कौटुंबिक
मराठी कथा
मोबदला........!!
शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०
हे बघ सुयश, मी तुझं सगळं केलंय. आईवडिलांच्या मागे मी तुला संभाळलय. मी नसते ना, तर तुझं एवढं शिक्षणच झालं नसतं. पैसाही ओतलाय वारेमाप मी तुझ्यावर.
आज जे कोणी आहेस ते माझ्यामुळे. तुला त्याचं काहीएक नाही. आपल्या बहिणीबद्दल कृतज्ञता अजिबात दिसत नाही तुझ्या वागण्यात.
अगं हो ताई, मी कुठे नाही म्हणतोय? मी आज जे कोणी आहे ते नक्कीच तुझ्यामुळे. मला शंभर टक्के माहीत आहे ते. पण कृतज्ञता व्यक्त करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तू अगदी रोज उठता बसता हे ऐकवतेस. जरा काही चुकलं की तुझं लेक्चर चालू होतं. सारखं ऐकवून काय मिळतं तुला?
काय इच्छा आहे तुझी, मी सतत मान खाली घालून राहू का तुझ्यापुढे?
मान खाली घालून राहण्याची अपेक्षा नाही, पण किमान माझ्या मताला प्राधान्य द्यायला काय हरकत आहे तुला?
ताई, आजपर्यंत इतकी वर्ष फक्त तुझ्या मतांनी चाललो मी. माझीही मतं होती, सर्वांगी विचार करून तयार झालेली, त्यांनाही दूर सारलं मी. नेहमीच तुला प्राधान्य दिलं. पण आता एखादी गोष्ट मी माझ्या मनासारखी केली तर काय होतं? थोडं तुही तुझं मन मोठं कर ना. सतत हेच का डोक्यात ठेवतेस, की मी ह्याचं केलंय. भावाचच केलंस ना? रस्त्यावरून तर कुणाला उचलून आणून त्याचं केलं नाहीस ना?
उद्या तुझा मुलगा मोठा होईल, त्यालाही अशीच ऐकवत बसणार का?
तू खूप बोलायला लागलायस सुयश. साधी अपेक्षा आहे माझी, तू लग्न माझ्या मर्जीने करावंसं.
ताई, तुझी साधी अपेक्षा आहे पण माझं पुढचं सर्व त्यावर अवलंबून आहे. जिच्याबरोबर मला आयुष्य काढायचय ती माझ्या पसंतीचीच हवी मला.
जिला मी पसंत केलंय, तिला तू उगीचच बाजूला करत आहेस. तुझा मान ठेवला नाही असं वाटून.
तेच तू आनंदाने संमती दिल्यावर तुझा मान आणखी वाढणार आहे हे का कळत नाही तुला?
पण सुयश, मला जशी हवी तशी ती नाही ना!!
ताई लग्न मला करायचय आणि मला हवी तशी ती आहे. तेव्हा उगाच घ्यायची म्हणून आडकाठी घेऊ नकोस. तू माझं केलयस त्याबद्दल मी तुझा आजन्म ऋणी असेन. पण त्या बदल्यात मला असा दुःखाच्या खाईत लोटणारा मोबदला मागू नकोस.
ठीक आहे तर,आजपासून तुझा माझा सबंध संपला अस समज, आणि निघ माझ्या घरातून. खूप पोसलं तुला. पाण्यात गेले माझे उपकार समजेन मी.
ताई समजूनच घ्यायला तयार नाही म्हटल्यावर सुयशचा पण नाईलाज झाला. त्याने ते घर सोडलं. खरंतर ताई जे केलं केलं म्हणत होती, तो हिशोब सुयशकडून चुकताही झाला होता.
पाच वर्षांपासून तो उत्तम ठिकाणी नोकरीला होता. आपला सर्व पगार तो स्वतःला गरजेपुरते पैसे ठेऊन ताईला देऊन टाकायचा. ते घेताना ताईने तुझ्या भविष्यासाठी काही ठेव, असं चुकून एकदाही म्हटलं नव्हतं. सुयशला त्याचं वाईट वाटायचं, पण तो सोडून द्यायचा. ताईंच्या मोठ्या आजारपणात त्याने दिवस रात्र जागून तिची सेवाही केलेली. घरातली किरकोळ कामं, तसंच बाहेरची जवळपास सर्वच कामं सुयशच करायचा. तो होता म्हणून ताईचा नवराही निश्चिंत असायचा. त्याचीही जबाबदारी तो बरेचदा सुयशच्याच डोक्यावर टाकायचा. आणि इतकं सर्व करून देखील ताई त्याच्याबद्दल कधी चांगला शब्दही काढायची नाही.
