चैतन्य पुन्हा फुलूनी आलं........!!


हाsय किती दिवसांनी भेटलास रे, म्हणत मागून येऊन कुणालच्या पाठीवर तिने जोरदार थाप मारली. त्याच्याबरोबरचा त्याचा मित्र तर दचकलाच.
कुणाललाही अनपेक्षितपणे समोर आलेल्या तिला बघून एक सेकंद सुचलच नाही काही. तो आता नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी या पेचात असताना तिनेच नेहमीप्रमाणे बडबड सुरू केली. काय म्हणतोस, कसा आहेस, आई काय म्हणतेय तुझी, मुलं किती आहेत, नंबर दे तुझा, एकामागोमाग एक प्रश्न सुरू झाले तिचे. नॉनस्टॉप बोलत होती ती, पण दम लागल्यासारख कुणालाला झालं. मोठा श्वास घेऊन तो म्हणाला, राजसी, तू अगदी तशीच आहेस ग, जशी तू कॉलेजमध्ये होतीस. आम्ही सगळे बदललो, तू तशीच आहेस मात्र.
तशीच भडाभडा बोलतीयेस, तशीच खळाळून हसतीयेस, तशीच उत्साहाने सळसळतीयेस. इतक्या वर्षात तू काहीच कशी नाही बदललीस?

राजसी हसून म्हणाली, मी कशाला बदलू? वय वाढलं की बदलायला हवं असं कुणी सांगितलंय?
पण तू मात्र एकदम मॅच्युअर्ड मॅन वाटतोयस हं!!

जीवनातल्या चढउतांरानी आम्हाला मॅच्युअर्ड बनवलं, कुणाल गंमतीच्या सुरात म्हणाला. 

खरंच? पण म्हणून कुणी आपला मूळ स्वभाव सोडावा? तू ही किती फिरक्या घेणारा होतास रे कॉलेजात? आपला ग्रुप कसले कसले प्रॅन्क करायचा आणि त्यात तूच सर्वात जास्त शैतान दिमागवाला होतास!! आता कुणाला सांगितलं तर विश्वास बसेल का तुझ्याकडे बघून?

कुणाल उत्तरादाखल हसला आणि म्हणाला मी जवळजवळ ग्रुपमधल्या प्रत्येकजणांना कुठे ना कुठे भेटलोय, ते सगळे असेच आहेत माझ्यासारखे. 
पस्तिशी अंगावर आल्यासारखे. फक्त तूच एकटी आहे तशीच आहेस, अजूनही तोच अवखळपणा डोळ्यात आहे, मनात तशीच ताजगी आहे, अगदी तशीच चुलबुली आहेस .........
नवऱ्यानेही बदलवलं नाही वाटतं तुला?

ए काहीही काय बोलतोस, तो कशाला मला बदलवेल? आणि कुणी बदलवून मी बदलू तरी का?
म्हणजे तुला काय तुझ्या बायकोने बदलवलं की काय? भेटायला पाहिजे मग तिला!!

नाही ग मी आपलं सहज म्हटलं, कुणाल पुढे काही बोलणार इतक्यात राजसी म्हणाली,
चल मी जरा घाईत आहे आता, नंबर मिळालाय तर मग निवांत बोलू आपण, असं म्हणून ती आपल्या दुचाकीवरून नजरेआडही झाली.

कुणाल सगळं स्वप्नवत असल्यासारखं तिच्या मार्गाकडे बघतच बसला. त्याच्याबरोबर असणारा मित्र त्याला म्हणाला, काय रे, कॉलेजमधलं प्रेम दिसतंय. 

कुणाल झटकन म्हणाला, नाही रे. अजिबात नाही. प्रेम नव्हतं. ग्रुपमधली आवडती मैत्रीण होती फक्त. कशी आहे बघितलस ना? अगदी तशीच होती कॉलेजमध्ये. म्हणून पेचात पडलोय, काही माणसं अजिबात बदलतच नाहीत, कौतुक वाटतं अशा माणसंच, ज्यांना दुनियादारीचा काहीएक रंग चढत नाही. नाहीतर आम्ही, काय होतो आणि काय झालो........??

