कौटुंबिक
मराठी कथा
मी नाही हो नाती तोडणारी.........!!
मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०
तुला किती वेळा सांगितलं मी, तू का लक्षात घेत नाहीस रे? माझ्यासमोर तू ओरडत जाऊ नको ना आईंवर, वैष्णवी त्रासिक सुरात म्हणाली.
त्यावर अमोघ तिलाच गप्प करत म्हणाला,
तू आमच्यात नको पडू ग, आमचं आम्ही बघू. आमच्यात चालतं पहिल्यापासून असं. तू नवीन आहेस, तुला नाही माहिती. आईला सवय आहे, माझ्या अशा बोलण्याची, माझ्या मनात काही नसतं माहिती आहे तिला!! माझं खूप प्रेम आहे तिच्यावर हे ही जाणते ती.
अरे हो, पण तुला चेहरे वाचता येत नाहीत. भले तुझ्या मनात काही नसेल, पण तू पटकन असं काहीतरी बोलतोस, जे एकदम जिव्हारी लागतं.
गोष्ट शुल्लक असते, पण तू रिऍक्ट जरा जास्तच होतोस, वैष्णवी अमोघला समजावण्याचा प्रयत्न करत होती, तरी स्वतःचाच हेका पुढे करून तो म्हणाला, ते तर नेहमीचंच आहे माझं. तू आत्ता आलीयेस म्हणून तुला वेगळं वाटतय. तू का लक्ष घालतेस आम्हा मायलेकरांंत??
तुला कसं सांगू अमोघ. तू बोलण्याचं त्यांना वाईट वाटत नसेलही, पण माझ्यासमोर बोलल्याचं नक्कीच दुःख होतं. मी बघितलंय ते त्यांच्या डोळ्यांत. तुम्ही दोघं असताना तू बोललेलं वेगळं आणि त्यांच्या सुनेसमोर बोललेलं वेगळं. त्या गप्प बसून वाद वाढवत नाहीत हा त्यांचा मोठेपणा. त्याही तुझ्याच शब्दात बोलल्या तर कसं वाटेल तुला? त्यांचा हक्कही आहे तो. मला बघून त्या गप्प बसतात. तुम्ही दोघं असायचा तेव्हा बोलायच्या ना?, वैष्णवी असं विचारताच अमोघ तत्परतेने म्हणाला, हो बोलायची ती, कधी कधी रुसूनही बसायची माझ्यावर, मग मी जायचो तिला लाडीगोडी लावायला, पण हल्ली नाही रुसत तशी.
बघ, मग तेव्हढ्यावरून तरी कळायला नको का तुला? आईला काहीतरी खुपत असावं. माझ्यासमोर आईशी वाद घातल्यावर एकदा तरी बघितलंयस का त्यांच्या चेहऱ्याकडे तू? खूप अपमानास्पद फिल होतं रे त्यांना. डोळे काठोकाठ भरलेले असतात.
कालचीच गोष्ट, तू नेहमीसारखं काहीतरी बोललास, आणि निघून गेलास खाली. त्यांच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघून मलाच कसंतरी वाटलं. नेहमी तुमच्या दोघांच्या मध्ये न येणारी मी सरळ गेले त्यांच्याजवळ आणि त्यांचा हात हातात घेऊन तुझ्यातर्फे माफी मागितली.
त्यांना म्हटलही, पुरुषांना नाही कळत हो एवढं. मी माझ्या घरीही आईचं मन असं दुखावलं गेलेलं पाहिलय. मी समजू शकते. दादा वहिनीसमोर तिला बोलला की खूप लागायचं तिच्या मनाला. मग मीच जायचे तिची समजूत घालायला. तसच समजा ना तुम्हीही. मला स्वतःलाच अपराधी वाटतंय.
त्यावर त्यांनी डोक्यावरून हात फिरवला माझ्या फक्त. बोलल्या काहीच नाहीत.
तुमचे तुम्ही मायलेक एकटे असताना भांडा ना किती भांडायचय तेवढं. पण माझ्यासमोर नकोच ना!!, वैष्णवी अगदी काकुळतीला येऊन बोलली.
एवढं तोलून मापून वागणं नाही जमायचं बाबा मला. तू आली म्हणून आमच्या नात्यात फरक का पडावा? तुझ्यासाठी मी का वेगळं वागू माझ्या आईशी?, अमोघला काहीही समजूनच घ्यायचं नव्हतं.
वैष्णवी तरीही स्वतःचा मुद्दा पुढे रेटत म्हणाली, मी काही माझ्या स्वार्थासाठी तुला वेगळं वागायला नाही सांगत आहे अमोघ. तुझ्या आईसाठीच सांगतीये. कालपासून सॉरी तरी म्हणायला गेलास का त्यांना? माझ्यासमोर वाद घालतोस तर माझ्यासमोरच लाडीगोडी लावत त्यांना मिठी मारून सॉरीही म्हण ना, कित्ती छान वाटेल त्यांना!!
मनात काही नसतं ना तुझ्या, मग माफी मागायचाही मोकळेपणा दाखव की पहिल्यासारखा.
बदललायस तुझा तूच; पण नाव मात्र माझं खराब होतंय, कळतय का तुला? आमचं नातं नको ना उगाचच दूषित करुस. अजून तेवढं जुळलं पण नाहीये ते. वर्षसुद्धा नाही झालं मला येऊन.
आमच्या दोघींच्याही जागेवर उभं राहून विचार कर ना एकदा तरी........
मी पाहिलय रे माझ्या आईत आणि दादात विनाकारण दरी निर्माण होतांना, तेव्हाच ठरवलेलं आपलं घर वेळीच सावरायचं. आपल्याला मायलेकरांना तोडण्याची बोच नकोच लागायला!!
हं, कदाचित तू तुझ्या घरी पाहिलस म्हणून तुझ्या लक्षात आलं असावं.
मी सॉरी म्हणायला जात नाही हल्ली, तिच स्वतःहून बोलेल, म्हणून सोडून द्यायला लागलेलो, ते चुकलंच माझं. तू बरोबर बोलतेस, आपलेपणाने रागावून बोलणाऱ्याला आपलेपणाने माफी मागायचीही लाज नको.
आत्ताच जातो मी आईकडे, दहा वेळा सॉरी बोलून मस्का मारत बसतो. आज जेवणात बघ माझ्या आवडीचं काहीतरी खास असणारच!!
एवढं बोलून अमोघ आईकडे पळाला सुद्धा, वैष्णवी डोळे पुसून, चेहरा धुवायला जाताना डोकवायला गेली, तर अमोघ मस्त त्याच्या आईच्या मांडीवर डोकं ठेऊन, काय काय बडबडत होता, आणि त्याची आई अतीव प्रेमाने, आणि भरल्या डोळ्याने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती.
माय लेकरं आपल्यामध्येच गुंग होती, अन् त्यांना दुरूनच बघणारी वैष्णवी, समाधानाने भरून पावत होती..........
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article