खरंतर तो स्वतःच कंटाळला होता, ताईकडे राहायला. त्याने ठरवलंच होतं, ताईची समजूत घालण्याचा होईल तेवढा प्रयत्न करायचा, पण नाही म्हटली तरी आता आपण मागे हटायचं नाही. लग्न, जी मुलगी आवडते तिच्याशीच करायचं. इतकी वर्ष मन मारून राहिलो. आता आणखी तसंच राहिलो, तर जगण्यातला आनंदच हरवला जाईल आपल्या.
ताई ताईच्या जागी, तिच्या प्रत्येक गरजेला मी धावून जाईनच. तिने कितीही दूर लोटलं तरी.
पण त्यापायी माझं ज्यात सुख आहे असं मला वाटतं, ते मी आता सोडणार नाही.
ठरवल्याप्रमाणे सुयशने त्याच्या आवडत्या मुलीबरोबर लग्न केलंच. ताईने न बोलावता देखील तो आपल्या बायकोला घेऊन तिला भेटायला गेला तेव्हा त्याला अनपेक्षित असा धक्काच बसला. ताई अगदीच नॉर्मल वागत होती त्याच्याशी. त्याच्या बायकोशीही अगदी प्रेमाने बोलली. निघताना मात्र आता दोघं एकटे राहण्यापेक्षा इकडेच येऊन राहा, असा आग्रहच करू लागली. त्याला कारणंही होतं, सुयश घरातून बाहेर पडल्यावरच तो जे काही करत होता, त्याचं महत्व तिला कळलं. तिला थोडं जरी बेचैन वाटलं, तर सुयश तिला सक्तीने अराम करायला लावायचा. सगळं तोच बघत असल्याने तिला तशी काही चितांच नव्हती. आणि तो गेल्यावर मात्र सर्वकाही हिच्याच अंगावर पडलं.
नवऱ्याला तर हात झटकण्याशिवाय काही माहीतच नव्हतं. हिच्याकडे कोणी लक्ष द्यायला उरलंच नव्हतं.
त्यामुळे आता ताईला सुयश आपल्या घरात राहणं जास्त सोयीचं वाटलं. शिवाय त्याची बायकोही मदतीला मिळाली असती. शिवाय दोघांचा पैसाही दिसायला लागला होता तिला.......
पण सुयशने ते आमंत्रण आदरानेच धुडकावून लावलं. त्याला स्वतःलाच मोकळं राहायची इच्छा होती आता. सध्या भाड्याने रहात असले तरी, लवकरच स्वतःचं घर घ्यायचं स्वप्न होतं त्याचं आणि त्याच्या बायकोचं.
आणि आपण सहन केलं ते आपल्या बायकोला सहन करायला लावायची मुळीच इच्छा नव्हती त्याची. तसंही त्याने त्याचा मोबदला पुरेपूर चुकवला होताच. तो हुशारीने ताईला म्हणाला, ताई इतक्या वर्ष केलंस तू माझं. आता आणखी कशाला तुला त्रास? तुलाही तुझं कुटुंब आहे ना? किती दिवस तू इतरांचं करत राहणार? आता स्वतःच्या कुटुंबाबरोबर अगदी शांततेने, आनंदाने राहा. काही लागलं तर मी आहेच. हाक दिलीस तर नक्की येईन. पण आता माझी बायको आल्यावर तू माझं करत राहणार ते मला काही पटणार नाही. तिला करू दे आता काय ते. तुझ्यावर भार नको.
सुयश एवढं सगळं ताईच्याच बाजूने बोलल्यावर, त्याच्या ताईकडे मनात चरफडत का होईना त्याला होकार देण्याशिवाय काहीही पर्याय उरला नाही..........
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article