कुणाल घरी गेला तरी त्याच्या डोक्यात तिच होती 'राजसी'. बायको आली नव्हती म्हणून फ्रेश होऊन त्याने चहा घेतला, तो पिता पिताही राजसीच डोळ्यासमोर येत होती त्याच्या. अजूनही किती फ्रेश वाटत होती ती, दिसण्यात, वागण्या-बोलण्यात. आणि मी काय करून घेतलाय अवतार माझा. काय वाटलं असेल तिला मला असं पाहून? हिरो होतो मी कॉलेजचा, आणि कॉलेज काय सुटलं, घरदाराच्या, नोकरी धंद्याच्या व्यापात एवढं बुडालो की स्वतःलाच विसरलो? ज्याला दुःख नाही असा एकही माणूस जगात नाही, तिलाही असणारच. पण तरी ती रसरसून जगतेय. मीही असाच तर होतो ना जीवनावर प्रचंड प्रेम करणारा? हा असा एवढा प्रगल्भ कधी झालो, बरं झालो तर झालो, ते भाव चेहऱ्यावर घेऊन कधीपासून फिरायला लागलो? हे एवढं कुणी बदलवलं मला?

चहा संपला तसा कुणाल उठला आणि आरशासमोर जाऊन उभा राहिला. स्वतःकडे नीट न्याहाळून बघितलं तर तो त्याला पस्तिशीतच पंचेचाळीशीचा वाटला. चेहरा कुठल्याही अँगलने तजेलदार वाटत नव्हताच त्याला. आतूनच प्रसन्न वाटत नव्हतं, तर बाहेर काय दिसणार होतं?
मग त्याची नजर आरशाच्या बाजूला लावलेल्या गिटारवर गेली. शेवटचा कधी हात लावलेला रे आपण याला? हे त्याला खूप प्रयत्न करूनही आठवलं नाही. कॉलेजमध्ये असताना गॅदरिंगला त्याचा कार्यक्रम असायचाच. शिवाय प्रत्येकाच्या वाढदिवसालाही आवर्जून वाजवायचा तो. गिटार वाजवायचा आणि कित्तीतरी गाणीही गायचा.  

तिला तसं बघून कुणाल विचार करत राहिला, हल्ली तर गुणगुणंही बंद झालं माझ!! 
आतातर ही गिटार शोपीस झालीये नुसती!!
हे सगळं सोडलं म्हणूनच मी असा झालो वाटतं!! ते माझं मूळ होतं, ते गेलं तसं माझ्यातलं चैतन्यही हरवलं. राजसी बरोबर बोलत होती, का बदलायचं आपण? का मूळ स्वभाव सोडून दयायचा? आणि कशासाठी? तिने तिचं मूळ निसटू नाही दिलं म्हणूनच ती प्रफुल्लित वाटत असावी पाहणाऱ्याला!!

कुणालने अलगद ती गिटार काढली, त्याच्यावरची धूळ पुसली. प्रेमाने तिच्यावरून हात फिरवला, तिला हृदयाजवळ घेतलं, हळुवार तिच्या तारा छेडल्या. क्षणात सूर जुळले दोघांचे, कुणालला हरवलेलं गवसलं. त्याच्या शरीरातून आनंदलहरी बाहेर पडू लागल्या, सुंदर सुंदर गाणी त्याच्या ओठांवर येऊ लागली. तो त्या आनंदात हरवून गेला.

त्याची बायको लॅच उघडून आत आली, खूप दिवसांनी तिलाही घर प्रसन्न वाटलं. फ्रेश होऊन ती कुणालकडे गेली, गिटार वाजवणारा, मान डोलवत गाणी म्हणणारा कुणाल तिला अगदी एखाद्या हिरोसारखाच भासला. 
त्याच्या गळ्यात पडून ती म्हणाली, तू लग्नाआधी अगदी असाच होतास, असाच राहा ना कायम.........
कुणाल तिचे हात पकडून म्हणाला, प्रॉमिस. मी असाच राहणार आता. आणि तुही तशीच हवीस मला जशी पहिल्यांदा भेटली होतीस. बघावं तेव्हा हसत राहणारी.........

वय वाढू देत हवं तेवढं, त्याचं ओझं मनावर नको यायला. मनावर आलं की शरीरावर येतं. 
मी तुला सांगितलेलं ना आमच्या ग्रुपमधल्या राजसीबद्दल, अगं तिचं वागणं अजूनही तसच आहे, अजिबात बदलली नाही ती. 
जेमतेम पाच मिनिटं बोललो असू आम्ही, आणि केवढा परिणाम केला तिने माझ्या मनावर........

फक्त तुझ्यावर नाही, तुझ्याकडून माझ्यावरही, एवढं बोलून त्याच्या बायकोने मनातून लाख आभार मानले राजसीचे........
त्यांच्या मरगळलेल्या जगण्यावर उत्साहाची हलकीशी फुंकर मारून नवंचैतन्य जे दिलं होतं तिनं!!


©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel