध मुद्दामून जोडले जात नाहीतच कुणाशी, ते आपोआप सहज तयार होतात. आज इतक्या वर्षानंतरही बबन्या माझ्या मनात ठाण मांडून बसलाय, त्याचा चेहरा जस्साच्या तसा आठवतोय मला, कधी बांधले गेले मी एवढी त्याच्या आठवणींशी, हे माझं मलाही कळलं नाही!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article