आठवणीतली घरं..........!!

माझ्या आठवणीतली ही घरं आहेत साताऱ्यातली. अगोदर बरीच वर्षे आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. अगदी प्रत्येक वर्षी नाही, पण साधारण चार पाच वर्षांनी काही ना काही कारणांनी घरं बदलावी लागली. आता विचार केला तर वाटतं, बरं झालं तेव्हा स्वतःच घर नव्हतं. किती वेगवेगळी घरं, माणसं अनुभवायला मिळाली त्यामुळे!!

तर माझ्या आठवणीतलं पहिलं घर आहे. साताऱ्याच्या विश्वेश्वर मंदिराजवळ असलेल्या नाफड वाड्यातलं. मी चार वर्षांची होते तेव्हा. तरीही हे घर मला अजूनही तस्सच्या तसं आठवतंय. रस्त्याला लागूनच होत हे घर, मागच्या दारी मात्र ओढा होता. तशी बरीच झाडं होती मागे, पण माझ्या आठवणीत राहिलंय गुलाबी फुलांचं कण्हेरीचं झाड. अजूनही कुठे कण्हेरीचं झाड दिसलं की मला ते त्याच झाडाच्या आठवणींजवळ नेऊन सोडतं.
या घरात आमचं शेजाऱ्यांशी खूप भांडण व्हायचं. तिन्ही त्रिकाळ खूप जोरजोरात भजनं लावून ठेवायचे ते, माझ्या मामाचा मुलगा नुकताच जन्मलेला होता. तो झोपू शकायचाच नाही त्यामुळे.  आणि कितीही सांगितलं तरी ते ऐकायचेच नाहीत.

त्या शेजाऱ्यांची आणि आमची येण्याजाण्याची वाट एकच होती. रस्त्याला लागून एक दरवाजा होता, आणि तिथून आत गेलं की डाव्या बाजूला त्यांचं घर आणि समोर आमचं घर असं होतं. 
तो दरवाजा दोघांनाही आत येण्यासाठी कॉमन होता. तो दरवाजा नेहमी उघडाच असायचा. पण एकदा मात्र मी मागच्या दाराने बाहेर खेळायला गेले आणि पुढच्या दाराने परत आले, तर त्याला कुणी कडी लावून बंद केलं होतं. मी तो जोरजोरात वाजवून, ओरडून कोणीही उघडत नव्हतं, शेजाऱ्यांना खरंतर सहज ऐकू जाण्यासारखं होतं, पण ते खुन्नस काढण्यासाठी उघडत नव्हते. माझ्या आजीला ते ऐकू येणं शक्य नव्हतं. कारण आमचं घर त्या दरवाज्यापासून तसं लांब होतं. मी घाबरून रडून गोंधळ घातला होता तिथे. आणि त्यावेळी जशी आले तशी परत जायला पण मला भीती वाटायला लागली होती. तशी लहानच होते मी, अगदी बावरून गेले होते त्यावेळी. शेवटी थोड्या वेळानंतर तेच ओरडत आले, आणि दरवाजा उघडला. मी रडत रडत सर्व जाऊन आजीला सांगितलं, पुढे त्यांनी मुद्दाम कडी लावली  म्हणून त्यांच्या आमच्यात मोठं भांडणही जुंपलं. पण त्यावेळी भीतीने घाबरलेली मी अजूनही विसरू शकले नाहीये. 

शेवटी त्यांना वैतागून आम्हाला ते घरच सोडावं लागलं. पण ते एक शेजारी सोडले तर बाकी सर्वांशी आमचा संबध अगदी आतापर्यंत होता. 

पुढचं आठवणीतलं घर आहे, समर्थ मंदिराच्या थोडं पुढे औकिरकर वाड्यातलं. इथल्या वाटेवर घराकडे वळताना उजव्या बाजूला एक लाल गुलमोहराचं झाड होतं. तिथून थोडं पुढे गेलं की डाव्या बाजूला आणखी वळताना केशरी रंगाची कर्दळी पसरलेली होती. ह्या घराच्या आजूबाजूला बऱ्यापैकी झाडं होती. दारापुढे छोटसं अंगण होतं. तिथं उन्हाळ्यात कोणाची तरी कॉट टाकलेली असायचीच. त्यावर बसून गप्पा मारायला खूप मज्जा यायची त्यावेळी. त्याच अंगणात अंजीराचं छोटसं झाड होतं, खूप नसायची अंजीरं त्यावर, क्वचित एखादं कधीतरी तोंडाला लागायचं, पण त्या झाडावरच्या तोडून खाल्लेल्या अंजीराची चव न्यारी होती नक्की. या घराच्या मागे लगेचच डोंगर होता. थोडं पुढे चालत गेलं की लगेच डोंगरावर चढता यायचं.
आमच्या बाजूलाच आमचे मालक राहत होते. तेही तसे गाणीबिणी लावताना आजूबाजूच्याचही मनोरंजन होईल याची पुरेपूर काळजी घेणाऱ्यातलेच होते. त्यामुळे टेप किंवा टिव्ही नव्हता, याचं दुःख आम्हा कोणालाही वाटलंच नाही कधी. टिव्ही त्यांच्याकडे होता, आणि कार्यक्रम कोणते, कधी असायचे, ते माझे तोंडपाठ होते. बातम्या लागायच्या तेव्हा आमच्या घरी पिंड्रॉप सायलेन्स मध्ये त्या ऐकल्या जायच्या. बाकी गाणी, पिक्चरसाठी मी त्यांनी बोलवायच्या आत तिथे हजेरी लावायचे. या घरात मी बालवाडी ते तिसरी पर्यंत होते. 
इथे जमीन शेणाने सारवावी लागायची. आणि माझ्यावर काम शेण शोधण्याचं असायचं, जे मला त्यावेळी खूप आवडायचं.
तिथे असताना एकदा घराच्या मागे फिरत असताना, मला साप दिसला, आणि मी ते जेव्हा सर्वाना जाऊन सागितलं, तेव्हा मला मी अगदी शूरवीर झाल्यासारखं वाटत होतं. सगळी मोठी माणसं मला मान देत सापाबद्दल विचारत होती, कुठे पहिला, केवढा होता, कुठल्या रंगाचा होता, मी सगळ्यांना जिथे पहिला त्या जागेवर घेऊन सुद्धा गेले होते, पुढे काय झालं आठवत नाही, पण तो प्रसंग मला फार आवडतो आणि तो पाहिलेला हिरव्यागार रंगाचा साप अजूनही तसाच आठवतो.
या घरच्या मालकाशी आमचे अजूनपर्यंत चांगले सबंध आहेत. 

नंतरचं घर तेवढं आठवणीत ठेवण्यासारखं नाही, पण तरीही एक आठवण म्हणजे, त्याच्यासमोर नवी बिल्डिंग बनत होती. आणि उन्हाळ्यात आम्ही त्या बिल्डिंगच्या गच्चीवर झोपायला जायचो. मी, मामा, आजोबा, कधी माझा छोटा भाऊ आणि आमच्या आजूबाजूला राहणारी काही मंडळी. त्यात माझ्या मैत्रिणीही होत्या, भारी मज्जा यायची. सर्वांबरोबर गप्पा टप्पा मारत चांदण्या मोजत झोपायला.

आणि आता या नंतरचं घर माझं सर्वात म्हणजे सर्वात आवडतं. घाणेकर चौकातला मोहित्यांचा वाडा. 

अगदी रोडवर, पण उंच कठडा करून बनवलेलं घर होत ते. एकूण तीन बिऱ्हाडं होती. मालक काही तिथे रहायचे नाहीत. त्यामुळे राज्य आमचंच होतं.

याच्या पुढच्या बाजूला तर रोड असल्यामुळे टाईमपास व्हायचाच. पण मागची बाजू त्याहून मस्त होती. मागे मोठा व्हरांडा होता. त्याला कट्टा होता, त्यामुळे बायकांना गप्पा टप्पा मारायला खूप मिळायच्या. तिथून पुढे होतं मोठ्ठ अंगण. त्या अंगणात बारीक बारीक गवत. उंच उंच निलगिरीची झाडं होती. त्यांच्या भवऱ्याबरोबर खेळणं हा सर्वात मोठा टाईमपास होता आमचा. तो मागचा देखावाच अभूतपूर्व होता. मला खूप आवडायचा तो. 

इथे सगळीकडे हिरवाई होती म्हणून अगदी सगळे पक्षी हजेरी लावायचे. भारद्वाज तर रोज सकाळी दिसायचेच. साळुंख्या, चिमण्या, दयाळ पक्षी सतत भिरभिरत असायचे. पोपटाचे थवे यायचे.
खंड्या, कोकिळा, मैनाही सतत असायचेच. माकडांची गँग आठवड्यातून दोनदा तरी यायचीच. 
मोठे मोठे साप फिरताना दिसायचे, आणि मुंगूसं तर रोज इकडनं तिकडं पळायची. मुंगूसाचं दर्शन शुभ समजलं जायचं, आणि आम्हाला तर  रोजच असं शुभदर्शन घडायचं. 
याच घरापासून मला झाडं लावायची खूप खूप आवड निर्माण झाली. त्यासाठी मी तेव्हा वेडी झाले होते म्हटलं तरी चालेल. शाळेतून येताना मी रोज एकतरी नवं रोप घेऊन यायचेच लावायला. कुणाच्या अंगणातलं आवडलं की सरळ जाऊन विचारायचे फांदी देता का, रोप देता का, बी देता का म्हणून.
आमच्या बाजूला राहणाऱ्या मामींशी तर घरच्यासारखाच सबंध होता. त्यांच्या बाजूला माझ्या वयाच्या मागेपुढे असणाऱ्या माझ्या तीन मैत्रिणी होत्या, आणि त्याचा भाऊ. खूप धमाल करायचो आम्ही.

पुढच्या साईडला कट्ट्यावर बसून दोनच्या सुमारास टिंग टिंग अशी घंटी वाजवत गाडी घेऊन येणारा कुल्फीवाल्याची वाट पाहणं आणि बरेचदा चार आण्याचीच कुल्फी देणारे घरचे स्वतःहून कधी आठ आण्याची खा असे म्हटले तर जग जिंकल्याचा आनंद व्हायचा.

नंतर त्या मालकांनी तिथे बिल्डिंग बांधायचं ठरवलं, आणि आम्हा सगळ्या भाडेकरूंना ते घर सोडावं लागलं. पण दुर्दैवाने तिथे आजपर्यंत बिल्डिंग बांधली गेलीच नाही. ते मोडक्या अवस्थेत तसच पडून राहीलं. मला नेहमी आठवलं की हळहळ वाटते, हे आम्हाला कधी सोडायला लागलं नसतं तर किती बरं झालं असतं!!
हेच घर माझ्या स्वप्नात सर्वात जास्त वेळा येतं. मी मनाने त्याच घरात असते नेहमी. सातारा म्हटलं की मला तेच घर सर्वात जास्त आठवतं. दोनच मोठ्या खोल्या होत्या, पण आजूबाजूच्या आवाराने मन लोभून टाकलेलं माझं!!

पुढे दोन तीन आणखी घरं बदलली. मी पाचवीनंतर ठाण्याला आले. नंतर मामाने स्वतःचं बिल्डिंगमध्ये घर घेतलं. पण ही जी भाड्याची घरं होती, ती अगदी कायमसाठी आठवणीत रुतून बसलीयेत. 
आजही स्वप्नांत नेहमी मी त्याच घरामध्ये असते, त्याच माणसांमध्ये असते. त्यातली बरीच माणसं आता नाहीतही, पण तरीही मी त्यांना स्वप्नात भेटत असते. ती ती घरं ती ती माणसं देखील घेऊन येतात, आणि त्या सुखद आठवणी आणखी अविस्मरणीय होऊन जातात.......

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel